आकाश

0
12
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

प्रत्येक विज्ञान शास्त्रज्ञ आपल्या परीने आपल्याला जाणवलेले ज्ञान सांगत असतो. पण खरे सत्य काय, याची निश्‍चित खात्री कोणीच देऊ शकत नाही. आकाशच आपल्या बुद्धीला खरे हेलकावे देते. आकाशाचे अंतरंग आपल्याला कळत नाहीत हेच आपले अपयश आहे.

मैदानात उभे राहिल्यावर डोक्यावरती दिसते ते आकाश. निळ्या रंगाचे व मनाला आनंद देणारे. डोंगरांच्या व उंच इमारतींच्या शिखरांना टेकलेले. जणू निसर्गानेच एक भव्य मंडप घातला आहे आणि त्याचे छत आकाशाचे बनवले आहे.

आकाशाची मौज अशी आहे की, आकाशाला हात लावायला वरती-वरती गेलो तर आकाश आणखीही वरती-वरती जात असते. शेवटी हात काही लावता येत नाही. आकाशाचा दिसणारा निळा रंग हा भ्रामक असतो आणि तो बदलत राहतो. ढग आकाशात आले की ते रंगी-बेरंगी दिसतात. तेदेखील वार्‍याने वाहत जातात. स्पर्श करायचा म्हटले तर तेही हाताला लागत नाहीत. दुरून त्यांचा भास होतो, पण जवळ गेल्यावर तेही अस्पष्ट वाटतात.

अंतराळ एवढे भव्य आहे की पुढे-पुढे वारा नाही आणि हवा नाही. हवा नसल्यामुळे सजीवांना जो आवश्यक आहे तो प्राणवायू नाही. अर्थात ऑक्सिजन नाही. जेथे ऑक्सिजन नाही तेथे श्‍वासोच्छ्‌वास होऊ शकत नाही. म्हणजे सजीव जगूच शकत नाहीत. म्हणूनच आकाशातून अंतराळात वरती-वरती जाणार्‍या माणसाला ऑक्सिजनचा कृत्रिम पुरवठा घेऊनच जावे लागते.
जून १९६९ मध्ये जेव्हा अमेरिकेचा नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला चंद्रावर माणूस पोहोचलेला तेव्हा त्याचे चित्र आणि त्याचा परिवेश कसा दिसतो त्यावरून कल्पना येईल.

सगळी नक्षत्रे, सगळे तारे, सगळे ग्रह, सगळे उपग्रह आकाशात आहेत का? म्हणजे हे आकाश कसे बरे आहे? ते वरतीच आहे की खालीदेखील आहे? हाच तर खरा चमत्कार आहे!
आपण सगळेच जाणतो की आपली पृथ्वी हा एक गोल आहे. ती अंतराळात आधाराविना उभी आहे. ती नेहमी आपल्या आसाभोवती फिरत राहते. तिच्या दैनिक फिरण्यातून आपल्याला दिवस व रात्र मिळते. दिवसाचा प्रकाश व रात्रीचा अंधार क्षणा-क्षणाला बदलत जातो. त्याच्यातूनच आपल्याला तास, मिनिटे, सेकंद, घटिका मिळत असतात.

असे का बरे! पृथ्वी एकीचकडे स्थिर नाही तर ती भ्रमण करते. त्याच्यामधून महिने, ऋतू, वर्षे इत्यादी पंचांगशास्त्र जन्म घेते. ग्रहांवरून, राशींवरून सजीवांच्या जीवनात छेद-विच्छेद होऊन अनंत योगायोग येतात. त्याचे सूक्ष्म ज्ञान जाणणे हे मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असते. काही बाबतीत मानव आपले अनुमान काढतो; पण सगळ्याच घडामोडी स्पष्टपणे सांगणे हे ज्ञान आजपर्यंत मानवाच्या हातात आलेच नाही. ज्ञात ज्ञानापेक्षा अज्ञात ज्ञान कितीतरी पटीनी जास्त आहे. येथे मानवाच्या बुद्धिशक्तीच्या मर्यादा लक्षात येतात.

आकाशाचा विचार करताना सगळे चमत्कारच आपल्या नजरेसमोर येतात. गुरुत्वाकर्षणाचे एवढे शास्त्र आपण सांगतो. वरून पडलेली वस्तू नेमकी खाली येते हे सांगताना जड वस्तू हवेत आधाराशिवाय राहूच शकत नाही, तर मग पृथ्वीचा गोल आधाराविना कसा बरे उभा राहू शकतो? शतकानुशतके हे निसर्गाचे चक्र कसे बरे चालत असते? मानव पृथ्वीवर जे गगनचुंबी इमारतींचे कृत्रिम वजन निर्माण करतो, ते भारी वजन पृथ्वी कशी बरी पेलते?
आपण आपल्याला जे दिसते तेच स्पष्ट करून आपल्या ज्ञानाची प्रौढी सांगतो, पण हे विश्‍व निर्माण झालेच कसे? ते आजपर्यंत चालतेच कसे? याची कारणमीमांसा अचूकपणे आपण करू शकत नाही. प्रत्येक विज्ञान शास्त्रज्ञ आपल्या परीने आपल्याला जाणवलेले ज्ञान सांगत असतो. पण खरे सत्य काय, याची निश्‍चित खात्री कोणीच देऊ शकत नाही. आकाशच आपल्या बुद्धीला खरे हेलकावे देते. आकाशाचे अंतरंग आपल्याला कळत नाहीत हेच आपले अपयश आहे.

आकाश आपल्याला विचारते- ‘हे मानवा, तुला जसे दिसते तसे नसते. मी तुला जसे दिसते तसे आहे का? मला तू स्पर्श करू शकशील का?’ परमेश्‍वराचे आपण नाव घेतो; पण त्याला स्पर्श करू शकत नाही. चित्र, मूर्ती, प्रतिमा किंवा सेल्फी म्हणजे परमेश्‍वराचे अस्तित्व नव्हे. याचाच अर्थ आकाश परमेश्‍वरासारखे आहे. त्याचा आभास आपल्याला होतो पण संपर्क मिळत नाही.
ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात खोलवर गेल्यावर आपल्या लक्षात येते की, या विश्‍वाची रचना एवढी चमत्कारिक आहे की त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे कोणीच देऊ शकत नाही. म्हणूनच ‘आकाश’ हाच एक फार मोठा चमत्कार आहे.

‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो…’ असेच म्हणून आम्हाला थांबावे लागते. ‘देव’ म्हणजे काय? ही कल्पनादेखील आपण स्पष्ट करू शकत नाही. कारण ‘आकाश’ हा जसा चमत्कार आहे तसा ‘देव’ हादेखील चमत्कारच आहे.
आकाश आपल्याला आमंत्रण देत म्हणते ः ‘हे मानवा, ये माझ्याकडे ये.’ आपण जर आज्ञाधारकपणे जायला निघालो तर आकाश भेटतच नाही. आताच आपल्याला खालून वरती दिसणारे आकाश गेले कोठे? आकाशात उंच उडणार्‍या पाखरांचा आपल्याला हेवा वाटतो. आपल्याला जर पक्ष्यांसारखे पंख असते तर आपणदेखील आकाशात उडत गेलो असतो असा एक विचार मनात येतो. आकाशाला आपण गगन, नभ, आसमान, स्काय अशी वेगवेगळी नावे देतो; पण आकाश म्हणजे काय? याचा अर्थ आपण सांगू शकत नाही हेच तर फार मोठे रहस्य आहे.