आजची स्त्री व गर्भारपण

0
23
 • – डॉ. मनाली महेश पवार

मातृत्व हे स्त्रीसाठी एक वरदान आहे व हे मातृत्व नैसर्गिक आहे. पण आजच्या काळात हे मातृत्वदेखील कृत्रिमरीत्या संपादन होत आहे, हा चिंतनीय असा विषय आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडल्या खर्‍या, पण काही अंशी या निसर्गाच्या देणगीला मुकत आहेत.

मातृत्व हे स्त्रीसाठी एक वरदान आहे व हे मातृत्व नैसर्गिक आहे. पण आजच्या काळात हे मातृत्वदेखील कृत्रिमरीत्या संपादन होत आहे, हा चिंतनीय असा विषय आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने, खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडल्या खर्‍या, पण काही अंशी या निसर्गाच्या देणगीला मुकत आहेत.
मुली हुशार असल्याने बर्‍याचजणी करियर ओरिएंटेड झाल्या. पहिलं प्राधान्य आपल्या बुद्धीला, आपल्या कामाला; त्यामुळे बर्‍याच उशिरा लग्ने, उशिरा मुलं. काही सुशिक्षित असल्याने नोकरी ही केलीच पाहिजे, नाहीतर शिक्षण फुकट या विचाराने नोकरी करतात, घरातून बाहेर पडतात. मध्यमवर्गीय स्त्रियांचा नोकरी हा अविभाज्य घटक झाला आहे.

वाढत्या महागाईत संसार चालवायचा तर स्त्रीनेदेखील हातभार लावून संसाराचा गाडा ओढावा लागतो. संसार व नोकरी म्हणजे नुसती तारेवरची कसरत. नवीन संसार म्हणजे परत तडजोड, घरातील वातावरणात मिसळून घेण्याचा प्रयत्न, नाती संभाळायची, मने जिंकायची, सणवार, रीती-भाती इत्यादी. कितीही मोठ्या हुद्यावर असली तरी घरातील काही कामे तिला टाळताच येत नाहीत. त्यातच मातृत्वाची चाहूल लागली म्हणजे अजून एक दिव्यातून जाणे. स्त्रियांची कर्तृत्वाची क्षितिजे जशी वाढताहेत तसेच गर्भारपणात समस्याही वाढताहेत. मातेच्या वाढत्या वयाचा परिणामही गर्भावर दिसून येतो.

नोकरीतील ताणतणाव, सकाळची कामाला जायची घाई, वेळेचे बंधन, अपुरा आहार व अपुरी विश्रांती या सर्वांचा परिणाम आजच्या स्त्रीच्या गर्भारपणावर होतो. आई निरोगी असेल तरच बाळ निरोगी निपजेल. आजच्या स्त्रीचे गर्भारपण आता आनंदित, सहज व निरोगी राहिले नाही. दुष्परिणाम दोघांवरही- माता व बाळावर होत आहेत.

बाळाची वाढ चांगली होत नाही. बाळामध्ये काही व्यंग उत्पन्न होतात. बाळाला पुरेसा अन्नपुरवठा होत नाही. बाळ कमी वजनाचे जन्मास येते. त्याचप्रमाणे माता लगेच थकते. तिचे हिमोग्लोबीन कमी होते. तिचे चेहर्‍यावरचे हसू कुठेतरी लुप्त होते, ती निस्तेज होते, तिची चिडचिड फार होते. सदान्‌कदा गोंधळलेल्या मनःस्थितीत राहते. ताण-ताणव अधिकच वाढतो.
अशा स्त्रियांना नैसर्गिक गर्भारपण यावे व नैसर्गिक प्रसूती व्हावी म्हणून प्रत्येकांनी जागरूक राहावे. उत्तम संतुलित- पौष्टिक आहार, व्यायाम व मनःशांती ही तीन सूत्रे चांगल्या गर्भारपणासाठी व त्याचबरोबर नैसर्गिक प्रसूतीसाठी अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहेत.

