केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ई-व्हिसा सुविधा सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने काम करीत आहे. त्यामुळे देशातील पर्यटन क्षेत्राला, विशेषत: गोव्यासारख्या राज्यांसाठी लक्षणीय चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काल केले. केंद्रीय मंत्री प्रसाद हे गोवा दौऱ्यावर असून त्यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती.
केंद्र सरकार देशाला भेट देऊ इच्छिणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी व्हिसा सुविधा सुलभ करण्याच्या दिशेने काम करत आहोत. गोव्याला प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देण्यावर त्यांनी भर दिला. पीपीपी मॉडेलद्वारे गोव्यातील समुद्रकिनारे, वारसा स्थळे आणि पर्यावरणीय पर्यटन स्थळांच्या पुनर्विकासाला चालना दिली जाणार आहे. इको-टुरिझम रिसॉर्ट्स्, होमस्टे विकसित करण्यासाठी देखील कर्ज सुविधा उपलब्ध केली जाईल अशीही घोषणा प्रसाद यांनी केली.

