Home बातम्या आगामी इफ्फीच्या तयारीचे वेध

आगामी इफ्फीच्या तयारीचे वेध

0

दरवर्षी गोव्यात होत असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने या महोत्सवासाठीची तयारी सुरू करण्यासाठी सरकार पावले उचलू लागले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली येत्या आठवड्यात चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत चित्रपट महोत्सवासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे गोवा करमणूक सोसायटीचे सरव्यवस्थापक श्रीपाद नाईक यांनी सांगितले. या बैठकीत प्रामुख्याने चित्रपट महोत्सवाच्या आयोजनासंबंधीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असला तरी बैठकीत काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. पुढील आठवड्यात बैठक नक्की कधी होईल, असे विचारले असता ते अद्याप ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीसंबंधीचे पत्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पाठवण्यात आलेले असून त्यांच्या सोयीनुसार बैठक कधी घ्यायची ते ठरणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

चित्रपट अनुदान योजना तयार

राज्यातील होतकरू चित्रपट निर्मांत्याना चित्रपट निर्मिती करणे सुलभ व्हावे यासाठी सरकारने सुरू केलेली चित्रपट अनुदान योजना खर्‍या अर्थाने गोमंतकीय निर्मात्यांसाठी फायद्याची ठरावी यासाठी सदर योजनेत आवश्यक ते बदल करून तिला नवे रूप देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. सहा महिन्यांपूर्वीच ही योजना सरकार दरबारी पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व सरकारकडून आवश्यक ती मंजुरी मिळाल्यानंतर सदर योजनेची अमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.