अहंकार

0
12
  • प्रा. अशोक कृष्ण मोये

एखादा माणूस समजा उच्च पदावर आहे व त्या पदाचा त्याला अहंकार झालेला असेल व दुसरे माणूस त्याच्याकडे एकदमच दुर्लक्ष करीत असतील तर त्याने जाणून घ्यावे की त्याच्या अंगी संचारलेल्या अहंकाराला दुसरा माणूस बिलकूलच भीक घालत नसतो.

अहंकार हा मनुष्य स्वभावाचा जणू एक प्रकार आहे. अहंकार हा माणसाकडे असलेल्या संपत्तीमुळे, विद्वत्तेमुळे, शक्तीमुळे व काही अन्य कारणांमुळे येऊ शकतो. इतकेच नव्हे तर काही माणसांना त्याची अर्धांगिनी एक उच्च शिक्षित, एक जबरदस्त अशा अधिकारपदावर विराजमान झालेली असल्यास- अर्थातच तिचा लठ्ठ पगार असल्याने- त्याच्यात अहंकार येऊ शकतो. माणूस कितीही धनाड्य असला, जरी त्याच्या पायाकडे लक्ष्मी लोळण घेत असली, माणूस कितीही उच्च शिक्षित असला, तो कोणत्याही उच्च स्तरावर विराजमान झालेला असला व त्याच्याकडे या विश्‍वातील कोणतीही वस्तू खेचून आणण्याची ताकद असली तरी त्याने लीन असेच जीवन जगले पाहिजे. आपल्या अंगी भिनलेला अहंकार दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ अशी एक म्हण आहे. जर एखादा माणूस कोणतीही गोष्ट त्याच्या जीवनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिला तर तो त्यात नक्कीच सफल होऊ शकतो. प्रत्येकाने त्याच्या-त्याच्या वागणुकीतून वाईट गुण बाजूला सारून चांगले विचार आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपले जीवन क्षणभंगुर आहे व तसे प्रयत्न करण्यासाठी माणसाला आयुष्यमानाची मर्यादा बाळगण्याची बिलकूलच गरज नाही. एक अहंकारी माणूस आपल्या वागण्यात अहंकार संचारला आहे हे आपणहून जाणू शकतो. आता सवाल असा पडतो की तो ते कसा जाणू शकतो? त्याचे उत्तर सहजासहजी त्याच माणसाला मिळू शकते असे मला तरी वाटते. समजा एक माणूस कुठल्याही कारणाने असो- जर अहंकार त्याच्या अंगात भिनलेला असेल तर त्याने आपणहून दुसर्‍याच्या त्याच्याशी असलेल्या वागणुकीवरूनच ताडले पाहिजे व ते नक्कीच करता येईल. जर एखादा माणूस समजा उच्च पदावर आहे व त्या पदाचा त्याला अहंकार झालेला असेल व दुसरे माणूस त्याच्याकडे एकदमच दुर्लक्ष करीत असतील तर त्याने जाणून घ्यावे की त्याच्या अंगी संचारलेल्या अहंकाराला दुसरा माणूस बिलकूलच भीक घालत नसतो. बिलकूलच किंमत देत नसतो. म्हणून माणसाने कुठल्याही कारणास्तव अहंकारी न होता लीन अशीच वागणूक ठेवली पाहिजे. हे मी जरी एक विद्वान माणूस नसलो, एक साधासुधा माणूस असलो तरी पण माझे वैयक्तिक प्रांजळ मत असेच आहे आणि बहुतेक जण या मताशी सहमत असतील असे मला वाटते.

आता मी एक प्रत्यक्ष जीवंत अनुभवलेले उदाहरण देतो जे या मुद्यावर नक्कीच प्रकाशझोत टाकेल. ५०-६० वर्षांतील गोष्ट. गोव्यातीलच. एका शहरातील एक उच्च शिक्षित माणूस त्याच्या शैक्षणिक पात्रतेमुळे व एक व्यावसायिक म्हणून प्रसिद्धीस आलेला. अर्थातच त्याच्याकडे उच्च स्तरातीलच लोक कामासाठी येत व त्याच्या जबरदस्त फीमुळे तो करोडपती झालेला. याच दोन कारणांमुळे त्याच्या अंगात अहंकार भिनला होता. त्यामुळे तो कुणालाच केव्हाच चुकूनही हास्य करीत नसे किंवा ‘हॅलो’ करत नसे. एखाद्या जवळच्या व्यक्तीला पाहताच आपली मान फिरवीत असे. एक वर्ष गेले, दहा वर्षे गेली, वीस वर्षे गेली… एवढेच नव्हे तर आयुष्यातील ७०-८० वर्षे गेली. अर्थातच जीवन संपण्याच्या मार्गावर आले व वयस्क झाल्याने या माणसाला चालून जायलासुद्धा जबरदस्त प्रयत्न करावे लागत. तो थरथरत असे. एक पाऊल टाकण्यास ५-६ मिनिटे लागायची. पण कोणीही दुसरा माणूस त्याचा हात पकडायला, त्याला मदत करायला पुढे येत नसे. हे मी पाहिलेले प्रत्यक्ष उदाहरण. एक दिवस या अतिअहंकारी माणसाला त्याच्या कार्यालयाजवळ त्याच्या चालकाने सोडले. त्यावेळी त्याला चालून कार्यालयात जाण्यासाठी एक खळी (चर) पार करावी लागे. ती पार करण्यासाठी प्रयत्न करताना त्याला १०-१५ मिनिटे तरी पराकाष्टा करावी लागली. तेव्हा पाहावत नसल्याने मी माझ्या तेथेच काम करत असलेल्या व अर्थातच माझा परिचय असलेल्या माणसाला त्याचा हात पकडून मदत करण्याची विनंती केली. (त्या दिवसांत मला जबरदस्त असा रक्तदाबाचा अचानकच धक्का बसल्याने मी हॉस्पिटलमध्ये चार दिवस राहून त्याच दिवशी बाहेर पडलो होतो. त्यामुळे मला पण ताकद नसल्याने मी त्याला मदत करू शकलो नाही.) पण त्या माणसाने माझी हसूनच ती विनंती झिडकारली व हा माणूस खाली पडला तरी त्याला उठवायला कोणीच पुढे येईल असे आपणाला वाटत नसल्याचे सांगून या अतिअहंकारी माणसाला ईश्‍वरानेच ही शिक्षा दिली असल्याचे म्हणाला.
आता आपणच ठरवा की अहंकार माणसाला किती घातक पडू शकते. म्हणूनच लीन अशीच वागणूक ठेवा. दुसर्‍याशी चांगली वागणूक ठेवा. कुणालाही तुच्छ लेखू नका. कारण हाच तुच्छ लेखलेला माणूस संकटकाळी आपल्याला मदत करून आलेले संकट टाळू शकतो. शक्यतो रोजच्या रोज मिळत असलेल्या माणसाशी, शेजार्‍यांशी होता होईतो चांगले संबंध ठेवा. त्यांना स्मितहास्य करून ‘हॅलो’ म्हणा अशी माझी विनंती आहे. बहुतेक अहंकारी माणूस ती आचरणात आणतील अशी मी आशा करतो.