31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

अस्त

  • अंजली आमोणकर

देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’ म्हणजे काय? सत्व-रज-तम हे जे त्रिगुण आहेत त्यापलीकडे जा. असा जो जातो तो जीवनावर स्वार होतो. त्याला ‘अस्ताचे’ भय उरत नाही.

खिडकीतून सूर्यास्ताचा देखावा पाहत उभी होते. अस्ताचलास जाणारा तो तेजोनिधी कितीतरी वेगवेगळ्या रंगछटांची उधळण करीत होता. मला त्याचवेळी सूर्योदयासमयी पाहिलेले आकाश आठवले. सूर्योदयापूर्वी आभाळ असेच लालिमा घेऊन येते. तद्नंतर सूर्याचे दर्शन घडते आणि वातावरण प्रसन्नतेने भरून जाते. आशा, सकारात्मकता, उमेद, आत्मविश्‍वास बरोबर घेऊन आलेला तो ‘रवि’ सर्वांना उत्साहाने कामाला लावतो. दुपारी तर त्याच्या तळपण्याने उच्चांक गाठलेला असतो. पण थोड्याच अवधीत तो भास्कर आपले तेज आवरून घ्यायला सुरुवात करतो. अशीच सांजवेळ येऊन ठेपते. मन कातर होते. आता तो काळाकुट्ट अंधार सर्वांनाच आपल्या कवेत घेणार! आई जशी घाबरलेल्या लेकरांना पदराखाली आपल्या उबेत घेते, तशीच निद्रादेवी या पृथ्वीतलावर धावत येऊन समस्त उदासीन लेकरांना आपल्या कुशीत घेत म्हणेल- ‘झोपा आता. सूर्यदेव उद्या परत नक्की येतील.’ त्या आश्‍वासक शब्दांमध्ये काय जादू असते की सगळेच निर्धास्तपणे निद्रादेवीच्या अधीन होतात.

‘अस्त होणे’ जर सूर्यदेवालाही चुकले नाही, तर आपण या पृथ्वीवरचे यःकश्‍चित प्राणी! आपल्यास कसे चुकेल अस्तास जाणे! सूर्यदेवाचे जिवांना प्राणशक्ती देणारे तळपते तेज निष्प्रभ होणार, निरुपयोगी ठरणार, शक्तीहीन होणार आणि शेवटी अस्तंगत होणार- एका अंधार्‍या पोकळीत शिरणार. पण आपणही सूर्यदेवाप्रमाणे सकाळी, दुपारी, थोडेथोडे संध्याकाळीही कार्यरत होतोच ना? निद्रादेवी काय म्हणाली? ‘उद्या सूर्यदेव नक्की येतील!’ त्या आशेवरच ती होती. पण तिला जशी खात्री आहे सूर्यदेवांच्या परत येण्याची, तशी आपल्याला कुठे पृथ्वीवर परत येण्याची खात्री आहे? तीही मनुष्य रूपात!! नाहीच ना? म्हणूनच आपल्याला अस्ताची भीती वाटते, म्हणून संध्याकाळ कातर होते, म्हणून तो अंधार नकोसा होतो, आणि म्हणूनच खरं तर माणसाला मृत्यूचे भय वाटते. हो ना?
गीतेत जरी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले- ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…’ आत्मा अमर आहे वगैरे वगैरे, तरी गेलेल्या व्यक्तीचं पुनरागमन कुठे-कसं-केव्हा होणार हे गुलदस्त्यातच राहतं. त्यापेक्षा देव असं का करीत नाही की ज्यांनी सबंध आयुष्य सहवासाने एकत्र घालवलं त्यांचा अस्तही एकत्रच व्हावा.

