Home बातम्या असाही एक जीवनदाता दिनकर

असाही एक जीवनदाता दिनकर

0

– तुळशीदास रा. कामत, लोलये, काणकोण

‘बहुरत्ना वसुंधरा’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. या आपल्या भूमातेने अनेक नररत्ने जन्माला घातली आहेत. भारतभूमी तर अशा नररत्नांची खाणच आहे. देव कार्यासाठी प्रत्यक्ष आपल्या शरीराचे दान देणार्‍या वेदकालीन दधीचि ऋषींपासून ही परंपरा चालत आलेली आहे.

दिनकर कांबळे हा कोल्हापूरमधीलच असाच एक महाभाग. आईवडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी अशा कुटुंबात त्याचे बालपण गेले. अत्यंत गरीबीमुळे सातवीपुढे दिनकरचे शिक्षण थांबले. घरची शेती अत्यल्प, त्यामुळे उदरभरणासाठी कष्टांशिवाय पर्याय नाही. घरी एक म्हैस होती. दिनकर दिवसभर तिच्या मागे असायचा. तिच्याबरोबर पाण्यात उडी घ्यायचा. त्यामुळे तो बालपणीच पट्टीचा पोहणारा झाला.

अशा परिस्थितीत एक अकल्पित घटना घडली आणि दिनकरचे आयुष्य बदलून गेले. त्याच्यावर आईसारखी माया करणारी त्याच्या मोठ्या भावाची पत्नी कोणाच्या नकळत विहिरीत पडली. दोन दिवसांनी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे लक्षात आले. सगळीकडे हाहाकार माजला. विहिरीभोवती गर्दी जमली; पण मृतदेह काढण्यासाठी विहिरीत उडी घेण्यास कोणीच तयार होईना. अशा वेळी चौदा वर्षांच्या दिनकरने विहिरीत उडी मारून मृतदेह वर घेतला. त्या क्षणापासून दिनकरने एक निश्‍चय केला. ‘अशा संकटग्रस्तांना मदत करणे हेच माझे जीवनकार्य!’

गेली तेवीस वर्षे अक्षुण्णपणे तो हे कार्य करीत आहे. वादळी वारे, घनघोर पाऊस-विजा, भयानक पूर, नदीतील प्राणघातक भोवरे अशी कोणतीच संकटे त्याची वाट अडवू शकत नाहीत. पावसाळ्यात सरकारी संस्थाही त्याची मदत मागतात. आजपर्यंत सुमारे दीड हजार मृतदेह त्याने पाण्यातून तीरावर आणले. बुडणार्‍या २७८ जणांना वाचविले. माणसांप्रमाणे अनेक पक्षी, प्राणी, सर्प यांनाही त्याने संकटातून ओढून काढून जीवदान दिलेले आहे. केवढे हे महान कार्य!

एवढी शारीरिक गुणसंपदा असूनही दिनकरला अहंकार मुळीच शिवलेला नाही. अत्यंत गरीबीतही कोणाकडे कधीही याचना नाही. उलट कोणी काही देऊ केल्यास अत्यंत विनयपूर्वक नकार. अशावेळी तो म्हणतो,‘परमेश्‍वरी कृपेनेच मी हे कार्य करू शकलो. मी केवळ निमित्तमात्र आहे’ केवढी ही नम्रता!

दिनकरच्या मोठ्या परिवारात पत्नी व एका कन्येची भर पडली तरीही केवळ चरितार्थापुरते मिळवून सदैव त्याचे सेवाकार्य चालू असते. कुटुंबाची आर्थिक स्थिती सामान्य. पण जीवन समाधानी. गतवर्षी आपद्ग्रस्तांसाठी त्याने आपली ‘विमोचन सहाय्यक संस्था’ निर्माण केली. या संस्थेचे पाचशेहून अधिक सदस्य आहेत. रोज संध्याकाळी दोन तास त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

अग्नी, पाणी, विविध अपघात यातून निर्माण झालेल्या संकटांवर मात करण्याचे मार्गदर्शन तेथे दिले जाते. प्रशिक्षणार्थी तरुणांना व्यायाम व प्राणायाम शिकवला जातो. शेवटी खुराक मात्र गुळ आणि शेंगदाणे. दिनकरचे कार्य असे समाजव्यापी बनत आहे.

दिनकराच्या स्वभावाचे अजून एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यदिन, गणतंत्रदिन, आपला वाढदिवस अशा विशेष दिनी तो संध्याकाळी स्मशानात जातो. तेथे कोणाची तरी चिता पेटलेली असते. चितेला प्रदक्षिणा घालून तो एखाद्या झाडाखाली जाऊन बसतो व हात जोडून प्रार्थना करतो, ‘हे अग्ने, तुझ्यासारख्या पवित्र या जगात कोणीच नाही.

सर्वांना तू भस्मसात करून पवित्र करतेस. माझेही शरीर असेच एकेदिवशी भस्मभूत होईल. त्यावेळी जगतातील सर्वांचा संपर्क समाप्त होईल. पण एकच आशीर्वाद दे. शरीरात प्राण असेपर्यंत माझे हे कार्य निर्विघ्नपणे चालू ठेव. हे कार्य करत असताना नकळतपणे एखाद्या देहाची माझ्याकडून अवहेलना झाली असेल तर मला क्षमा कर.’

दिनकर हे सूर्याचे एक नाव. सूर्याप्रमाणेच न थांबता, निरपेक्षवृत्तीने सतत कार्यरत असलेला दिनकर हा एक योगीच म्हटला पाहिजे.

या परोपकारी योग्याला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. ‘शिवास्ते पन्थानः सन्तु|’ (संदर्भ ः संस्कृत संभाषण संदेश)