आघाडीत बिघाडी

0
42

लोकसभा निवडणूक जवळ येत चालली असताना पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा ह्यावरूनच सध्या ‘इंडिया’ आघाडीत जुंपलेली दिसते. पाटणा, बंगळुरू आणि मुंबईनंतर नुकत्याच दिल्लीत झालेल्या चौथ्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव काहींनी पुढे केले, पण ते नाव माध्यमांतून झळकताच काहींचा तीळपापड झाला आणि त्यांनी वेगळा सूर लावला. खर्गेंचे नाव येताच ‘एक निश्चय, एक नितीश’च्या घोषणा झाल्या. काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्ष अधिक समर्थ असल्याचे तेजस्वी यादव सांगू लागले. आता खुद्द खर्गे मागे हटले आहेत आणि आधी एमपी निवडून येऊ देत, मग पीएमचे पाहू असे सांगत आहेत. म्हणजेच येणारी निवडणूक एकसंधपणे आणि एका चेहऱ्यावर लढविण्याची जी बात केली जात होती, तिच्या आसपासही ही आघाडी अद्याप पोहोचलेली नाही. जागावाटप तर दूरची बात आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने काँग्रेस पक्षाला आपल्यासोबत येण्यासाठी 31 डिसेंबर ही निर्वाणीची मुदत दिलेली आहे. तृणमूल, काँग्रेस आणि डाव्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावे अशी भूमिका ममतांनी घेतली आहे. परंतु काँग्रेसने नुकत्याच झालेल्या निवडणुकांत दोन राज्यांतील आपली सत्ता गमावूनही तृणमूलच्या ह्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत नाही. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत अजूनही आघाडीपेक्षा बिघाडीच अधिक दिसते आहे. देशाच्या संसदेतील 146 खासदारांचे निलंबन झाल्यानंतर हा विषय देशाच्या जनतेपर्यंत पोहोचवून विद्यमान सरकार हुकूमशाही सरकार आहे असे तिच्या मनावर ठसवण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून सध्या चाललेला आहे, त्याला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वर्तनामुळे खो घातला जाताना नुकताच दिसला. संसदेसारख्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये तरुणांनी केलेली घुसखोरी हे उत्स्फूर्त नव्हते, तर ते पूर्वनियोजित षड्यंत्र होते हे पुराव्यानिशी समोर आलेले असताना देखील राहुल गांधी ती निदर्शने म्हणजे देशातील बेरोजगारांची निदर्शने असल्याचे विधान करीत आहेत त्याचा अर्थ काय? संसदेतील घुसखोरीच्या अत्यंत गंभीर घटनेचे त्यातून ते अप्रत्यक्ष समर्थनच करीत असल्याचे दिसत नाही काय? राहुल गांधी यांचे मार्गदर्शक कोण आहेत? त्यांना ही अशी देशविघातक भूमिका घेण्यास कोण प्रवृत्त करीत आहेत ह्याचा विचार काँग्रेस नेतृत्वाने करण्याची गरज आहे. संसदेतून निलंबन होताच त्याविरोधात संसदेबाहेर खासदारांनी ठिय्या मांडला. तेथे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांची टिंगलटवाळी तृणमूलच्या एका खासदाराने केली. राहुल गांधींना ती इतकी आवडली की त्यांनी मोबाईल काढून स्वतः तिचे चित्रीकरण चालवले. ज्याची टिंगलटवाळी चालली आहे ते राज्यसभेचे अध्यक्षच आहेत असे नव्हे, तर राज्यसभेचा अध्यक्ष हा देशाचा उपराष्ट्रपती असतो एवढेही भान राहुल यांच्यासारख्या बड्या नेत्याला असू नये?
खरे तर काँग्रेस पक्षाला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने गांधी घराण्याबाहेरचा राष्ट्रीय अध्यक्ष लाभलेला आहे. असे असूनही सर्वत्र राहुल गांधींची लुडबूड का चालते? संसदेतील खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात जी राष्ट्रव्यापी निदर्शने झाली, तेथेही राहुल गांधींना गरजेहून अधिक महत्त्व दिले गेलेले दिसले. त्यांच्या बाष्कळपणामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचे आम्ही मागे लिहिले होते. आता ‘इंडिया’ आघाडी बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने त्यामुळे नुकसान केवळ काँग्रेसचे नव्हे, तर एकूणच इंडिया आघाडीचे होते आहे आणि हे आता इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्याही लक्षात येऊ लागलेले दिसते. वास्तविक काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे एवढीच त्याची जमेची बाजू आहे. राष्ट्रीय पातळीवरील त्याचे स्थान कसे झपाट्याने खाली चालले आहे ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर नुकतेच दिसून आले आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून इंडिया आघाडीचे नेतृत्व त्या पक्षाकडे सोपविण्याची प्रादेशिक पक्षांची तयारी नाही. शिवाय ह्या प्रादेशिक पक्षांच्या सर्वेसर्वांची पंतप्रधानपद भूषविण्याची महत्त्वाकांक्षा आहे ती वेगळीच. त्यामुळे इंडिया आघाडीचा पाया अजूनही ठिसूळच दिसतो. देशामध्ये नरेंद्र मोदी हे किती लोकप्रिय आहेत हे निवडणूक निकालांतून पुन्हा पुन्हा दिसून येते आहे आणि केवळ त्यांना वैयक्तिक लक्ष्य करण्याची चूक काँग्रेस पक्ष पुन्हा पुन्हा करीत आला आहे आणि त्याची फळेही भोगत आला आहे. आता त्याची फळे समस्त इंडिया आघाडीला भोगावी लागणार आहेत. ज्या ‘कोअर पॉझिटिव्ह अजेंडा’ ची बात केली जात होती तो अद्याप कुठे आहे? देशाच्या संसदेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांचे निलंबन होऊनही सरकारविरुद्ध जनमत निर्माण करणे इंडिया आघाडीला शक्य झालेले नाही ह्यातच त्यांचे घोर अपयश दिसते.