Home बातम्या आकाशाला गवसणी घालणारा कसईनाथ डोंगर

आकाशाला गवसणी घालणारा कसईनाथ डोंगर

0

चंद्रकांत रामा गावस

दोडामार्ग हे तालुक्याचे ठिकाण. या गावासाठी कसई दोडामार्ग ही ग्रामपंचायत आहे. गोवा दोडामार्ग बेळगाव हा मुख्य मार्ग दोडामार्ग शहरातून जातो. याच मार्गाने काही अंतरावरून आंबेली गावानजीक हिरव्या गर्द वनराईने नटलेला सुंदर डोंगर दृष्टीस पडतो. या डोंगराच्या पायथ्याशी एका बाजूने आंबेली व कसई दोडामार्ग गाव वसलेला आहे. या डोंगराचे नाव सिद्धअसे असून कसईनाथया नावाने तो प्रसिद्ध आहे. हा डोंगर दोडामार्ग तालुक्यातील उंच डोंगरांपैकी एक आहे. या डोंगरावर आंबेली गावातून चढणे अत्यंत सोपे आहे. या डोंगराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कुठल्याही गावातून पाहिल्यास सारखाच दिसतो. गिरोडे गावातूनही या डोंगरावर जाता येते.

दोडामार्ग तालुक्यात आंबेली गावच्या अगदी जवळच आकाशाला गवसणी घालणारा हा निसर्गमय कसईनाथ डोंगर उभा आहे. तो पाचूच्या रत्नाप्रमाणे शोभायमान दिसतो. या डोंगरावरून फिरत असताना हिरव्यागार जंगलामुळे व थंड वातावरणामुळे पर्यटक मोहरून जातात. पक्ष्यांचे कुंजन, विविध रंगांची फुले, झुळझुळ वाहणारे स्वच्छ व निर्मळ झरे न्याहाळताना पर्यटक आनंदून जातात. हायकिंगसाठी कसईनाथ डोंगर उपयुक्त आहे. विशेषत: श्रावण महिन्यात कसईनाथावरील महादेव लिंगावर अभिषेक करण्यासाठी या डोंगरावर विशालकाय गर्दी उसळलेली दिसते. भाविक लोक आंबेली गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात देवीचे दर्शन घेऊन शेतातून डोंगरावर चढतात. निसर्गसौंदर्याची आवड असणार्‍यांसाठी या डोंगराची सहल म्हणजे विलक्षण संधीच आहे. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी पावसाळ्याच्या दिवसात या डोंगरावर पदभ्रमणासाठी गर्दी करतात. सह्याद्री पर्वताच्या लांबच लांब रांगा, मधूनच दिसणारे इंद्रधनुष्य, पक्ष्यांचा किलबिलाट, सोबत दूरवरून दिसणारा गोवा राज्याचा काही भाग, तालुक्यातील छोटी छोटी रमणीय गावं, नारळी पोफळीच्या बागा, काजूची बने, तिळारी धरणामुळे झालेली हरितक्रांती हे सर्व या डोंगरावरून पाहताना मन तृप्त होते.

पुराणकाळात पांडव अज्ञातवासात असताना या डोंगरावर वस्तीला होते. त्यांनी महादेव लिंगाची स्थापना केली असावी या आख्यायिकेला अनुसरून काही पाषाणी मूर्ती गणपती, महादेव, नंदी येथे आढळतात. त्यांची पूजा करण्यासाठी श्रावण महिन्यात अनेक भाविक भक्तगण या स्थळी गर्दी करतात. रांगा रांगा करून महादेव लिंगावर अभिषेक करतात. या डोंगरावर काही गुहा दृष्टीस पडतात. मोठमोठे खडकही आढळतात. तेथे सिद्ध महापुरुष चिंतन करीत असतील असे संशोधकांना वाटते. आज गोव्यात येणारे अनेक पर्यटक व गिर्यारोहणासाठी अनेक युवक युवती या निसर्गरम्य कसईनाथ डोंगराकडे धाव घेतात. म्हणून कसईनाथ येथे पर्यटन केंद्र होणे अत्यंत गरजेचे आहे.

दोडामार्ग तालुक्यात एकापेक्षा एक सरस अशी अविकसित पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. तसेच तळकट, कोलझर, झोळंबे, कुंब्रल, कुडासे, घोटगे, मोर्ले अशी अनेक गावे हिरवाई व फलसमृद्ध आहेत. या गावात नारळ, पोफळी, काजू, आंबा यांच्या सुंदर बागा आहेत. ‘तळकटची वनबागजिला खरं तर कोकणची राणीची बागहेच नाव द्यायला हवं. पर्यटकांना विशेषत: शाळांच्या सहलीमधून बालगोपाळ इथे मंत्रमुग्ध होतात. अशा या निसर्गरम्य शीतल गावात एक छोटेसे पण मनोवेधक हिरवाईने नटलेले शिरवल धरणप्रसिद्ध आहे. या धरणाच्या पाण्यामुळे तीनशे कुटुंबे शेती करून आपली गुजराण करतात. निबिड रानातील तीन बाजूचे डोंगर आणि चौथ्या बाजूला प्रचंड दगडी भिंत बांधून हे धरण बांधलेले आहे. इथे येणारा पर्यटक धरणाच्या आजूबाजूचा निसर्ग परिसर व धरणाची भव्यता पाहून स्तिमित होतो. याच भागात म्हातारघाटी आहे. अंधारातून धडपडणार्‍या वाटसरूला म्हातारबाबा आपल्या चुडीचा प्रकाश दाखवून सोबत करतो अशी जुनी आणि परंपरागत श्रद्धा आहे. तेथे भाविकांनी सांस्कृतिक केंद्र उभारलेले आहे. तेथे भाविकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम नित्यनेमाने होतात. भक्तगणांनी उभारलेली ही वास्तू श्रद्धा आणि सामाजिक बांधीलकी यांचे अद्वैत पर्यटकांना दाखविते. सह्याद्रीच्या कुशीत सिंधुदुर्ग व कर्नाटक राज्यांच्या मधोमध वसलेल्या मांगेली गावी पावसाळ्यात फेसाळणारा मांगेलीचा धबधबापर्यटकांना आकृष्ट करीत आहे. या ठिकाणाला निसर्गाचं मोठं वरदान लाभलेलं आहे. हा निसर्गरम्य फेसाळणारा धबधबा पाहण्यासाठी अलीकडे बरीच गर्दी होत आहे. त्याशिवाय फुकेरी येथील हनुमंतगड ऐतिहासिककालीन अनुभवाचे प्रतीक आहे. या गडाला निसर्गाची संपदा लाभलेली आहे. चहूबाजूंनी डोंगर आणि त्यात हा जुना भग्नावस्थेतील गड पाहण्यासाठी पर्यटक आपली हजेरी लावत असतात. निसर्गरम्य दोडामार्ग तालुक्यातील निसर्गस्थळे महाराष्ट्र शासनाने पर्यटनदृष्ट्या विकसित करावी हीच अपेक्षा!