आईचे दूध बाळासाठी अमृत!

0
11
  • डॉ. मनाली महेश पवार

माता नोकरदार असो वा घरी राहणारी, सामान्य बाळंतपण असो वा शस्त्रक्रिया- स्तन्यपान हा बाळाचा हक्क आहे. त्यामुळे कमीत कमी सहा महिने तरी बाळाला हक्काचे दूध पाजायलाच हवे. दूध नाही असे कधीच होत नसते. बाळाला हातात घेतल्यावर ममतेला पाझर हा फुटतोच; फक्त गरज असते ती बाळंतिणीला हळुवार, प्रेमाने सांभाळण्याची व तिच्या भोवती सकारात्मक वलय निर्माण करण्याची.

स्तन्यपानाचं महत्त्व भारतात तरी अनेकांना माहीत आहे. तरीही ‘स्तन्यपानाचं महत्त्व’ सगळ्यांनाच कळावं किंवा स्तनदा मातेच्या अडचणी सगळ्यांनाच कळाव्यात म्हणून ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तन्यपान सप्ताह’ म्हणून जगभर साजरा केला जातो.
खरे तर मातेच्या दुधाची महती न जाणणारी एकही व्यक्ती नसेल. साधारणपणे बाहेरच्या दुधापेक्षा मातेचेच दूध चांगले एवढे तरी सर्वांनाच माहीत आहे. तो बाळाचा नैसर्गिक आहार आहे. बाळ जन्मल्यानंतर एका तासाच्या आत स्तन्यपानाला सुरुवात झाली पाहिजे. आता तर नैसर्गिक प्रसूती असल्यास बाळाला लगेच स्तन्यपानासाठी आईकडे दिले जाते व सिझर असल्यास रुग्णाला जाग आल्यावर लगेच अर्ध्या तासाच्या आत बाळाला स्तन्यपान दिले जाते.

प्रथम स्रवणाऱ्या दुधाला चीक दूध म्हणतात. हे दूध खूप कमी प्रमाणात असते. पण बाळासाठी तेवढे पुरेसे असते. मात्र आईला व इतरांना बाळ रडायला लागले की ते भुकेसाठी रडते असेच वाटते व लगेच बाळाला वरचे दूध (पावडर) घातले जाते किंवा पूर्वीच्या काही जाणकार साखरेचे पाणी भरवत. आता काही ठिकाणी ग्लुकोज सलाईनचे पाणीही पाजतात. बाळ जन्माला आल्यावर बाहेरच्या वातावरणात समरस व्हायला काही काळ लागतो, त्यामुळे बाळ रडणे हे साहजिकच आहे. कधीकधी इतर कारणेही असू शकतात. त्यामुळे आईचे चीक दूध व्यवस्थित स्रवत असेल तर बाळाला दर दोन तासांनी स्तन्यपान करावे. कारण चीक दुधाने बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. बाळाला पहिले सहा महिने केवळ मातेचे दूध द्यावे. त्याने बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होते.
माहिती आणि ज्ञानाचा अभाव असल्याने आपल्या देशात अजूनही 50 टक्केच स्तनपान होते. म्हणूनच मातेला आवश्यक पाठिंब्याची, मदतीची, मार्गदर्शनाची गरज असते. एकत्र कुटुंबामध्ये स्तनदा मातेजवळ आई, आजी, सासू, नणंद, जाऊ, वहिनी असे कुणीतरी असायचे. त्यामुळे आधार होता. काही माहिती मिळायची, मदत मिळायची. आता काहीसे चित्र कुठे कुठे वेगळे दिसत आहे.

नवजात शिशू आणि माता ही दोघेही एकमेकांना अनोळखी असतात. बाळ अधिकच नाजूक असते, त्याचप्रमाणे आईची प्रकृतीही प्रसवानंतर काहीशी नाजूक झालेली असते. त्यामुळे बाळ रडते तर का रडते? त्याला किती दुधाची आवश्यकता असेल? स्तन भरून आले तर काय करायचे? बाळाच्या रडण्याने ती व्याकूळ होते. बाळ रडण्याचे एकच कारण तिला जाणवते व ते म्हणजे भूक. त्यामुळे बाळाला केवळ चीक दूध पुरेसे आहे ना? त्याने पोट भरेल का? अशी काळजी मातेला वाटत असते.
पंधरा ते वीस वेळा सारखे बाळाला पुन्हा पुन्हा स्तनाला लावावे लागते. बाळ कधी तोंड लावत नाही, तर कधी त्याला ओढता येत नाही. काही वेळा बाळाला शिकायला वेळ लागतो. आणि त्यातही इतरांनी सारखे नको ते सल्ले दिले व गडबड करून वरचे दूध दिले तर बाळाला स्तन ओढणे शिकायला अजूनही उशीर होतो. येथे कंटाळा करून किंवा दमून चालत नाही. बाळाला वरचे वर स्तनाला धरणे आवश्यक असते म्हणून स्तनदा मातेला इतरांच्या आधाराची, मदतीची गरज असते.
हा आहार फक्त प्रसूतीनंतर एवढाच मर्यादित नाही, तर आईने स्वतः स्वतःची काळजी व स्तन्यपानासाठी पूर्वतयारी ही गर्भिणी अवस्थेपासूनच केली पाहिजे. आज सद्यकाळात नैसर्गिक गर्भारपणापासून नैसर्गिक प्रसूतीही दुर्मीळ झाली आहे. मुलामुलींचे वाढते लग्नाचे वय हे याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे कृत्रिम गर्भारपण व नंतर अनैसर्गिक प्रसूती यामध्ये भरपूर वाढ झाली आहे आणि याचा परिणाम आईच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे. त्यामुळे स्तन्यनिर्मितीवर याचा मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर चुकीचे सल्ले व अज्ञान याचा मोठा परिणाम स्तन्यपानावर होत आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला स्तन्यपान, प्रसूतिपूर्व व प्रसूतीनंतर स्तनांची घ्यावयाची काळजी हे कळणे महत्त्वाचे आहे.

