28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

अशोभनीय

केरळ विधानसभेमध्ये काल जो काही प्रकार घडला तो अत्यंत अशोभनीय आणि आपल्या देशातील सांसदीय लोकशाहीला लज्जित करणारा आहे. सत्ताधारी यूडीएफ आघाडीतील अर्थमंत्री के. एम. मणी यांनी राज्यातील बंद करण्यात आलेले दारूचे गुत्ते पुन्हा सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप तेथील बारमालक संघटनेच्या अध्यक्षांनी केलेला आहे. त्यामुळे अशा कलंकित व्यक्तीला विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडूच देणार नाही अशी भूमिका विरोधी एलडीएफने घेतली होती आणि त्यातून कालचा सारा तमाशा झाला. सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही गटांतील आमदार जोरदार मोर्चेबांधणी करून होते. शुक्रवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर होणार असल्याने गुरूवारी रात्रभर हे बहुतेक आमदार विधानसभेतच राहिले. खुद्द अर्थमंत्री मणी यांनी देखील विधानसभा संकुलातील ६१० क्रमांकाच्या खोलीत मुक्काम ठोकला. काल शुक्रवारी सकाळी जेव्हा ते अर्थसंकल्प मांडण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा दोन्ही गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांनी एकमेकांना गुद्दागुद्दी केली, माईक तोडले, खुर्च्या फेकल्या, इतकेच नव्हे, तर खुद्द सभापतींची खुर्ची उचलून खालच्या हौद्यात फेकून देण्यात आली. या सगळ्या गोंधळात एक आमदार भोवळ येऊन पडले, तर काहींना जखमी झाल्याने इस्पितळात दाखल करावे लागले आहे. हा सगळाच प्रकार दुर्दैवी आणि अशोभनीय अशा स्वरूपाचा आहे. खरे तर के. एम. मणी यांच्याविरुद्ध एक कोटीची लाच स्वीकारल्याची तक्रार करण्यात आलेली असल्याने आणि राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने गेल्या डिसेंबरमध्ये ती नोंदवून चौकशी सुरू केली असल्याने मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणे आवश्यक होते, परंतु मणी हे पडले कॉंग्रेसप्रणित यूडीएफमधील सहयोगी पक्षाचे आमदार. मणी यांच्या या पक्षाचे विधानसभेत नऊ आमदार आणि लोकसभेत दोन खासदार आहेत आणि आमदारांचा पाठिंबा सरकारला आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यतेपोटी चंडी यांना त्यांच्याच करवी राज्याचा अर्थसंकल्प मांडणे अपरिहार्य ठरले. त्यामुळे ज्याच्यावर एक कोटीची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे, अशी कलंकित व्यक्ती अर्थसंकल्प मांडते हे विरोधी डाव्या आघाडीला सहन झाले नाही आणि यातून कालचा अनवस्था प्रसंग गुदरला. डाव्या आघाडीतून फुटून निघालेल्या पी. जे. जोसेफ यांनी मणी यांच्या केरळ कॉंग्रेसशी हातमिळवणी केलेली असल्याने डाव्यांना तो रागही आहे. एकमेकांना मज्जाव करण्यासाठी रात्रभर विधानसभेतच मुक्काम ठोकणे, गुद्दागुद्दी करणे, माईक तोडणे, सभापतींचे आसन फेकून देणे हे सगळे टाळता आले नसते का हा खरा प्रश्न आहे. भावना कितीही तीव्र जरी असल्या, तरी आपल्यापुढे असलेली कायदा आणि संविधानाने घालून दिलेली चौकट मोडली जाणार नाही याची काळजी राजकीय नेत्यांनी घेणे अपेक्षित आणि आवश्यक असते. परंतु त्याबाबत कोणतेही ताळतंत्र काल केरळच्या आमदारांनी बाळगले नाही आणि सारे एकमेकांवर तुटून पडले. लोकसभा किंवा विधानसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये अशा प्रकारचा तमाशा आपल्या देशात वारंवार घडताना दिसत असतो. अलीकडे विधिमंडळ कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने आपले वर्तन नागरिक थेट पाहात आहेत, याचे भान न ठेवता काही आमदार मंडळी वागत असतात. त्यामुळे केरळ विधिमंडळामधील साराच प्रकार सांसदीय लोकशाहीची अप्रतिष्ठा करणारा आहे असे म्हणावे लागेल. ज्यांनी सभापतींचे आसन फेकून दिले, माईक तोडले, गुद्दागुद्दी केली, त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी जणू विधिमंडळाच्या प्रतिष्ठेलाच हात घातला आहे. राजकारणामध्ये विरोध, आंदोलने, निषेध अपरिहार्यच असतात, परंतु ते करण्याचीही पद्धत असते. सार्‍या मानमर्यादा राखून आणि कायदा तसेच विधिमंडळाचे संकेत आणि परंपरा पाळून जर विरोध प्रदर्शित केला गेला तर त्याची शान अधिक वाढते. परंतु आजकाल आपल्या तीव्र भावनांचे प्रकटन तितक्याच आक्रमक आणि आक्रस्ताळ्या पद्धतीने करण्याची स्पर्धाच राजकारण्यांमध्ये लागलेली दिसते. केरळ विधानसभेत जे काही घडले, तो त्याचाच परिपाक आहे. निषेधाची परिभाषा सुधारण्याची नितांत आवश्यकता आज भासते आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

मेहेरबानी का?

गोव्यातील खासगी इस्पितळांवर राज्य सरकार आणि विशेषतः आरोग्य खाते फारच मेहेरबान दिसते. देशातील बहुतेक सर्व राज्यांनी खासगी इस्पितळांतील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे दर...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

चौकशी करा

राज्यातील बांधकाम मजूर घोटाळाप्रकरणी निवृत्तीच्या उंबरठ्यावरून लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी दिलेला निवाडा सरकारची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बांधकाम...

दिलासा आणि भरवसा

कोरोनाने मानवाची सर्वश्रेष्ठत्वाची अहंता उद्ध्वस्त केली. डोळ्यांना न दिसणारा, संवेदनांना न जाणवणारा एखादा अतिसूक्ष्म विषाणू देखील ह्या अब्जावधी माणसांना एवढे हतबल करू...