निरोगी गर्भारपणासाठी आहार

 • पहिल्या तीन महिन्यांत बर्‍याच जणींना मळमळ, उलट्या यांचा त्रास होतो म्हणून पहिल्या तीन महिन्यांत हलका असा व गोड आहार सेवन करावा.
  रात्री झोपताना चिमूटभर सुंठ घालून दूध प्यावे किंवा पचत असल्यास शतावरी कल्प घालून दूध प्यावे. फळांचा रस, शहाळ्यांचे पाणी, वेगवेगळी सरबते, पातळ गोड खिरी यांवर जास्त भर द्यावा.
 • साधारण आठ ते दहा तास स्त्री बाहेर असल्याने साधारण तीन-चार डबे खायला घेऊन जावे. साधारण दोन-दोन तासांनी काहीतरी खावेच. तीन तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये. पोट रिकामे राहिल्यास ऍसिडीटी होते. त्यामुळे उलट्या व मळमळीचा त्रास वाढतो.
 • रात्री मध्येच जाग येत असल्यास काहीतरी गोड खावे.
 • उलट्यांचा त्रास गर्भवतीला हॉर्मोन्समुळे होतो. त्यात रात्री साधारण आठ तास तरी पोट रिकामे राहिल्याने सकाळी उठल्या-उठल्या उलट्या होतात. अशावेळी सकाळी उठल्या-उठल्या सकाळीच खाऊन घ्यावे. यामध्ये कोरडे पाव किंवा टोस्ट खावे म्हणजे उलट्यांचा त्रास कमी होतो.
 • धण्याचे पाणी पिण्यानेही सकाळच्या उलट्या कमी होतात.
 • पोटात जळजळ होत असते त्यामुळे थोडे-थोडे पण जास्त वेळा खावे.
 • ऑफिसमध्ये राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, बेदाणे, बदाम, जर्दाळू, खारीक असा सुकामेवा किंवा एखादे फळ किंवा गव्हाच्या पिठाचे- नाचणीच्या पिठाचे- मुगाच्या पिठाचे किंवा डिंकाचे लाडू घेऊन जावे. त्याचप्रमाणे इडल्या, शिरा, उपमासारखे गोड पदार्थही एखाद्या डब्याला घेऊन जाऊन खाऊ शकता.
 • संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना काहीतरी खाऊन किंवा पिऊनच बाहेर पडावे म्हणजे घरी जाईपर्यंत ऍनर्जी टिकून राहते, जर्जर व्हायला होत नाही. थकवा थोड्याफार प्रमाणात कमी होतो.
 • बाहेरून आल्या-आल्या लगेच कामाला लागू नये. थोडी विश्रांती, आराम करावा, मगच कामाला लागावे.
 • काही हार्मोन्समुळे स्त्रीला कधी-कधी एकटेपणा वाटतो. नैराश्य येते, चिडचिड होते. अशा वेळी थोडसं गोड खावं व आवडत असल्यास संगीत ऐकावं, गप्पा माराव्यात किंवा आपल्या आवडीचे काम करावे.
 • रात्री लवकर जेवावे व आहार थोडासा हलकाच घ्यावा.
 • गर्भवती मातेला पोषक संतुलित आहाराची गरज असते. त्यामुळे त्यात प्रथिने, पिष्टमय पदार्थ, खनिजे, व्हिटॅमिन, लोह, स्गिग्ध पदार्थ इत्यादींचा समावेश असावा.
  लोणी, तूप, ताक, दूध अशा दुग्धजन्य पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त वापर करावा.
  कॅल्शियमयुक्त पदार्थ व लोहयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यामध्ये नाचणी, राजगिरा, खसखस, दूध, हिरव्या पालेभाज्या, बेदाणे, गूळ, सोयाबिन, मासे, मटणाचा समावेश होतो.
 • कॉफी, चहा, कोल्डड्रिंक इत्यादी पूर्ण वर्ज्य करावे.
