असंतुष्ट कोण?

0
10

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर नानाविध आरोप करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून आणि त्यांच्यावर आरोप करणाऱ्या बातम्या काही विशिष्ट राष्ट्रीय वर्तमानपत्रांमधून प्रसारित करण्याचा सपाटा गेल्या काही दिवसांपासून पद्धतशीरपणे लावला गेला असल्याचे गोमंतकीयांनी पाहिले. हे सगळे योगायोगाने नव्हे, तर पद्धतशीरपणे चालले आहे आणि कोणी तरी त्यामागे असावे असा संशय त्यामुळे व्यक्त होत होता. ह्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेशी संवाद साधणारा एक व्हिडिओ जारी करून ह्या सगळ्या प्रकारामागे नेमके कोण आहे ह्याचा शोध घेण्याचेही प्रयत्न चालवले आहेत. जे काय चालले होते, ते एवढ्या पद्धतशीरपणे चालले होते की त्यामागे एखादी बडी पीआर कंपनी असावी असा संशय घेण्यास वाव आहे. सोशल मीडियावरून पाठवले जाणारे व्हिडिओ ए, बी, सी अशा वेगवेगळ्या आद्याक्षरांखाली आणि व्हॉटस्‌‍ॲपच्या बिझनेस अकौन्टखाली पाठवले जात होते. त्यात बोलणाऱ्या व्यक्ती ह्या बिगरगोमंतकीय आहेत आणि एखाद्या बड्या पीआर एजन्सीखाली काम करीत असाव्यात असे दिसते. ती कोण हे शोधणे फारसे कठीण नाही, परंतु हे करण्यासाठी त्यांना पैसा कोणी पुरवला, तो कोणाच्या सांगण्यावरून पुरवला आणि त्यामागे कोणते हेतू होते हे शोधणेही तितकेच महत्त्वाचे असेल. गेले काही दिवस राज्यामध्ये जमीन व्यवहारांसंदर्भातील मोठमोठी प्रकरणे समोर आली आहेत. शेवटी मुख्यमंत्र्यांना स्वतः हस्तक्षेप करून त्या व्यवहारास थोपवावे लागले. त्यामुळे अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत हे उघड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या ‘असंतुष्टा’ चा उल्लेख आपल्या स्पष्टीकरणात्मक व्हिडिओत मोघमपणे केलेला आहे, तो विरोधी पक्षीय की स्वपक्षीय हे आता जनतेला जाणून घ्यायचे आहे. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि त्यात दोघा मंत्र्यांनी सर्व मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत असल्याची ग्वाही दिली. वास्तविक, अशा प्रकारची पत्रकार परिषद घेताना सरकारमधील मुख्यमंत्र्यांनंतरच्या सर्वांत ज्येष्ठ मंत्र्यांनी ती घेणे अधिक उचित ठरले असते, परंतु येथे तसे घडलेले दिसत नाही. मुळात पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळाचा पाठिंबा आपल्या नेत्याला असल्याचे सांगणे भाग पडले हेच कुठेतरी काहीतरी चुकत असल्याचे संकेत देते. आपली बदनामी करण्याचे षड्यंत्र राजकीय हेतूप्रेरित आहे असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्पष्टीकरणात्मक व्हिडिओत सांगितले आहे आणि ते पटण्याजोगे आहे. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यावर केलेली टीका, एखाद्या नागरिकाने केलेली टीका आणि एखाद्या एजन्सीमार्फत शिस्तबद्धरीत्या केला जाणारा अपप्रचार यातला फरक कळण्याएवढी गोव्याची जनता नक्कीच सुज्ञ आणि सुबुद्ध आहे. ह्या अपप्रचारामुळे उलट असे झाले की मुख्यमंत्र्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली. गेली वीस वर्षे चाललेल्या जमीन घोटाळ्यात आपण स्वतःहून विशेष तपास पथक स्थापन करून विदेशस्थ गोमंतकीयांच्या जमिनी हडप करण्याच्या प्रकारांना कसा आळा घातला, आजवर त्या प्रकरणात सहा सरकारी कर्मचाऱ्यासह अठ्ठावन्न जणांना कशी अटक झाली आहे, 99 मालमत्ता कशा जप्त केल्या गेल्या आहेत ते त्यांना सांगता आले. जुवारी कारखान्याची औद्योगिक वापरासाठी दिली गेलेली जमीन भूखंड पाडून विकण्याच्या प्रकारात दलाली घेणारे कोण आहेत हे काही दिवसांत उघड होईल हेही त्यांना सांगता आले. नोकरभरतीबाबत आपल्यावर आरोप होत असले तरी राज्यात प्रत्येक खातेनिहाय चालणारी नोकरभरती आपण बंद पाडून कर्मचारी भरती आयोगामार्फत नोकरभरती केल्याने त्यातील गैरप्रकारांना आळा बसल्याचे त्यांना सांगता आले. जनतेशी थेट संवाद साधणारा व्हिडिओ जारी करून मुख्यमंत्र्यांनी आपल्याविरुद्ध वातावरणनिर्मिती करून राज्यात नेतृत्वबदलाची शक्यता निर्माण करू पाहणाऱ्या असंतुष्ट घटकांना जोरदार चपराक दिली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी सर्वांत मोठी जमेची बाब म्हणजे पक्षनेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला दृढ विश्वास. एखाद्या सेक्स स्कँडलमध्ये अडकणारा हा नेता नाही. जोवर पक्षनेतृत्वाला त्यांच्या येथील कामगिरीबाबत विश्वास वाटत राहील, तोवर राज्यात नेतृत्वबदलाचा प्रश्न येणार नाही. मुळात निवडणुका जवळ नाहीत, त्यामुळे विरोधी पक्षांकडून अशी मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता कमी होते. तरीही मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपप्रचार होतो ह्याचाच अर्थ अशा काही शक्ती आहेत, ज्यांना विद्यमान मुख्यमंत्री हा अडथळा वाटतो आहे. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांना राज्यात नेतृत्वबदल झालेला हवा आहे. ह्या असंतुष्ट अदृश्य शक्ती कोण हे आता मुख्यमंत्र्यांनी शोधावे!