जुन्या सचिवालयाकडून कार्निव्हल मिरवणूक सुरू होणार असून ती कला अकादमीपर्यंत जाईल. पर्यटन खात्याने कार्निव्हलच्या आयोजनासाठी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी म्हणून व्हिन्सन इव्हेन्ट्स या कंपनीची निवड केली आहे. पणजी शहरापाठोपाठ नंतर मडगाव, म्हापसा, वास्को, फोंडा आदी शहरात कार्निव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्निव्हलनिमित्त देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात यावेत यासाठी सरकारने कार्निव्हलची यंदा भरपूर प्रसिध्दी ठिकठिकाणी केली असून त्याचा फायदा निश्चितच होणार असल्याचे पर्यटक खात्यातील सूत्रांनी केले.
कार्निव्हलनिमित्त कदंब बसस्थानकापासून कला अकादमीपर्यंत खास सजावट करण्यात आलेली आहे. तसेच मिरवणुकीच्या पणजी शहरात येणारी वाहतूक काजू दरबारच्या दिशेने जुन्या पाटो पुलावरून चर्च चौकाच्या दिशेने वळवण्यात येणार आहे.
महापौरांचा बहिष्कार
आज पणजीत होऊ घातलेल्या कार्निव्हलवर आपण बहिष्कार घालणार असल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल येथे बोलताना सांगितले.
कार्निव्हलनिमित्त काल पणजीतील पालिका उद्यानाजवळ महापालिकेतर्फे आयोजित सांबा कार्निव्हलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
पणजीत कार्निव्हल आयोजित करण्यासाठी आम्ही पर्यटन खात्याकडे एक कोटी रु.ची मागणी केली होती. मात्र, खात्याने ते न देऊन कार्निव्हल आपणच साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल फुर्तादो यांनी नाराजी व्यक्त केली. पणजी कार्निव्हल समितीने २८ ते ४ मार्चपर्यंत कार्निव्हलनिमित्त पणजी पालिका उद्यानाजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती देतानाच सरकारी कार्निव्हलपेक्षा महापालिकेचा कार्निव्हल जास्त चांगला असेल असा दावा त्यांनी केला.
यावेळी महापालिका आयुक्त संजीत रॉड्रीग्ज व अन्य काही नगरसेवक हजर होते. या पाच दिवसांच्या महापालिकेच्या कार्निव्हलात मुलांसाठी चेहरा रंगवणे, नखे रंगवणे, नाच, गाणी अशा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. महापालिकेला ३० लाख रु.
दरम्यान, कार्निव्हल महोत्सवासाठी पर्यटन खात्याने पणजी महापालिकेला ३० लाख रु. दिलेले आहेत व ते ४ दिवसांच्या कार्निव्हल कार्यक्रमासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे महापालिका सूत्रानी सांगितले. मात्र, शहरातील प्रमुख कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन पर्यटन खात्यातर्फेच केले जाणार आहे.