विधेयकावरील चर्चेवेळी प्रियांका गांधींचा सवाल
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक मांडल्यानंतर कालपासून चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत विविध पक्षांच्या खासदारांनी सहभाग घेतला. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी या विधेयकावर बोलताना भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि एके-47 वापरण्याची गरज का भासली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी की अमित शहांनी दिले? असा प्रश्न प्रियांका गांधींनी विचारला. प्रियांकांनी यावेळी सरकारने नव्याने स्थापन केलेल्या टास्क फोर्सवरही टीका केली.
सदर विधेयकावर मंगळवारी लोकसभेत बोलताना प्रियांका गांधी यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. संसद परिसरात धर्मेंद्र प्रधान यांचे जल्लोषात स्वागत करण्यावरुन देखील प्रियांका गांधींनी नाराजी व्यक्त केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याता आला. पण, संसदेत प्रधान यांचे स्वागत अशा पद्धतीने केले जणूकाय सुपरस्टार आला आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळीच त्यांनी नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावरही टीका केली. नव्या शिक्षण मंत्र्यांनी बलात्कारातील आरोपींच्या सुटकेवर सहमती दर्शवली होती, असा आरोप त्यांनी केला. यानंतर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. सत्ताधारी आणि काँग्रेसने गोंधळ घातल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला.
लोकसभा अध्यक्षांची सूचना
चुकीची माहिती दिल्याप्रकरणी प्रियांका गांधी यांच्यावर कारवाई करण्याची आणि वक्तव्य हटविण्याची माफी मागण्याची मागणी नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केवळ विधेयकावर चर्चा व्हावी असे स्पष्ट करत तो विषय सोडून देण्याची सूचना केली.
अखिलेश यादवांकडूनही टीकास्त्र
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी देखील पेपरफुटीवरुन भाजपा सरकारवर टीका केली. ते बोलत असताना मंत्री किरेन रिजिजू यांनी आंदोलनावरुन आणीबाणीची आठवण करुन देत प्रश्न उपस्थित केला, त्यावर अखिलेश यादव यांनीही खास शैलीत प्रत्युत्तर दिले. मी आणीबाणीचा काळ तर बघितलेला नाही; पण आणीबाणीत जे काही घडले ते आता राजधानी दिल्लीत बघायला मिळाले. अश्रूधुरांच्या नळकांड्या, लाकडाला खिळे मारलेले, त्यावेळी विजेचा शॉक लावला जात नव्हता यावेळी शॉक लावण्यात आला होता. हा आणीबाणीसारखाच हल्ला होता, अशी टीका अखिलेश यादव यांनी किरेन रिजिजू यांना प्रत्युत्तर देताना केली. आणीबाणीनंतर देशात परिवर्तन झाले होते यावेळी देखील होईल, असेही अखिलेश यादव पुढे म्हणाले.

