आंदोलनाचा सर्वांना अधिकार; पण एक निश्चित कालमर्यादा हवी

0
11

सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; सीजेपीच्या
आंदोलनाशी संबंधित याचिकांवर घेतली सुनावणी

काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलकांवर केलेल्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलनस्थळांबाबत एक मोठे विधान केले. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र कुठलाही आंदोलक किंवा संघटना आंदोलन स्थळावर अमर्यादित काळासाठी कायमस्वरूपी कब्जा करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांचे खंडपीठ ऑक्टोबरमध्ये दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधित याचिकांवर सुनावणी करत होते. यामध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांची कारवाई, लोकांची अटक, पाळत ठेवणे आणि आंदोलनाच्या जागा व व्यवसायांचे नुकसान यासंबंधीच्या बाबींचा समावेश होता.

शेतकरी, पत्रकार यांच्यासह प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र यासाठी एक निश्चित कालमर्यादा असली पाहिजे. एखादा समूह त्यांचे आंदोलन सुरू आहे म्हणून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्यांची ये-जा थांबवू शकत नाही, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले.

जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या या याचिकांवरील सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना सांगितले की, जंतर मंतर हा एक सार्वजनिक रस्ता आहे. आंदोलन स्थळ नाही. कुठल्याही परवानगीशिवाय कुणालाही संसद किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या जवळ जाण्याची अनुमती देता येत नाही, असा युक्तिवादही तुषार मेहता यांनी केला.

नुकसान झाल्याचा व्यापाऱ्यांचा दावा
सुनावणीदरम्यान, दिल्लीतील व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, आंदोलनांचा दिल्लीतील व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. सणासुदीच्या काळात दुकाने बंद राहिली आणि विक्रीत मोठी घट झाली. व्यवसायांना अंदाजे 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी न्यायालयाला पुढील दोन महिन्यांसाठी कोणत्याही आंदोलनांवर किंवा धरणे आंदोलनांवर बंदी घालण्याची विनंती केली.