 • गर्भारपणात पाण्यालाही खूप महत्त्व आहे. कामाला जाताना स्वतःला पुरेल एवढे पाणी घेऊन जावे. साधारण दोन ते तीन लिटर पाणी गर्भिणी अवस्थेत प्यावे असे डॉक्टर सांगतात. पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, ऋतूप्रमाणे, लक्षणानुरूप पाणी पिण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. पिण्याचे पाणी नेहमी उकळून घ्यावे. उकळून गार केलेले पाणीसुद्धा चालते.
 • निरोगी गर्भारपणासाठी व मनःशांतीसाठी व्यायाम आवश्यक. तसेच मन प्रसन्न ठेवावे. जेवढा मनःस्ताप जास्त तेवढा योनीमार्ग आवळलेल्या स्थितीत राहतो. त्यामुळे तो मार्ग लवचीक, उघडा होण्यासाठी योगसाधना उपयुक्त ठरते. पोटाचे, ओटीपोटाचे स्नायू बळकट व लवचीक होण्यासाठी, रक्ताभिसरण वाढण्यासाठी काही योगासने करावीत. उदा. वज्रासन, पवनमुक्तासन, दीर्घश्‍वसन, ओंकार गुंजन, ध्यान-धारणा करावी. वज्रासन, पवनमुक्तासारखी योगासने करण्याअगोदर सेनोग्राफी करावी म्हणजे गर्भामध्ये वारीचे स्थान लक्षात येते. वार खाली असल्यास ही आसने करू नये. उलट पूर्णपणे बेड रेस्ट घ्यावी. रोज चालणे हाही उत्तम आरोग्यासाठी एक चांगला व्यायाम आहे. मोकळ्या हवेत, लॉनवर साधारण १०-१५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
  कामाचे ठिकाण हे अगदी आपल्या घराजवळ नसते. अशावेळी रस्त्यावरच्या खड्‌ड्यांचा, मध्ये लागणार्‍या ट्रॅफिकचा विचार करून दहा मिनिटे लवकरच घरातून निघावे. रिक्षा व स्कूटरवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी.
 • रात्री उशिरापर्यंत टीव्ही, मोबाईल पाहू नये.
 • टीव्हीवरील कार्यक्रम किंवा सिनेमा हा मनाला उल्हास देणारा असावा. टीव्हीचा आवाज मोठा असू नये.
 • कार्यक्रमामुळे मनात भीती, दुःख उत्पन्न होऊ नये.
  साधारण पाचव्या महिन्यापासून बाळाला ऐकू येते, स्पर्श जाणवतो. त्यामुळे मातेने थोडा वेळ काढून गर्भाबरोबर जरूर सुसंवाद साधावा. स्पर्श व तुमचा आवाज बाळाला चांगलाच जाणवत असतो, त्यामुळे गर्भाला संगीत ऐकवावे, चांगल्या गोष्टी ऐकवाव्यात, चांगली स्तोत्रे म्हणावीत व उदराला मायेचा प्रेमळ स्पर्श करावा. हा स्पर्श व या चांगल्या गोष्टी बाळापर्यंत पोचतात.
  घर, नोकरी सांभाळता-संभाळता जेव्हा गर्भारपण येते तेव्हा बाळाला (गर्भालाच) जास्त प्राधान्य द्यावे.
 • वेळच्या वेळी तपासणीला डॉक्टरांकडे जावे.
 • रक्ततपासणी, सोनोग्राफीसारख्या चाचण्या वेळच्या वेळी कराव्यात.
 • लोह वाढवण्यासाठी, कॉल्शियम वाढवण्यासाठी गोळ्या औषधे घ्यावीत. शतावरी कल्पसारखे टॉनिक घ्यावे.
 • मनशांत ठेवण्यासाठी चांगली पुस्तके वाचावीत, एखादी कला जोपासावी, संगीत ऐकावे.
 • विश्‍वास असल्यास देवाची प्रार्थना करावी, नामस्मरण- जप करावेत.
 • स्त्री हीच तिच्या बाळाची शिल्पकार असते. त्यामुळे निरोगी, तेजस्वी व बुद्धिमान बाळासाठी स्वतः स्त्रीने स्वतःची काळजी घ्यायला हवी. आपले तन व मन तंदुरुस्त ठेवावे.