असतो मा सद्गमय

0
7
  • – ज. अ. रेडकर

जचे शिक्षण हे ताकापुरते रामायण झाले आहे. अगदी खोलवर जाऊन अध्ययन-अध्यापन करावे असे कुणाला वाटत नाही. ‘आपण तो वेतनाचे धनी’ अशा प्रकारचे गुरुवर्य तर ‘डिग्री मिळाली की गंगेत घोडे न्हाले’ अशा मनोवृत्तीचे विद्यार्थी जिकडे-तिकडे आढळतात.

बृहदारण्यक उपनिषदात ‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृतं मा अमृत गमय’ हे सूक्त आढळते. याचा अर्थ- हे ईश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा, अंधःकारातून प्रकाशाकडे घेऊन जा, मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जा असा आहे. मात्र यातील ‘मृतं मा अमृत गमय’ याचा अर्थ, मला मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जा असा तंतोतंत घेतला जाऊ नये. कारण जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू अटळ आहे. मात्र आपण जीवनात जगाच्या कल्याणासाठी काहीतरी लोकोत्तर काम करावे म्हणजे आपले नाव अजरामर होईल हा त्यामागील अर्थ आहे. म्हणूनच ‘लोकोत्तर काम करण्याची बुद्धी आणि शक्ती मला दे’ असा त्या ओळीचा अर्थ घ्यायला हवा.

भूतकाळात असो, वर्तमानकाळात असो अथवा भविष्यकाळात असो; वरील सूक्तातील तीनही गोष्टी केवळ आपला गुरूच प्राप्त करून देऊ शकतो. शिक्षण हे त्यासाठी माध्यम आहे. पूर्वीच्या काळातील ऋषिमुनी प्रचंड कठोर तपस्या करीत. तपस्या करीत म्हणजे अंगावर वारूळ जमण्याएवढे एका जागी बसून मंत्रजप करीत, ही चुकीची कल्पना आहे. मानवी जीवनासाठी ती अशक्यप्राय गोष्ट आहे. तर प्रत्यक्षात ते सतत विश्वाविषयी चिंतन करीत. पंचमहाभूतांचे चमत्कार पाहत असताना त्यांच्या मनात शंका उत्पन्न होत. उत्पन्न होणार्‍या या शंकांचा मागोवा घेत-घेत ते प्रश्‍नांची उत्तरे शोधीत आणि असा शोध पूर्ण झाल्याशिवाय ते सुखाची निद्रा घेत नसत. अगदी तन्मयतेने आणि एकाग्र चित्ताने त्यांचे हे शोधकार्य चालू असायचे. हीच त्यांची तपस्या असायची. एकाग्रतेने चिंतन केल्यास अनेक प्रश्‍नांची उकल आपणास होत असते. ऋषिमुनींनी तेच केले. आणि जे अनुभवास आले, जी मूलतत्त्वे सापडली ती त्यांनी भूर्जपत्रावर लिहून काढली. चार वेद, एकशे आठ उपनिषदे (यातील आज केवळ तेरा उपलब्ध आहेत), अनेक आख्यायिका असलेली अठरा पुराणे, रामायण, महाभारत ही दोन महाकाव्ये यातूनच निर्माण झाली. मुखोद्गत पद्धतीने ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धती सुरू करण्यात आली. त्यासाठी राजाश्रय मिळू लागला. किमान १२ वर्षे गुरुगृही राहून शिष्याला अध्ययन करावे लागत असे. सुरुवातीला ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यापुरतीच अशी गुरुकुले खुली होती; अन्य वर्णीयांना यापासून वंचित ठेवण्यात आले होते. हे सर्व शिक्षण संस्कृत भाषेत दिले जायचे, कारण सर्व ग्रंथांचे लिखाण हे त्या भाषेत केलेले होते. सर्वस्व पणाला लावून गुरू आपल्या शिष्याला त्याकाळी आवश्यक असलेल्या सर्व विद्यांत पारंगत करीत असे. वारंवार त्यांची सत्त्वपरीक्षा घेतली जात असे. आणि आपला शिष्य पूर्ण रूपाने तयार झाला की त्याला त्याच्या घरी पाठविले जात असे. आज असे तन्मयतेने शिकवणारे ना गुरू आहेत ना तन्मयतेने शिकणारे शिष्य!

