Home बातम्या अश्रू पुसले जात नाहीत तोपर्यंत विकास अपूर्ण : रानडे

अश्रू पुसले जात नाहीत तोपर्यंत विकास अपूर्ण : रानडे

0

राजकीय स्वातंत्र्य हे देशाच्या विकासाची पहिली पायरी असते. जोपर्यंत दुःखी माणसांचे अश्रू पुसले जात नाही तोपर्यंत विकास पूर्ण होणार नाही, असे ज्येष्ष्ठ स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे यांनी काल वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सांगितले.

मिरामार येथील हर्षदा आर्ट गॅलरीत मोहन रानडेंशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता.

पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील जनतेत देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रप्रेमाविषयीची जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही गोव्यात आलो. इथे आल्यावर देशप्रेमाची भावना तर लोकांना होतीच हे दिसून आले, परंतु इथल्या लोकांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करायचे काम महत्त्वाचे होते कारण इथली जनता पोर्तुगीज हुकूमशाहीच्या दडपणाखाली होती, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज होती, असे ते म्हणाले.

उपस्थितांनी यावेळी श्री. रानडे यांच्याशी संवाद साधला. या दरम्यान इतिहास संशोधक तथा शिल्पकार सचिन मदगे यांनी श्री. रानडे यांची शिल्पाकृती बनविली. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्षांनी मी इथे आलो तेव्हा इथला विकास पाहून खूप आनंद झाला. शिक्षण क्षेत्रात झालेला विकास पाहून तर आम्ही केलेल्या त्यागाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. त्रुटी या असणारच पण पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून गोवेकर मुक्त झाले ही गोष्ट माझ्यासाठी आनंददायी होती.

आपल्या गोव्यातील वास्तव्यातील अनेक आठवणींना उजाळा देवून श्री. रानडे यांनी सांगितले, की आपण महाराष्ट्रातून गोव्यात आलो तेव्हा इथे पोर्तुगीजमधून शिक्षण दिले जायचे, परंतु काहीजण देवळात वगैरे शाळा भरवायचे आणि मी व माझे काही सहकारी मुलांना मराठीतून शिक्षण द्यायचो. त्यावेळी ख्रिस्ती बांधवही आपल्या मुलांना मराठी शिकायला पाठवायचे. कारण त्यांची समजूत होती, की मराठी शिकल्याने गणितही चांगले समजते.

गोव्यात शिक्षक म्हणून कार्य करीत असतानाच लग्न लावणे, तुलसी विवाह आदी ब्राह्मणी कार्य करणे अशा माध्यमातूनही लोकांच्या संपर्कात येत होतो, असे रानडे यांनी स्पष्ट केले.