अशी ही ‘ज्येष्ठांची धम्माल’

0
11
  • यशवंत (सुरेंद्र) शेट्ये

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोवा आर्ट सर्कल आयोजित ‘ज्येष्ठांची धम्माल’ हा गायन-वादन, भजन-कीर्तन, नृत्य-नाट्य, विनोद-नकला यांनी ओतप्रोत भरलेला सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी पणजी येथील मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठांचे जीवन सुसह्य करणारा हा कार्यक्रम सर्वांना प्रेरणा देऊन गेला.

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोवा आर्ट सर्कल आयोजित ‘ज्येष्ठांची धम्माल’ हा गायन-वादन, भजन-कीर्तन, नृत्य-नाट्य, विनोद-नकला यांनी ओतप्रोत भरलेला सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी पणजी येथील मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सकाळी 10 वा. सुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालला.

स्वतःला ज्येष्ठ नागरिक न म्हणता ‘यंग सिनियर्स’ म्हणत ज्येष्ठांचा गोतावळा पणजीत जमला. यंदाचा कार्यक्रम हा अठरावा असल्यामुळे वयात आलेल्या तरुणाईच्या उत्साहाने सगळे ज्येष्ठ नागरिक वावरताना दिसले. सगळ्यांसाठी ठरवलेला गणवेश प्रत्येकाने परिधान केलेला आणि ‘गोवा आर्ट सर्कल’च्या ‘ज्येष्ठांची धम्माल’ सहयोगी- असे लिहिलेली ओळखपत्रे गळ्यात मिरवीत जो-तो आपल्या सादरीकरणाची प्रतीक्षा करीत उद्घाटनाच्या कार्यक्रमात रमलेला.
नेहमीप्रमाणे अगदी वेळेत म्हणजे 10 च्या ठोक्याला उद्घाटन पार पडले. गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हजर असलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या अंगभूत कलागुणांनी मुसमुसलेला आणि सादरीकरण करण्यासाठी सज्ज झालेला दिसत होता. सुरुवातीला प्रमुख अतिथी डॉ. घोडकिरेकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ हे गाणे काही ज्येष्ठांनी गायिले. नंतर ‘ज्येष्ठांची धम्माल’चे सर्व सहयोगी ‘यंग सिनियर्स’ यांनी त्यांची नेहमीची प्रार्थना- ‘इतनी शक्ति हमें देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना’ ही प्रार्थना कार्यक्रमाचे संयोजक शशिकांत सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली म्हटली.

एखाद्या शाळेतील विद्यार्थी भासावेत असे सगळेजण युनिफॉर्ममध्ये आणि हात जोडून प्रार्थना म्हणत असताना, प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनाची पुनःप्रचिती आल्यासारखे नक्कीच जाणवले असेल! त्यानंतर चार सहयोगींनी ‘हीच अमुची प्रार्थना अन्‌‍ हेच अमुचे मागणे’ ही प्रार्थना समरसून गायिली. त्यानंतर ‘ज्येष्ठांची धम्माल’चे एक सहयोगी कुंकळ्ळीचे श्री. कृष्णा नाईक यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नंतर 2017 पासून म्हणजेच ‘ज्येष्ठांची धम्माल’ कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत नियमितपणे या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या आणि वयाची सत्तरी गाठलेल्या अकरा स्त्री-पुरुष यंग सिनियर्स सहयोगींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करणारी एक सुंदर कविता सुरेखा खेडेकर यांनी सादर केली, तर सर्व सन्मानीत सहयोगींच्या वतीने प्रसाद सावंत यांनी विचार मांडले.

