समितीवरील दोन सत्ताधारी आमदार मायकल लोबो व विष्णू सुर्या वाघ यांनी अहवालास मान्यता दिलेली नाही, त्यावरून हा अहवाल कशा पध्दतीने तयार केला गेला त्याची कल्पना येते. आपल्या कारकिर्दीतच गुन्हेगारांना शिक्षा झाली होती. आपण या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचे ठरविले होते व पत्रही पाठविले होते. विधानसभेतही कोणीही चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली नव्हती. मिकींना खुश करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केल्याचे नाईक यांनी सांगितले. आपण रेव्ह पार्ट्यां, फूल मून पार्ट्यां बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे किनारी भागातील काही राजकारणी वैफल्यग्रस्त बनले. येत्या २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकारण्यांना आपली भीती वाटते, त्युमळे सूड घेण्याचा व बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे नाईक यांनी सांगितले.
फोंडा पालिका निवडणुकीत प्रचाराचे काम करणार्या युवकांनाही वरील अहवालात गोवल्याचे ते म्हणाले. वर्तमानपत्रांतून आलेल्या बातम्यातील मजकूर वगळता अन्य काहीही या अहवालात नसल्याचे त्यांनी सांगितले. आपले पुत्र रॉय याने यापूर्वीच यासंबंधीचा खुलासा केला होता. आपण गृहमंत्री असताना एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणी मिकी तुरुंगात गेले होते. आपण पोलिसांच्या कारभारात कधीही हस्तक्षेप केलेला नाही. धोरण ठरविण्याचेच काम केल्याचे ते म्हणाले. गेली ३५ वर्षे म्हणजे जनमत कौलापासून आपण राजकारणात आहे. बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आपण नेहमीच झटत असल्याचे ते म्हणाले.