असहाय महिलेला कुणी घर बांधून देता का घर?

0
40

4 वर्षांपूर्वी चोपडे-शिवोली पुलावरील भीषण अपघात आई-वडील आणि भाऊ यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा येथील एका महिलेवर एकाकी जीवन जगण्याची वेळ आली. दुर्दैवाचा फेरा एवढ्यावरच न थांबता तिच्या राहत्या घराची पडझड झाली. त्यामुळे ताडपत्री टाकून उभारलेल्या झोपडीवजा घरात तिला वास्तव्य करावे लागत आहे. तिच्या या झोपडीला दरवाजा नाही, पाण्याची सोय नाही, शौचालय सुविधा देखील नाही. दुसऱ्या बाजूला छपराला वाळवी आणि गळती. ही कहाणी आहे सिंथिया फर्नांडिस यांची.
गोवा मुक्त होऊन 60 वर्षांहून अधिक काळ लोटला.

मात्र आजही एखाद्या महिलेला राहायला निवारा नाही, शौचालयासारख्या सुविधा नाहीत, हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल; परंतु हे सत्य आहे. सिंथिया फर्नांडिस यांचे घर प्रत्यक्षात पाहिल्यास त्याला घर म्हणावे का असा प्रश्न पडतो. केवळ एक प्लास्टिक ताडपत्री टाकून त्यांनी स्वत:साठी निवारा तयार केला आहे. प तसेच झोपडीसाठी जे लाकडी सामान वापले आहे, त्यालाही सगळीकडे वाळवी लागली आहे. घराची दुरुस्ती करण्यास किंवा शौचालय उभारण्यास जमीनमालकाकडून आडकाठी केली जाते. घराच्या बाजूला कपडे वाळत टाकले, तरी कपडे फेकून दिले जातात. आंघोळीसाठी माडाच्या झावळ्यांचा तात्पुरता आडोसा केला तरी तो काढून टाकला जातो. अशा प्रकारे सतावणूक होत असताना घराची दुरुस्ती किंवा शौचालयाची सोय करावी, अशी प्रश्न सिंथिया यांना सतावत आहे.

शेजाऱ्यांकडून मदतीचा हात

हलाखीचे जीवन जगणाऱ्या सिंथिया फर्नांडिस यांच्याकडून मोलाची मदत आतापर्यंत मिळत आली आहे. त्यांच्या शेजाऱ्यांनी शेजारधर्माचे पालन करत सिंथिया यांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. सिंथिया आजही शेजारच्यांकडे जाऊन शौचालयाचा वापर करते. तसेच शेजारील एक महिला गेल्या 4 वर्षांपासून रात्रीच्या वेळेस आपल्या घरात तिसरा आसरा देत आहे. माणुसकीच्या नजरेतून शेजारी तिला मदत करतात; परंतु हे किती काळ चालणार. त्यामुळे सरकारने तिला ठोस मदत करावी, अशी मागणी होत आहे.