उद्घाटन, सत्कार आणि सन्मान कार्यक्रम पार पडल्यानंतर सुरू झाला एक से बढकर एक तऱ्हेवाईक कार्यक्रमांचा सिलसिला. पेटी-तबल्याची मांडावळ होऊन सुरुवातीला भजन आणि गायनाचा कार्यक्रम सादर झाला. यात अर्जुन पोके यांनी सुरुवात करीत ‘रूप तुझे नाम’ हा अभंग आणि साईबाबांचे भजन सादर केले. मेघनाथ गावकर यांनी ‘निर्गुणाचा संग धरिला जो आवडी’ हा अभंग सादर केला. कृष्णा नाईक यांनी ‘समाधी साधन संजीवन मन’ हा अभंग सादर केला. साईभक्त प्रसाद सावंत यांनी ‘यमुनेच्या गवळणी’ ही गवळण सादर केली. पुरुषोत्तम सावंत यांनी गीत-रामायणामधील ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ हे गाणे सादर केले. दत्ताराम कासकर यांनी ‘माझा भाव तुझे चरणी’ हा अभंग सादर केला. भजन आणि गायनाचा कार्यक्रम आवरता घेत वृषाली बेतकेकर यांनी संगीत ‘संशय कल्लोळ’मधील ‘कृतिका’ सादर केली. खास ढंगातील भरजरी शालू नेसून तिने उत्कृष्ट ‘कृतिका’ सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर कृष्णा नाईक हे प्रेक्षकांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. विविध पशुपक्ष्यांचे आवाज काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. अगदी सहजगत्या ते कुत्रा, मांजर, गाय, डुक्कर या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचेही आवाज हुबेहुब काढतात. काव-काव, चिव-चिव, भो-भो, म्याँऊ म्याँऊ झाल्यावर रंगमंचावर सजून-धजून, नटून-थटून अवतरल्या ‘ज्येष्ठांची धम्माल’च्या एक सहयोगी नृत्यांगना शोभा धामसकर. त्यांनी भरतनाट्यम्‌‍ नृत्य सादर करून वाहवा मिळविली. तिच्यावर कडी करणारी दुसरी नृत्यांगना स्मिता करमली यांनी पायघोळ घागरा परिधान करून ‘चोरी चोरी’ या हिंदी सिनेमातील ‘पंछी बनूँ उडती फिरूँ मस्त गगन में’ या गाण्यावर सहजसुंदर, बहारदार आणि दिलखेचक नृत्य सादर केले. नंतर सादर झालेली लावणी रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेली. हे लावणीनृत्य सादर केले होते सुरेखा खेडकर यांनी. चापून-चोपून नऊवारी साडी नेसलेल्या खेडकर या ‘सुलोचना चव्हाण’च्या आवेशात आणि ‘सुरेखा पुणेकर’चे सौंदर्य लेवून ढोलकीच्या तालावर प्रत्यक्ष ढोलकी नसतानाही लाजवाब नाचल्या. नृत्याचा सिलसिला संपतच आहे इतक्यात माईक हातात घेऊन रंगमंचावर अवतरले ‘कराओके’ सिंगर नारायण तारी. त्यांनी 70-80 च्या दशकातील हिंदी सिनेगीत ‘मैं कहीं कवि न बन जाऊँ, तेरे प्यार में हैं कविता’ सादर केले. हे गाणे त्यांनी ऐकणाऱ्यांत ‘जितेंद्र’ जागा करीत सादर केले आणि कार्यक्रमाचा माहोलच बदलून टाकला. नंतर अस्मादिकांनी विनोदी कविता आणि विनोदी किस्से (जोक्स) सादर करीत प्रेक्षकांत खसखस पिकवली आणि रसिकांची मने जिंकली. अस्मादिकांनी ‘एक से बढकर एक’ अशी विनोदांची जंत्रीच सादर केली. व्हॉट्स ॲपवरून समोर आलेली पाळण्याच्या चालीवरची कविता रसिकांना ऐकविण्यात मला मजा आली, तेवढीत ती समोरच्या ऐकणाऱ्यांनाही आली असेल यात शंका नाही. त्यानंतर रेखा पार्सेकर यांनी आपल्या मंजुळ आवाजात एक गाणे पेश केले. सुरेखा खेडेकर आणि मी एक कोळीनृत्य सादर केले. ‘मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ या गाण्यावर केलेले आमचे नृत्य भाव खाऊन गेले. या नृत्यानंतर माया सावंत स्टेजवर आल्या. त्यांनी आपल्या भावाने लिहिलेली कोकणी कविता सादर केली.

आतापर्यंत सगळ्यांचे सादरीकरण झाले होते आणि मग शेवटी कार्यक्रमाचे संयोजक तसेच सूत्रसंचालक शशिकांत सरदेसाई यांनी हिंदी सिनेगीतावर ठेका धरला. मस्त दिलीपकुमार स्टाईल नाचत त्यांनी सगळ्यांनाच रंगमंचावर येऊन नाचायचा हुरूप आणला. ