आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्राकडून नवी नियमावली

0
12

>> गृहविलगीकरणाच्या नियमात बदल

>> नियमावली मंगळवारपासून लागू

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेत आता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. केंद्राने जारी केलेली नवी नियमावली येत्या ११ जानेवारीपासून अर्थात मंगळवारपासून लागू होणार आहे. या नियमावलीनुसार परदेशातून, त्यातही ओमिक्रॉनचा जास्त धोका असलेल्या देशांतून भारतात येणार्‍या प्रवाशांच्या गृहविलगीकरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. जगभरात ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढत आहे. भारतालाही याचा फटका बसत असून सध्या भारतात ओमिक्रॉनबाधितांची संख्या तीन हजारांवर गेलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही नवी नियमावली जारी केली आहे.

७ दिवसांचे गृहविलगीकरण
केंद्राने जारी केलेल्या नियमावलीनुसार, आता भारतात येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे प्रवासी ओमिक्रॉनबाधित देशांच्या यादीतील नसले तरीही त्यांना ७ दिवसांचा गृहविलीकरणाचा कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे.
दरम्यान, ज्या देशांचा समावेश ओमिक्रॉनबाधित देशांच्या यादीतआहे अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना गृहविलगीकरणात रहावे लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावे लागेल.
विमानतळावर उतरल्यानंतर या प्रवाशांना त्यांच्या चाचण्यांचे अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावे लागेल. त्यानंतरच ते त्यांच्या इच्छित स्थळी जाऊ शकतील. जर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांनी ७ दिवस गृहविलगीकरणात रहावे व आठव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करावी. या चाचणीचा अहवाल त्यांना एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. संबंधित राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन याची खात्री करेल.

ही दुसरी चाचणी जर निगेटिव्ह आली तर त्यापुढील ७ दिवस त्यांना सतर्क राहण्याबाबत आणि काळजी घेण्याबाबत सांगितले जाईल. मात्र, जर अशा प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर त्यांचे अहवाल जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील. त्यांना क्वारंटाईन करून नियमानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. अशा प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात येईल. यासंदर्भात पूर्ण आणि सत्य माहिती ऑनलाइन एअर सुविधा पोर्टलवर देण्याचे आवाहन केंद्राने प्रवाशांना केले आहे.