आगामी निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार

0
15

>> रोहन खंवटेंकडून स्पष्ट, भाजपप्रवेशाच्या अफवाच

>> कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

लोकांच्या आधारावर आणि सहकार्यामुळे मी सतत दोन वेळा निवडून आलो आहे. माझ्या मतदारांना विचारल्याशिवाय मी कोणतेच पाऊल उचलणार नाही. मी अजूनही अपक्ष आहे आणि अपक्ष म्हणूनच आगामी निवडणूक लढविणार आहे. मी भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्या उठत असून त्या अफवा असल्याचे पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी काल स्पष्ट केले. पर्वरीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार खंवटे बोलत होते.

आमचे कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये सामील होऊन एक महिन्याचा काळ लोटला. आमच्या कार्यकर्त्यांची एकच मागणी होती, ती म्हणजे माजी जिल्हा पंचायत सदस्य यांना गट समितीचे अध्यक्ष करावे. परंतु कॉंग्रेस गोटातून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते सर्व कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाच्या अध्यक्षांनी पर्वरी गट समितीसाठी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मांडला. तीन महिन्यांपूर्वीचे वातावरण सध्या गोव्यातील कॉंग्रेसमध्ये राहिले नाही. आज आप, तृणमूल गोव्यात ज्याप्रमाणे अग्रेसर होऊन काम करत आहे तसे कॉंग्रेसमध्ये कोणी काम करत असल्याचे दिसत नाही असेही खंवटे यांनी पुढे बोलताना सांगितले.

कॉंग्रेसमधील सर्वच उमेदवार जिंकण्यासाठी निवडणूक लढवत नसावेत असे स्पष्ट दिसत असल्याची टीका यावेळी खंवटे यांनी कॉंग्रेसवर केली. या सर्व कारणामुळे मी अपक्ष म्हणूनच आगामी निवडणूक लढविणार असल्याचे आमदार रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. एका कॉंग्रेसच्या माजी नेत्याने पर्वरी गट समितीवर आपच्या कार्यकर्त्याची अध्यक्ष म्हणून नेमणूक करावी अशी मागणी पक्षाकडे केली असल्याचे समजते. त्यामुळेच कॉंग्रेस पक्ष सध्या गोंधळात पडलेला दिसत आहे. असे असताना कॉंग्रेस पक्षात जाणे हे मला योग्य वाटत नाही. माझे कार्यकर्ते, पाठीराखे, हितचिंतक सदैव माझ्या पाठीशी आहेत असा विश्‍वास खंवटे यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस
सदस्यत्वाचा राजीनामा

पर्वरी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय सुमारे महन्याभरापूर्वी घेतला होता. मात्र काल त्यांनी काल कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यात पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत माजी सदस्य गुपेश नाईक यांच्यासह इतर काही खंवटे समर्थकांचा समावेश होता. या सर्वांनी काल कॉंग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

भाजप प्रवेशाचे वृत्त निराधार : खंवटे

आपण भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त हे तद्दन खोटे व निराधार असल्याचा खुलासा काल रोहन खंवटे यांनी दै. नवप्रभाशी बोलताना केला. मात्र, त्यासंबंधी अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. राज्यातील विविध पक्षांचे नेते एक तर भाजप अथवा अन्य काही पक्षांत प्रवेश करण्याचे सत्रच राज्यात सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर काल पर्वरी मतदारसंघातील अपक्ष आमदार रोहन खंवटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चालू झाली होती. समाजमाध्यमावरून हे वृत्त व्हायरल होऊ लागले होते.

काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनी त्यांना या वृत्तासंबंधी विचारले असता त्यांनीही या वृत्ताचा इन्कार केला नव्हता. मात्र, त्यासंबंधी अधिक माहिती देणे व बोलणे टाळले होते.

मात्र, नंतर उशिरा संध्याकाळी दस्तरखुद्द रोहन खंवटे यांनी सदर वृत्ताचा इन्कार करताना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. यासंबंधी नवप्रभाशी बोलताना ते म्हणाले की, माझा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, त्यासंबंधी अधिक काही बोलायचे झाल्यास ते मी नंतरच बोलेन.