असे का बरे घडते?

0
148

– डॉ. राजेंद्र साखरदांडे

समोरच्या रस्त्यावरून ती चालत जात होती. बुटकी वाळलेली, गोरी कात जळून (उन्हाने बहुदा) काळी सावळी झालेली. चेहरा काळवंडून गेला होता. ती माझ्या नजरेला नजर लावत नव्हती. तिच्या नजरेत कारुण्य, अगतिकता, लाज, विवशता ठायीठायी दिसत होती. सर्वांना बरोबर घेत ओढतच ती जात होती.

पंधरा वर्षांपूर्वी ती फारच सुंदर होती. बटू असली तरी तिची नजर आकृष्ट करणारी होती. आजवरच्या माझ्या जीवनात फक्त तीनच मदनाना जाणतो. एक – तुम्ही जाणता तो रतीचा मदन, दुसरा तिचा नवरा व तीसरा एकटा. एकदा एक पेशंट माझ्याकडे तपासायला आला. येताना अत्तराचा भपकाराही घेऊन आला. येताना आपल्या आजाराबरोबर, तापाबरोबर या इतर गोष्टी आणण्याची गरज आहे का? मागे एक तरुणी (लावण्यवती) या सुंदर तरुणी आणखीन सुंदर बनून आजारपणात माझ्याकडेच का येतात हा प्रश्‍न मला नेहमी पडतो. तर एक तरुणी माझ्या दवाखान्यात आली. कपडे छान, अगदी लग्नाचे, लिपस्टीक लावलेली, गालांवर लाली, अत्तराचा फवारा तर मारलेला. त्याने तर माझे डोके अधिकच ठणकायला लागले. तिला १०४ ताप होता. मी विचारले, ‘‘लग्नाला गेली होतीस का?’’ ती उत्तरली – ‘‘नाही. तुमच्याकडेच आलीय.’’ आजारपणात हा नखरा तर मग लग्नसोहळ्यात बघायला नको. सगळी लग्नाला आलेली मंडळी तिच्याकडे बघतच राहिली असती… गरीब बिचारी नवरी. आता इथे मी गरीब बनलो होतो.
हा मदन आपल्याबरोबर आपली ओळखही घेऊन आलेला. तो आखाती; खरे म्हणजे तो गोवेकरी; पण आखाती देशात कामाला होता. सध्या रजेवर आला होता. त्याचे ते कपडे, गळ्यातली सोनसाखळी, हातातले मास्कोट, घड्याळ, सगळ्या वस्तू त्याचा परिचय करून देत होत्या. मी सहज माझ्याकडे पाहिले. सगळ्या जागा रिकाम्या होत्या. मी आखातात गेलो नव्हतो याची खात्री झाली. तो गोरागोरापान होता. नाव मदन. त्याचे नाव ऐकून कित्येक वर्षांपूर्वी टी. व्ही. सिरियलमधल्या ‘मदनबाणा’ची आठवण झाली. तो मदनासारखा नव्हता. ‘मदना’ची सज्ञा लावणे म्हणजे तो माणूस रूपवान, अगदी मदनासमान. आता कुणी मदनाला बघितले आहे का? तो जाता झाला. मग केव्हातरी मुले आखाती पेहराव करून आली. मला कौतुक वाटले. तो परत नोकरीला आखाती देशाला निघून गेला होता.
चक्क तीन-चार वर्षांनी तो परतला. त्याच्याअगोदर बायको पोरांच्या अंगावर भारतीय वस्त्रे दिसू लागली. आखातात युद्ध सुरू झाले होते. नवरा परतला; पण परत न जाण्यासाठी. नोकरी – कामधंद्यासाठी वणवण फिरायचा. हळूहळू गळ्यातले, हातातले नाहीसे झाले. मग किमान पाच वर्षे त्या कुटुंबाची जाग नव्हती. कुठेतरी दूरवरच्या गावात ती स्थायिक झाली होती.
एक दिवस अचानक ती दिसली. आपले सामान, मुलाबाळांना बरोबर घेऊन जवळच राहायला आली होती. तो मदन तिच्याजवळ नव्हता. कुणीतरी म्हणाले, ‘‘त्याने तिला सोडचिठ्ठी दिलीय’’ कारण कुणी दुसरी रती त्याला मिळाली होती. ती खंगली. जवळच्या माणसांच्या मदतीने आपला संसार मांडला. मुले मोठी झाली. शाळेत जाऊ लागली. मोठा मुलगा आता छोटी बस चालवत होता. कामानिमित्त दूरवरच्या शहरात होता. आजारी पडला तर धावन शहरातून माझ्याकडे यायचा. भरपूर बोलायचा. तपासणी करून घ्यायचा. बरा व्हायचा.
एके दिवशी बातमी वाचली. त्या शहरातल्या नदीकाठी कुणा एका तरुण मुलाचे शव सापडले होते. तो पोरगा तिचा मोठा मुलगा होता. त्याच्या प्रेमाला कुणीतरी विरोध केला व तो आत्महत्या करून मोकळा झाला. तो दिवस वाईटच गेला. त्या मुलाचा बालिश चेहरा डोळ्यांसमोर उभा राहत होता. आज त्याची आई आपला चेहरा लपवत समोरून चालत जात होती. तिच्यापेक्षा मलाच लाज वाटत होती.
