अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. राज्यात गुरुवार दि. 30 ऑक्टोबरला जोरदार पावसाची शक्यता येथील हवामान विभागाने व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, बुधवारी नऊ तासांत पणजीत 2.22 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मागील दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यापूर्वी, 26 ऑक्टोबरला जोरदार पावसाने झोडपून काढले होते. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 20 ऑक्टोबरपासून पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळपासून राज्यभरात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि दिवसभरात पावसाची रिपरिप कायम होती.
राज्यात चोवीस तासांत केवळ 6.9 मि.मी. अशा पावसाची नोंद झाली. मुरगाव येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जुने गोवे, पणजी, पेडणे, म्हापसा, दाबोळी, धारबांदोडा, सांगे आदी भागात पावसाची नोंद झाली.
पणजीत बुधवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत सुमारे 2.22 इंच पावसाची नोंद झाली, तर मोप-पेडणे येथे साधारण 1 इंच पावसाची नोंद झाली, अशी माहिती येथील हवामान विभागाने दिली.
येथील अटल सेतूवर पावसाचे पाणी तुंबल्याने एका वाहन अपघाताची नोंद झाली. या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले.
महिनाभरात 11.82 इंच पाऊस
राज्यात ऑक्टोबर महिन्यातील 29 दिवसांत सुमारे 11.82 इंच पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा 85.9 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या 20 ऑक्टोबरपासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाली असून, 20 ते 29 ऑक्टोबर या 10 दिवसात सुमारे 9.16 इंच पावसाची नोंद झाली. त्यात 24 ऑक्टोबरला 2.92 इंच आणि 26 ऑक्टोबरला 2.99 इंच अशा जोरदार पावसाची नोंद झाली.

