आजपासून गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनासाठी सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांकडून सुमारे १५०० प्रश्न आले आहेत. वरील अधिवेशन दि. ८ ऑगस्टपर्यंत चालेल.
या अधिवेशनात वेगवेगळे १० ठराव व ८ विधेयके असे कामकाज असेल. विधानसभेतील रणनिती ठरविण्यासाठी विरोधी गटाची परवा बैठक झाली. या बैठकीतील तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. विरोधी कॉंग्रेसने सरकारला विकासकामांसाठी शंभर दिवस दिले होते. त्यामुळे या शंभर दिवसांत विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी सरकारवर टीका करणे टाळले होते. आज ते विरोधी नेते म्हणून सरकारला कसे फैलावर घेतील, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
छायाचित्रे घेण्यास मनाई
दरम्यान, सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी अधिवेशनाच्या काळात सभागृहातील कामकाजाची छायाचित्रे घेण्यास मनाई केली आहे. प्रसार माध्यमांना कोणतीही छायाचित्रे हवी असल्यास ती माहिती खात्याच्या अधिकृत छायाचित्रकाराकडे उपलब्ध असतील. सभापतींच्या मान्यतेनेच ती वितरित केली जातील. छायाचित्रे घेण्यास मनाई करण्याच्या निर्णयाचा कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी निषेध केला आहे.