अशीच एक दुसरी आई, माझाच रुग्ण होती. तिलाही दोन मुलगे होते. नवरा चांगला खाष्ट होता. त्याची नजर राक्षसी होती. फक्त आपल्या नजरेने त्या गाईला जरब दाखवत होता. माझ्यासमोर ते जोडपे पंधरा मिनिटेच यायचे. माझ्या नजरेसमोर ते कुटुंब वाढले. मुले शिकली. छोटा परक्या गावी देणगी देऊन उच्च शिक्षणासाठी गेला. तिथे रॅगिंगच्या जाळ्यात अडकला. पळून आला. परत गेला. केव्हाही सुटीत आला, आजारी पडलाच तर भेटायचा. नाहीतरी डॉक्टरांना कधी आरोग्यसंपन्न व्यक्ती भेटतात का? आजार घेऊनच ते येतात. त्यांच्या आजाराविषयीच बोलतात. डॉक्टरांनीही त्यांच्या आजाराविषयी त्यांच्याशी बोलावे असे त्यांना वाटते. लोक म्हणतात, डॉक्टरलोकांनी जास्त बोलूच नये.
माझ्या सूसला डॉक्टरांकडे घेऊन जायचो. दातांचे डॉक्टर – तिचे दात किडले होते. काही तुटलेले होते. म्हातारे झाले होते. सडलेले, तुटलेले. एक एक करत डॉक्टरांनी काढून टाकले. खालची – वरची हिरडी तयार केली. मग कवळी बसवायला घेतली. हे करीतोवर दहा-बारा खेपा झाल्याच. मी तिच्याजवळ थांबायचो. त्या डॉक्टरांना बोलायची भयानक सवय होती. तशी माझी सासू बोलघेवडी. पण इथे परिस्थिती उलटी. त्या डॉक्टरांनी सासूवर कुरघोडी केली. शेवटी तिलाही कंटाळा आला. ‘‘किती बोलतो हा डॉक्टर!’’ असे तिने म्हटल्यावर मी थोडेफार बोलायचो तेही विसरलो. ती म्हणायची, ‘‘डॉक्टरांनी हळू बोलावे.’ मग मी एवढे हळू बोलायला लागलो की माझ्या पेशंटांना प्रश्‍न पडला – हा डॉक्टर बोलतो तरी ना?
तो पोरगा वयात आला होता. त्याला बाहेरगावी पाठवलेला. शेवटी व्हायचे तेच झाले – लव्हेरिया झाला. ती पोरगी त्यांच्या जातीची नव्हती. ते कुटुंब त्यानंतर मला भेटलेच नाही. वर्षभरानंतर त्याची आई तपासायला आली. ती हिस्टेरियाची केस होती. ती अंगाने स्थुल झाली होती. पूर्वीचा तिचा हंसरा चेहरा, लाघविपणा, मुरके मारत, मान हलवत बोलण्याची चाल सगळे काही लोपले होते. तिचा नवरा मात्र तसाच होता. कालांतराने मला समजले, तिच्या त्या छोट्या पोराने जीव दिला होता. बापाला त्याचे प्रेमप्रकरण मान्य नव्हते. छोटा आईचा अत्यंत लाडका होता. तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवली. मला तिची काळजी वाटत होती – बिचारी वेडी तर होणार नाही ना?
तिचा नवरा वरचेवर स्वत:ला तपासायला यायचा. त्यालाही व्याखी होती. चेहर्‍यावरचा थकवा स्पष्ट जाणवत होता. त्यालाही आता मुलाचे असे अकाली जाणे सलत असावे. वाढत्या वयाबरोबर माणसाला स्वत:चे दोष दिसतात. केलेल्या चुका प्रायश्‍चित घ्यायला लावतात. पण वेळ निघून गेलेली असते.
दोन मुलांच्या दोन आया मला दिवसरात्र सतावत होत्या. मदनाची बायको थोडीफार सावरली होती. दुसर्‍या आईची मला फार चिंता वाटत होती. ही माझी नायिका वेगळीच होती. संध्याकाळची वेळ… उष्णता वाढली होती. पाऊस तर पळाला होता. रुग्णांची रांग वाढलेली. डोळे भणभणायला लागले होते. इतक्यात दरवाज्याबाहेर हल्लकोळ ऐकू आला. दार उघडून पाहतो तर दोघे-तिघे बाईला पकडून आत आणत होते. बाई बेभान झाली होती. तिला कशाचेही भान नव्हते. माझे भय शेवटी खरे ठरले होते. त्या छोट्याची आई वेडी झाली होती. हे देवा, असे हे का बरे घडते?
…………