हवामान खात्याचा अंदाज; रेड अलर्ट जारी; राज्यातील नागरिकांना सतर्कतेची सूचना
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर काल देखील कायम राहिला. आज (दि. 24) पासून दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच राज्याला अतिदक्षतेचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस राज्यातील जनतेने काळजी घेण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे.
शनिवार व रविवार असे दोन दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी. एवढा असेल व तो ताशी 70 किमी. एवढाही वाढण्याची शक्यता आहे. वरील काळात उत्तर तसेच दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार अशा पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
या काळात समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशी सूचनाही हवामान खात्याने केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच आपत्कालीन सूचनांचे पालन करावे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
तीन दिवसांत 200 हून अधिक झाडे कोसळली
यंदाच्या मान्सूनपूर्व पावसाने राज्याला जबरदस्त तडाखा दिलेला असून, निसर्ग व मालमत्तेचे बरेच नुकसान केलेले आहे. बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसांत राज्यात वादळीवारे व पाऊस यामुळे 200 हून अधिक झाडे कोसळल्याचे अग्निशामक दलातील सूत्रांनी स्पष्ट केले. भूस्खलन, तसेच घरांवर व वाहनांवर झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे लाखो रुपयांची हानी मागील तीन दिवसांत झाली आहे. शेती व बागायतींचे झालेले नुकसान जमेस धरल्यास हे नुकसान कोटींच्या घरात जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
फर्मागुढी येथील किल्ल्याला तडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फर्मागुढी येथील किल्ल्याच्या भिंतीना तडे गेले असून, भिंतींचा काही भाग कोसळू लागला आहे. त्याठिकाणी पाणी साचून राहत असून, ते भिंतींमध्ये झिरपत असल्याने भिंती तडे जाऊ लागले आहेत.
मदतीसाठी येथे संपर्क करा
उत्तर गोवा : 0832-2225383, 0832-2426578, तिसवाडी : 0832-2225383, बार्देश : 0832-2262210, डिचोली : 7709136535, पेडणे : 0832-2201223, 9067910313,
सत्तरी : 0832-2374090
दक्षिण गोवा- सासष्टी : 0832-2794100, उसगाव : 8793043014, फोंडा : 0832-2312121, धारबांदोडा : 8263825335, सांगे : 0832-2604232, केपे : 0832-2662228, काणकोण : 9272057863.