आजचे शिक्षण हे ताकापुरते रामायण झाले आहे. अगदी खोलवर जाऊन अध्ययन-अध्यापन करावे असे कुणाला वाटत नाही. ‘आम्ही तो वेतनाचे धनी’ अशा प्रकारचे गुरुवर्य तर ‘डिग्री मिळाली की गंगेत घोडे न्हाले’ अशा मनोवृत्तीचे विद्यार्थी जिकडे-तिकडे आढळतात. परंतु कधीकधी या परिस्थितीला छेद देणारे काही शिक्षक समाजात कार्यरत असलेले दिसतात आणि त्यांचे कौतुक वाटते. यातील दोन शिक्षक महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतात. एक आहेत शिक्रापूर तालुक्यातील शिरूर गावातील वाबळेवाडी शाळेचा दहा वर्षांत कायाकल्प करणारे श्री. दत्तात्रेय वारे गुरुजी आणि दुसरे आहेत दौंड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील निसर्गरम्य शाळा निर्माण करणारे श्री. युवराज घोगरे गुरुजी. या दोघांनी केलेले कार्य प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवायला पाहिजे तरच ते समजू शकेल. कारण ते शब्दातीत आहे. वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा तर आता अंतरराष्ट्रीय स्तरावरची झाली आहे. या शाळेला भेट दिल्यावर ती जिल्हा परिषदेची शाळा आहे यावर विश्वास बसत नाही इतकी ती अप्रतिम आहे. या शाळेचे फोटो पाहिल्यावर ही शाळा अमेरिकेसारख्या प्रगत व आधुनिक देशातील आहे असा भास होतो.

इथल्या ग्रामस्थांच्या मदतीने श्री. वारे गुरुजी यांनी हे आपले आदर्श शाळेचे स्वप्न साकार केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिले, अनेक आघात सहन केले, कष्ट उपसले. अगदी सकाळी आठ ते रात्री दहा-दहा वाजेपर्यंत त्यांनी शाळेसाठी काम केले आणि आजचे शाळारूपी शिल्प तयार झाले आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक राज्यशासनाने राज्यस्तरीय पुरस्कार आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्कार देऊन केले आहे, ही समाधानाची बाब आहे. उत्कृष्ट काम करणार्‍या कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याचा गुणगौरव व्हायलाच पाहिजे. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडायलाच पाहिजे म्हणजे त्याचा हुरूप वाढतो, त्याला आंतरिक समाधान तर मिळतेच पण इतरांना त्यातून प्रेरणा मिळते.

विठ्ठलवाडी ही शाळा महाराष्ट्राच्या नकाशावरदेखील सापडत नाही. कारण दौंड तालुक्यातील देऊळगाववाडा या ग्रामपंचायतीतील विठ्ठलवाडी हा एक छोटा वॉर्ड आहे. पण येथील शाळा म्हणजे गुरुकुलाची आठवण करून देणारी अप्रतिम निसर्गशाळा आहे. येथील एक शिक्षक युवराज घोगरे म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ट कला अंगी असलेले एक वेगळेच रसायन आहे. शाळेसाठी तन-मन-धन अर्पण करणारा असा समर्पित शिक्षक मी माझ्या ३५ वर्षांच्या शिक्षण खात्यातील नोकरीच्या कारकिर्दीत पाहिला नाही. एकेकाळी केवळ जेमतेम चाळीस मुलांची पटसंख्या असलेली ही ओसाड माळरानावरची दोन शिक्षकी शाळा. ना धड इमारत, ना धड इतर आवश्यक सुविधा! स्वच्छतागृह, बागबगिचा व क्रीडा मैदान ही तर फार दूरची गोष्ट. परंतु विठ्ठलवाडीच्या सुदैवाने बारा वर्षांपूर्वी युवराज घोगरे नामक उत्साही तरुण इथे अवतरला. शाळेचा विकास हा एकच ध्यास घेतलेला हा तरुण अक्षरशः झपाटलेला कर्मयोगी आहे. आपल्या प्रपंचापेक्षा त्याला शाळेचा प्रपंच अधिक मोलाचा वाटतो.

श्री. घोगरे यांची नियुक्ती इथे झाल्यापासून ही शाळा नियमित शाळेच्या आधी एक तास भरते. प्रत्यक्ष अध्यापनाबरोबरच संगीत, नृत्य, नाट्य, चित्र या कलांना प्रोत्साहन देणारे शिक्षण मुलांना दिले जाते. स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेतली जाते. आणि स्पर्धापरीक्षेत इथली सर्व मुले उच्च श्रेणीत उत्तीर्ण होतात. सरकार त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देते. अभ्यासात ही मुले हुशार आहेतच, परंतु त्यांच्या अंगावर झकपक गणवेश, त्यांची शारीरिक स्वच्छता, त्यांची शिस्त आणि सर्वांशी त्यांची असलेली वागणूक ही कोणत्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्येदेखील मिळणार नाही इतकी अप्रतिम आहे.

