28 C
Panjim
Thursday, September 24, 2020

आगळा वेगळा ‘अमित’ भाग – २

  •  वृंदा मोये

अमितने एक दिवस वयाच्या केवळ आठव्या वर्षी अडीच-तीन किमी.पर्यंतचं मांडवी नदीमधील अंतर पोहून सर्वांना चकित करून सोडलं होतं. बाहेरील जगात कसं वावरायचं याचा प्रत्यक्ष अनुभव तो आज घेत आहे. चिकटकाम, रंगविणे असे अनेक उपक्रम अमित आज एका जागी बसून आवडीने करायला लागलेला आहे.

अमितच्या जन्मापासूनची कथा…. घरात पहिलाच मुलगा जन्माला आला म्हणून मोठ्या आनंदाने अमितचे लाड, कोडकौतुक करण्यात येत होते. आईवडील, आजीआजोबा यांच्या अंगाखांद्यावर मायेच्या पंखाखाली अमित मोठा होत होता. वंशाचा दिवा म्हणून घरातील सगळी त्याची खूप काळजी घेत होते. पुढे काही अघटित घडेल असं वाटण्यासारखं काही कारणही नव्हतं. दिसायलाही अमित अगदी छान, हेल्दी गोरा गुटगुटीत बाळ होता. सुरुवातीला अगदी नॉर्मल मुलांसारखा तो वाढत होता. योग्य वेळेस तो चालू लागला पण बोलत नव्हता. इतर मुलांबरोबर खेळणं किंवा घरातील माणसांबरोबर हसणं-खिदळणं त्याचं कमी होत चाललं होतं. सतत शून्यात असल्यासारखा कुठेतरी बघत बसायचा. काही मुलं या सगळ्या प्रक्रिया उशिरा सुरू करतात… अशी मनाची समजूत करून त्यांनी वाट बघितली. घराजवळच असलेल्या बालवाडीत अमितला घेऊन त्याची आई जाऊ लागली. तिथे इतर सगळी मुलं गाणी गात, हसत, खेळत, एकमेकांसोबत मिसळत, मज्जा करत पण अमित कोणाच्यात कधीच मिसळायचा नाही की काही करायचा नाही. जणुकाही या जगापासून तो मनाने दूर दूर जात होता. बालवाडीतील शिक्षक, इतर पालक रोज अमितबद्दल नवनवीन तक्रारी करायचे. तुमचा अमित कुणाशी काही बोलत नाही, कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत नाही, वगैरे, वगैरे. त्यावेळेस मात्र अमितच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. लोकांच्या व घरच्यांच्या सल्ल्यानुसार व्रत-वैकल्यं, नवस-सायास असे प्रकार करण्यास तिने सुरुवात केली परंतु सगळं व्यर्थ. शेवटी अमित तीनएक वर्षांचा असताना कोणी त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. तेही करून बघुया म्हणून अमितचे आईवडील त्याला ‘संगत’ या समुपदेशन केंद्रामध्ये घेऊन गेले. तेथील तज्ज्ञांनी अमितबद्दल सर्व माहिती ऐकून घेतली आणि काही चाचण्या करून अमित हा ‘ऑटिझम ग्रस्त’ मुलगा असल्याचे निदान केले. हे ऐकल्याबरोबर अमितच्या आईवडलांच्या डोक्यावर कोणी घाव घातल्यासारखं झालं. डोळ्यांसमोर काजवेच चमकले. हताश मनाने अमितची आई सांगत होती. हे सगळं प्रत्यक्ष तिने भोगलेलं असल्यामुळे मी तिची मनःस्थिती समजू शकत होते.
साधारणपणे बरेच डॉक्टर्स ‘ऑटिझम’वर औषधं देतात. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. केवळ डिप्रेशन किंवा आक्रमकपणा आटोक्यात आणण्याइतपत या औषधांचा उपयोग होतो, पण ऑटिझम पूर्ण बरा होत नाही. या मुलांना ठरावीक शिस्तबद्ध पद्धतीने शिकवल्यास त्यांची वागणूक सुधारू शकते असं एका पुस्तकात वाचलं होतं. तसेच सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी यांचाही थोड्याफार प्रमाणात उपयोग होऊ शकतो. अशातच अमितच्या पालकांना कोणीतरी रिसोर्स रूम असलेली नॉर्मल शाळा अमितसाठी सुचवली. आत्तापर्यंत काहीच मार्ग दिसत नव्हता. कोण काय सांगतील ते करण्यासाठी अमितचे आईवडील त्याला घेऊन जात असत. लगेच त्यांनी रिसोर्स रूम असलेल्या एका शाळेमध्ये अमितसाठी ऍडमिशन घेतली. फावल्या वेळेत त्याला घेऊन ती ऑक्युपेशनल थेरपीसाठी जाऊ लागली. त्याला पाण्याची प्रचंड आवड म्हणून अमितची आई त्याला घेऊन स्विमिंग क्लासेसला जाऊ लागली. पाण्यामध्ये तो कितीही वेळ बुडी मारून स्वस्थ रहायचा. हे सगळं करता करता अमितने एक दिवस वयाच्या केवळ आठव्या वर्षी अडीच-तीन किमी.पर्यंतचं मांडवी नदीमधील अंतर पोहून सर्वांना चकित करून सोडलं होतं. परंतु यानंतर काही कारणास्तव अमितच्या पालकांना त्याची ऑक्युपेशनल थेरपी अर्ध्यावर बंद करावी लागली. त्यामुळे अमितचे सेन्सरी इश्यूज वाढत गेले आणि याचा परिणाम त्याच्या प्रगतीवर होऊ लागला. तरीसुद्धा वेळ मिळेल तेव्हा अमितची आई त्याला घेऊन ऑक्युपेशनल थेरपीसाठी जात असे. अशातच त्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आमच्या आनंद निकेतनमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.

आमच्या शाळेत अमितसाठी ऍडमिशन घ्यायचं पक्कं ठरल्यानंतर आम्ही अमितसाठी ‘वन-टू-वन’ बेसिसवर अमितला प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. एक शिक्षक – एक विद्यार्थी या तत्वानुसार अमितला शिकवण्याची गरज असल्याचं त्याच्या पालकांना सांगितलं. याविषयी अमितच्या पालकांशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी अमितच्या शिक्षणासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू असा विचार पालकांनी बोलून दाखविला. मनाविरुद्ध काही घडल्यास अमितला भिंतीवर डोकं आपटून घेण्याची सवय होती म्हणून त्याला बसायला स्वतंत्र क्युबिकल आणि भिंतीला कुशन्स लावून घेतली. दोन-तीन तासांचे वेगवेगळे उपक्रम ठरवून त्याच्यासाठी एक स्वतंत्र शिक्षक नेमला. शाळेतील किचनमध्ये गेल्यास फ्रीजमध्ये काय मिळेल ते उचलून तोंडात कोंबायचा. त्यासाठी किचनमध्येही बंदोबस्त करावा लागला. बाथरूममध्ये जाण्यासाठी अमितला बाहेर आणल्यास दोघे-तिघे त्याच्यावर लक्ष ठेवत असत. कारण सगळ्यांची नजर चुकवून अमित कधी काय करेल याचा नेम नव्हता.

मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन अमितसाठी औषधोपचार सुरू झाले आणि त्यामुळे अमितमधील बेफाम वागणुकीला आळा बसला. हळूहळू शांत होऊन शिक्षकांना तो चांगलं सहकार्य करू लागला. शाळेतील स्पोर्टस् टीचर त्याच्याकडून वेगवेगळे व्यायाम करून घ्यायला लागले. गोव्यात ‘ऑटिझम’ स्पेशालिस्ट श्रीमती गेशेल लोबो यांना शाळेत बोलावून त्यांच्या मार्गदर्शनानुसार अमितसाठी उपक्रम ठरविण्यात आले. अर्थातच हे सर्व करताना शिक्षकांची मेहनत आणि अमितच्या पालकांनीही खूप चांगले सहकार्य तसेच आर्थिकदृष्ट्याही मदत केली. याचा परिणाम केवळ दीड वर्षांत असा झाला की इतकी वर्षे केवळ स्वतःच्याच कोशात जगत असलेला अमित आज थोडाफार इतर विद्यार्थ्यांबरोबर तसेच समाजात मिसळायला लागलेला आहे. इतर मुलं शाळेच्या बसमधून घरी जाताना अमितला बसमधून फिरवून आणण्यात येतं. शाळेतील मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये अमितला सहभागी करून घेता येतं. बाहेरील जगात कसं वावरायचं याचा प्रत्यक्ष अनुभव तो घेत आहे. प्रशिक्षित शिक्षक बरोबर असल्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवण्यात येतं. चिकटकाम, रंगविणे असे अनेक उपक्रम अमित आज एका जागी बसून आवडीने करायला लागलेला आहे.

या सगळ्या गोष्टींमुळे अमितच्या आईवडलांची चिंताही थोड्याफार प्रमाणात आज मिटलेली आहे. अमितला घेऊन आनंदाने ते शाळेतील सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. अमितबरोबर इतर मुलांचीही आस्थेनं चौकशी करतात. शाळेसाठी कुठलीही मदत करण्याची त्यांची तयारी असते. शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नांनी आणि पालकांच्या सहकार्याने अमितमधील आणखी काही कौशल्यं दिसून येतील आणि अमित एक दिवस चांगली व्यक्ती म्हणून समाजासमोर येईल यात शंका नाही.

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

विमा कवच द्या

राज्यातील खासगी इस्पितळांकडून कोरोना रुग्णांची लूटमार होत असल्याची चौफेर टीका जनतेमधून झाल्यानंतर सरकारने तत्परतेने हे शुल्क काही प्रमाणात कमी करण्याचे आणि या...

ड्रग्ज प्रकरणात दीपिका, सारा, श्रद्धा यांना समन्स

>> अमली पदार्थविरोधी पथकाकडून होणार चौकशी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रित सिंह आणि...

राज्यात कोरोनामुळे ८ मृत्यू

>> नवीन ५३६ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ३० हजारांजवळ राज्यात चोवीस तासांत नवे ५३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत....

बनावट नोटांप्रकरणी संशयितास मध्यप्रदेशात अटक

पणजी पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणातील मुख्य संशयित नारायण सिंह याला मध्यप्रदेशमध्ये अटक करून गोव्यात आणले आहे.पणजी पोलिसांनी बनावट नोटाप्रकरणी पंजाबामधील पाच जणांना अटक...

रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांचे कोरोनाने निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे काल बुधवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. सुरेश अंगडी यांना या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात...

ALSO IN THIS SECTION

बेलगाम कोरोना….

डॉ. राजेंद्र साखरदांडे लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा,...

मला भावलेले अनिल बाब

कामिनी कुंडईकर विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना....

‘अधिकस्य अधिकं फलम्’

नारायण बर्वे, वाळपई यावर्षी अधिकमास १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. आपणही अधिकमासाची,...

महालय श्राद्ध ः समज/गैरसमज

नारायणबुवा बर्वे आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची थोर परंपरा चालू ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणून आपण सर्वांनी महालय श्राद्ध...