  • बाळाला अंगावरचे दूध पाजण्याकरिता आईची मानसिक तयारी पाहिजे. त्यातून ती स्तनांची व स्वतःची नीट काळजी घेईल.
  • गर्भवती महिलांनी दररोज स्वच्छ आंघोळ केली पाहिजे. स्तन व स्तनाग्रे कमीत कमी एक वेळा मऊ साबण व पाण्याने धुवावे.
  • गर्भिणी स्त्रीने आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे. कारण ज्यांचा रसधातू चांगला असतो त्यांचा रज, आर्तव धातू उत्तम असतो, व गर्भिणी अवस्थेमध्ये या रज-आर्तवापासूनच स्तनाची निर्मिती होते म्हणूनच गर्भिणी अवस्थेत रसपोषक आहार घ्यावा.
  • दूध म्हणजे गर्भिणीला आवडेल असा मधुर, आम्ल, द्रव आहार द्यावा. दूध, तूप, खीर, पायस, फळे (पपई व अननस सोडून) सर्व फळे, फळांचा रस, सर्व प्रकारच्या भाज्या, उसळी, कडधान्यांचे यूष, जीवनीय अशा प्रकारचा आहार, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या यातून जीवनावश्यक भाग मिळेल याची खबरदारी घ्यावी. दुधाचा वापर अधिक करावा.
  • दूध हे स्त्रीच्या व गर्भाच्या पुष्टीला आणि दृढतेला कारणीभूत असते. गर्भशरीरातील मांस वाढवण्याची क्षमता दुधामध्ये असते. त्यामुळे गर्भिणी अवस्थेमध्ये दूध हे परमौषध आहे. त्याचप्रमाणे अश्वगंधा, शतावरी, गोरुख, ज्येष्ठमध, भुईकोहळा यांचा नित्य वापर ठेवावा.
  • मांसाहारी लोकांनी दुधाऐवजी मधुर आणि लवण असा मांसरसही घेण्यास हरकत नाही.

अशी योग्य पद्धतीने गर्भिणी अवस्थेत स्वतःची काळजी घेतल्यास योग्य तऱ्हेने स्तन्यनिर्मिती होते. प्रसूतीनंतरचा काळही तेवढाच महत्त्वाचा आहे. नॉर्मल प्रसूती झालेल्या, बाळंतपणाची दुसरी वेळ असणाऱ्यांना स्तन्यपानाचा फारसा त्रास होत नाही. पहिलटकरीण, सिझेरियन झाले असल्यास, बाळ वेळेआधी जन्मले असल्यास, जुळी बाळे झाली असल्यास स्तन्यपान जरा उशिरा सुरू होते. त्यामुळे या काळात डॉक्टरांच्या विशेष सल्ल्याने आजूबाजूच्या इतर मंडळीनी आईला सांभाळणे फार महत्त्वाचे असते. या काळातही गर्भिणी अवस्थेप्रमाणे आहारावर विशेष ध्यान द्यावे. शतावरी कल्पसिद्ध दूध भरपूर प्रमाणात द्यावे. जास्तीत जास्त पातळ आहार आईला द्यावा. भरपूर पाणी प्यायला द्यावे व आईला आनंदी ठेवावे.
माता नोकरदार असो वा घरी राहणारी, सामान्य बाळंतपण असो वा शस्त्रक्रिया- स्तन्यपान हा बाळाचा हक्क आहे. त्यामुळे कमीत कमी सहा महिने तरी बाळाला हक्काचे दूध पाजायलाच हवे. दूध नाही असे कधीच होत नसते. बाळाला हातात घेतल्यावर ममतेला पाझर हा फुटतोच; फक्त गरज असते ती बाळंतिणीला हळुवार, प्रेमाने सांभाळण्याची व तिच्या भोवती सकारात्मक वलय निर्माण करण्याची.

स्तन्यपानाचे महत्त्व

  • आईच्या दुधामध्ये बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्याचे बळ असते.
  • आईच्या दुधात सर्व पौष्टिक घटक असतात व बाळाला हे दूध सहज पचते.
  • आईच्या दुधाचे तापमान योग्य प्रमाणात असल्याने बाळाला हवे तेव्हा लगेच देता येते.
  • बाळ जर वेळेआधी जन्मले असेल तर नैसर्गिकरीत्याच आईच्या दुधात बदल होतात व कमी वजनाच्या बाळासाठी हे दूध अत्यंत पोषक बनते.
  • आईच्या दुधात असणाऱ्या सर्व घटकांमुळे बाळाची मानसिक, शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होते.
  • वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांपासून बाळाचे रक्षण होते.

जसे बाळाच्या वाढीसाठी स्तन्यपान महत्त्वाचे आहे, तसेच स्तन्यपान करण्याने आईलाही त्याचा फायदा होतो.

  • आईला मानसिक समाधान मिळते.
  • प्रसूतीनंतर गर्भाशयाचे आकारमान पूर्ववत होण्यास मदत होते.
  • स्तन्यपानाचा कालावधी गर्भनिरोधकाप्रमाणे काम करतो.
  • स्तन्यपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तन व स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी असते.
    आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होणार नाही. त्यामुळे आईचे दूध हेच बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आईचे दूध हे बाळासाठी अमृतच आहे. त्यामुळे चला स्तनदा मातांना आधार देऊ…