उघड्या-बोडक्या माळरानावर असलेली ही एकेकाळची निर्वासित शाळा आता निसर्गरम्य शाळा झाली आहे. याचे सारे श्रेय घोगरे गुरुजींना जात असले तरी एका शब्दनेही ते श्रेय आपले आहे असे म्हणत नाहीत तर हे सगळे माजी मुख्याध्यापक तथा विद्यमान मुख्याध्यापक श्री. दत्तात्रेय दिवेकर, शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांचे आहे असे सांगतात. राष्ट्रीय बाणा अंगी बाणवणारी सुसंस्कृत, कलात्मक पिढी घडवण्याचे व्रत या शिक्षकाने घेतले आहे. ‘शाळेचा विकास हाच आमचा ध्यास’ हे ब्रीदवाक्य त्यांनी मुलांच्या आणि पालकांच्या मनात रुजवले आहे. सत्य ते बोलावे, सत्य ते करावे, जनहिताचे ते करावे, सदैव कार्यरत राहावे अशा वृत्तीचा हा प्रामाणिक शिक्षक आहे. सर्व अत्याधुनिक उपकरणे त्यांनी लोकवर्गणीतून किंवा बक्षीस रूपाने किंवा देणगी रूपाने शाळेसाठी मिळवली आहेत. कोरोना काळात या आधुनिक उपकरणांचा उपयोग त्यांना अध्यापन करताना झाला. शाळेने मिळवलेल्या पारितोषिकांची तर गणतीच नाही. विविध स्पर्धांत मिळवलेले करंडक, ढाली आणि स्मृतिचिन्हे ठेवायला जागा नाही अशी स्थिती आहे. अगदी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते शालेय इमारतीपर्यंत शाळा आपले लक्ष वेधून घेते. सगळीकडे स्वच्छता, टापटीपपणा, वाटेवर दुतर्फा लावलेली फुलझाडे, जागोजागी लावलेले उद्बोधक विचारांचे फलक, ज्ञानवृद्धी करणारे माहिती फलक, थोरामोठ्यांच्या चित्रांनी आणि माहितीने भरलेल्या भिंती म्हणजे जणू काही ही बोलकी शाळा वाटते. आपण एका शाळेत नाही तर कुठल्यातरी परीकथेतील स्वप्ननगरीत पोहोचलो आहोत असा भास इथे आल्यावर होतो.

शाळेच्या आवारात फुलवलेली बाग, त्यात असणारे झुले, घसरगुंडी, सीसॉ यांची सुविधा, बागेला ‘बालवीर शिरीषकुमार बगिचा’ असे दिलेले नाव म्हणजे उदात्त आणि राष्ट्रीय बाण्याची चुणूक दर्शविते. वास्तविक पावसाचे प्रमाण कमी असलेला हा भाग, परंतु शाळेसाठी भल्या मोठ्या टाक्या उपलब्ध करून त्यात पाण्याचे जतन केले जाते. यातूनच शाळेच्या पटांगणात हिरवळ रुजवली आहे. सभोवार छान सावली देणारी झाडे लावली आहेत. पटांगणाला जोडून व्यासपीठ बनवले आहे. विविध सांस्कृतिक समारंभ याच व्यासपीठावर होतात. घोगरे गुरुजींनी समाजाला शाळेशी जोडून घेतले आहे. लोकांचा अफाट विश्वास त्यांनी संपादन केला आहे. त्यामुळे इथे शाळेसाठी वेगळा सुरक्षारक्षक नेमायची गरज भासत नाही. मध्यंतरी थोड्या दिवसांसाठी त्यांची इतरत्र बदली झाली त्यावेळी मुले व पालक अक्षरशः रडले. घोगरे गुरुजी स्वतः आपले अश्रू आवरू शकत नव्हते इतके ते या शाळेशी एकरूप झाले होते. सुदैवाने पुन:श्‍च या शाळेत त्यांची नियुक्ती झाली आणि सर्वांनी समाधानाचा निःश्वास सोडला.
‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृतं मा अमृत गमय’ असे दिव्य ज्ञान देऊन एक नवी पिढी घडवणारे श्री. दत्तात्रेय वारे आणि श्री. युवराज घोगरे यांच्यासारखे शिक्षक मिळणे दुर्लभ! अशा समर्पित शिक्षकांना केवळ शिक्षक पुरस्कार देऊन भागणार नाही; त्यांना सर्वोच्च असा ‘पद्म’ पुरस्कार सन्मानाने बहाल करायला हवा, तरच त्यांच्या कार्याची दखल समाजाने आणि सरकारने घेतली असे म्हणता येईल! या दोन्ही शिक्षकांना आणि त्यांच्या कार्याला सलाम!