काहीही विचार केला तरी हे अस्ताला जाणे थांबणार आहे थोडेच! हा तर प्रकृतीचा नियम आहे… म्हणूनच त्याला सामोरे जायचे. पण मग कसे तर त्याला स्वीकारून! उर्वरित आयुष्य दुःख करीत बसायचे नाही. ते तर होणारच. आठवणी तर येणारच, जीव खंतावणारच. त्यांत ते अवकाळी निधन असेल तर शोकाला पारावारच नसतो. पण प्रत्येक वेळी दुःख हृदयात ठेवून आपल्याकडे अपेक्षांनी पाहणार्‍यांकडे लक्ष एकवटले तर त्या अस्ताचा खेद वाटतो; भीती नाही. कारण जन्म-मृत्यूचे चक्र तर अहर्निश चालू राहणार. प्रत्येकाला नियतीने कार्य व काल नेमूनच दिलेला आहे. कार्यकाल संपला की निवृत्ती आलीच. पृथ्वीतलावरचे आपले कार्य संपताच संतांनीसुद्धा जीवितयात्रा संपवली आहे. एवढेच नव्हे तर अवतारकार्य सिद्ध होताच देवसुद्धा अवतार संपवतात. ऋतूसुद्धा नेमून दिलेल्या वेळेवर आपापले कर्तव्य पार पाडून पुन्हा अवतीर्ण होतात. पुनर्जन्म असो वा नसो, पण हा आशावाद कितीतरी जणांना जगण्याची उभारी देतो. भोग भोगायला कमालीची ताकद देतो. त्याच उद्देशाने ऋषीमुनींनी ‘साता जन्माच्या गाठी’, ‘दश-लक्ष योनींचा फेरा’ या व अशा इतर अनेक संकल्पना घातल्या असतील काय… निराशेच्या वावटळीत हेलकावणारा मनुष्यजन्म सावरण्याकरिता? तरी ‘जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या’ असे असले तरी ‘कोणीही शाश्‍वत नाहीये’ ही धोक्याची घंटा सर्वांच्या मनात नेहमीच वाजत असते. उलट वास्तवाचं भान देणारी ही घंटा सतत हयात असलेल्यांना ‘अर्थपूर्ण-स्नेहमय-समाधानी असे जगून घ्या’ असाच संदेश देत असते. ‘अस्त’ म्हणजे ‘देहोपनिषद’ आहे. देह हा माणसाच्या अस्तित्वाचा प्रारंभ. देह दिसामासांनी वाढतो. बाल्य-तारुण्य-प्रौढत्व या अवस्थांमधून जात-जात देहवेद तयार होतो. देहाच्या शेवटी येणारं उपनिषद म्हणजे वृद्धत्व. परिपक्व वृद्धत्व. जगणं पूर्णत्वाला गेल्याची खूण. देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’ म्हणजे काय? सत्व-रज-तम हे जे त्रिगुण आहेत त्यापलीकडे जा. असा जो जातो तो जीवनावर स्वार होतो. त्याला ‘अस्ताचे’ भय उरत नाही. हा क्षणभरात येणारा अस्ताचा क्षण समजून घेतला की ‘तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ असे ज्ञानोबा म्हणतातच.

तसं पाहिल्यास ‘माणूस’ भित्रा नाही. मरणाला तर नाहीच नाही. कारण नाहीतर प्रत्येक वाढदिवशी एकेका वर्षाने जवळ येणारं मरण त्याने गोडधोड खाऊन, पार्ट्या देऊन-घेऊन आनंदात साजरं केलं असतं का? नाही ना? जिंकलंय तर मानवानं ‘अस्ताला!’

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

वाया (न)गेलेले एक वर्ष

डॉ. मधू स. गा. घोडकीरेकर नाव ‘कोविड-१९’ असले तरी या विषाणूने सन २०२० वर एकतर्फी राज्य केले. हे...

निर्णायक लढाईची वेळ

दत्ता भि. नाईक अतिशय घनदाट जंगलांत माओवाद्यांना शस्त्रे कोण पुरवतो याची कसून चौकशी झाली पाहिजे. अग्निशेष, ऋणशेष आणि...

बदलते बँकिंग क्षेत्र

शशांक मो. गुळगुळे मोबाईलने जसे मनगटावरचे घड्याळ घालविले, कॅमेरे गळ्यात घालून फिरणे घालविले तसेच ग्राहकांना बँकेपर्यंत जाण्याचा त्रास...

ऋतुराज आज वनी आला…

मीना समुद्र हा उदारात्मा वसंत चेतोहर, मनोहर असतो. त्यामुळेच त्याला ‘ऋतुराज’ ही पदवी बहाल झालेली आहे. चैत्रातले त्याचे...

दर्यादिल राजकारणी

वामन सुभा प्रभू(ज्येष्ठ पत्रकार) २२ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास माझ्या मोबाईलवर झळकलेला हा संदेश मागील सहा-सात दिवसांत...