विजय आणि पराजय ही राजकीय तराजूची दोन पारडी असतात. कधी एक खाली जाते, तर कधी दुसरे. वर गेलेले पारडे पुन्हा खाली आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आजकाल भारतीय राजकारणाकडे पाहिले, तर वर गेलेले हे पारडे खाली आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच खालच्या पारड्यात उडी टाकून सत्तेचा संग करण्यासाठी अहमहमिका लागलेली दिसते. अगदी विजयी पक्षात जाता आले नाही तरी किमान पराजित पक्षातच राहून परंतु त्याच्या पराभूत नेतृत्वापासून जास्तीत जास्त अंतर राखून स्वतःचे आसन सुरक्षित ठेवण्याकडे नेत्यांचा कल दिसतो. तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या जे चालले आहे, ते पाहिले, तर राजकारणात रंग कसे एका रात्रीत पालटू शकतात ह्याचा प्रत्यय येतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममतांचा दणकून पराभव झाला आणि महिना व्हायच्या आत ममतांपासून फारकत घेऊन स्वतःचा बचाव करण्यासाठी उड्या पडू लागलेल्या दिसत आहेत. तृणमूल विधिमंडळातील गटनेता निवडीचे जे राजकारण सध्या रंगले आहे, त्यातून हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे असे स्पष्ट दिसते आहे. पक्षाच्या निर्वाचित ऐंशी सदस्यांपैकी तब्बल साठ सदस्य बंडखोर ऋतुव्रत बॅनर्जींच्या पाठीशी उभे ठाकले आणि त्यांची विधिमंडळ गट नेतेपदी परस्पर निवड करून सभापतींची त्याला मंजुरीही घेतली. ममतानिष्ठ असे आता जेमतेम अठरा वीस आमदार विधानसभेत उरले आहेत आणि बंडखोरांचा भक्कम संख्याबळ असलेला गट स्वतःलाच ‘असली तृणमूल’ म्हणू लागला आहे. ममतांचे नेतृत्व त्यांनी अद्याप झुगारलेले नाही, परंतु ह्या निवडणुकीत पराभूत झालेल्या ममतांनी यापुढे मार्गदर्शकाची भूमिका बजावावी अशी भूमिका मांडली जाऊ लागली आहे. तृणमूलचे नेतृत्व अभिषेक बॅनर्जींकडे देण्यास ह्या बहुसंख्य जुन्याजाणत्या नेत्यांचा विरोध आहे. ममतांनी आपल्या ह्या पुतण्याला पक्षात पुढे आणले तेव्हापासूनच त्याच्या एकूण कार्यपद्धतीविषयी नाराजी निर्माण झाली होती. परंतु आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्या ह्या पुतण्याला ममतांनी पक्षात पुढे आणले. अभिषेक बॅनर्जींनी पक्षात नवी कॉर्पोरेट संस्कृती आणली. ‘आयपॅक’सारख्या संस्थेची निवडणुकीत मदत घेतली, तळागाळाशी असलेले नाते त्यामुळे कमकुवत झाले आणि त्याचा फटका म्हणून पक्ष पराभूत झाला असे एकूण चित्र सध्या त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उभे केले आहे. निवडणुकीनंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अभिषेक बॅनर्जी यांनी निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची सूचना ममता यांनी केली, तेव्हाच त्याबाबतची नापसंती व्यक्त व्हायला सुरूवात झाली होती. पक्षाची धुरा ममता आता अभिषेक यांच्या हाती सोपवतील ह्याची चाहुल लागल्याने बंडखोरांनी भाजपाशी संधान बांधले. ऋतुव्रत बॅनर्जी आणि सांदिपन साहा हे दोघे आमदार भाजपचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांना भेटले. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून त्यांना तृणमूलमधून काढून टाकण्यात आले. परंतु त्या निर्णयाविरुद्ध बहुसंख्य आमदार उभे ठाकलेले दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले, तशाच प्रकारचे बंड आता तृणमूल काँग्रेसमध्ये घडवले जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तरी बंडखोर ममताच आपल्या नेत्या म्हणत आहेत, परंतु ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसू लागलेल्या बंडखोरीचा फायदा घेतल्याशिवाय भाजपा राहणार नाही. अभिषेक बॅनर्जींच्या मागे आता ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणा लागतील ह्याची चाहुल लागल्यानेच तृणमूलमधील जो तो आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांच्या विरोधी गटात सामील होऊन ‘मी नव्हे त्यातला’ असे दाखवू लागला आहे हेच यातील वास्तव आहे. प्रत्येकाला आपल्यावर ओढवलेल्या संकटाची जाणीव झाली आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी पक्षांतर्गत बंडाचा हा मार्ग त्यांच्यासाठी सुटकेची गुरूकिल्ली बनला आहे. ममता यांच्यासमोर हे अस्तित्वाचे आव्हान उभे राहिले आहे. जो पक्ष रक्ताचे पाणी करून उभारला, तो घराणेशाहीच्या प्रयत्नापोटी गमावण्याची वेळ त्यांच्यावर जवळजवळ ओढवलेली आहे. तृणमूलमध्ये दिसलेली ही पहिली मोठी फूट आहे आणि भाजपची राज्यात सत्ता असल्याने तिचे परिणाम काय होतील हेही दिसू लागले आहे. विधिमंडळ गटात पडलेली ही फूट आता लोकसभा आणि राज्यसभेतही दिसेल. विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपदी तर बंडखोर नेत्याची नेमणूक झालेलीच आहे. आता हेच चित्र जर राज्यसभा आणि लोकसभेतही दिसलेे तर ‘असली तृणमूल’ कोण हे अधिक स्पष्ट होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच पक्षाचे नाव आणि चिन्ह टिकवण्यासाठी ममतांना लढावे लागेल. पुतण्याच्या ममतेपोटी पक्ष गमावण्याची वेळ आली आहे एवढे खरे.

