आरजीचे मनोज परब यांचा आरोप
कॉँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षातील जिल्हा पंचायत निवडणूक आघाडी न होण्यास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे जबाबदार आहेत. त्या दोघांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला लाभ मिळवून देण्यासाठी आघाडीमध्ये बिघाडी केली आहे, असा आरोप काल रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.
आरजीपीकडून निवडणूक आघाडीसाठी प्रयत्न केला जात होता. त्यासाठी तडजोड करण्याची तयारी ठेवली होती. या निवडणूक आघाडीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला, असे आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.
आरजीपी हा बहुजनांचा पक्ष आहे. अमित पाटकर आणि विजय सरदेसाई यांना आरजीपी हा पक्ष पुढे गेलेला नको आहे. त्यामुळे त्या दोघांनी आघाडी व्हायला दिली नाही, असा आरोप मनोज परब यांनी केला.
सासष्टी, सत्तरी, डिचोली आदी तालुक्यात पक्षाचे मतदार मोठ्या प्रमाणात असताना त्या तालुक्यातील मतदारसंघांवर दावा केला नाही. आरजीपीने केवळ 13 जागांवर दावा केला होता. आमच्या पक्षाला विश्वासात न घेताच कॉँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. कॉँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी खोर्ली मतदारसंघात सिद्धेश नाईक यांना विजयी करण्यासाठी त्यांच्यात निवडणूक आघाडी असूनसुध्दा त्या दोघांनीही खोर्ली मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत, असा आरोप मनोज परब यांनी
केला.
यावेळी आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर आणि अजय खोलकर यांची उपस्थिती होती.