आंधळा अन्‌‍ पांगळा

0
5
  • प्रज्वलिता गाडगीळ,
    साखळी

एकदा एक आंधळा आणि एक पांगळा प्रवास करीत होते. एका नदीच्या काठी ते दोघेही पोहोचले. पुरामुळे नदीला खूप पाणी आले होते. अशा स्थितीत नदी पार कशी करायची असा मोठा बाका प्रसंग त्यांच्यापुढे उभा राहिला होता. थोडावेळ दोघांनी विचार केला. तसा आंधळा हुशार होता. तो पांगळ्याला म्हणाला, “गड्या, मला पाय आहेत पण डोळे नाहीत, आणि तुला डोळे आहेत पण पाय नाहीत. तेव्हा तुझे डोळे आणि माझे पाय असा वापर करून दोघेही मिळून नदी पार करूया? तू माझ्या पाठीवर बस आणि पुढे कसं जायचं त्याची दिशा मला तू दाखव.” त्यानंतर पांगळा म्हणाला, “ठीक आहे.”
पांगळा आंधळ्याच्या पाठीवर बसला. पण नदीच्या प्रवाहात पांगळ्याचं सांगणं आणि आंधळ्याचं चालणं यांचा काही ताळमेळ बसेना. पाण्यातून चालणं आणि जमिनीवरून चालणं या दोन्हीत फार फरक आहे हे त्यांना कळून चुकलं. नदी पार करताना डोळेही हवेत आणि पायही हवेत. आणि पुन्हा वेळप्रसंगी पाण्यात पोहताही यायला हवं. एकमेकांशी उसनवारी करून नदी पार करता येत नाही. त्यामुळे त्या दोघांनी नदी पार करण्याचा नाद सोडून दिला. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जो भवसागर पार करून जायचं असतं त्यासाठीसुद्धा पाय हवेत आणि डोळेही हवेत. हे पाय म्हणजेच भक्ती आणि डोळे म्हणजे ज्ञान. म्हणून संत असा असावा ज्याच्या ठायी अपार भक्ती असावी, अथांग आत्मज्ञानसुद्धा असावं. यांपैकी एक आहे पण दुसरा नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही.
त्याच्याजवळ केवळ अज्ञान असतं त्याची स्थिती डोळे असून पाय नसलेल्या प्राण्यासारखी असते आणि ज्याला केवळ भक्तीच ठाऊक आहे त्याची गत पाय आहेत, पण डोळे नसलेल्या आंधळ्यागत असते. हे दोघेही परमात्मा प्राप्त करू शकत नाही असे आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.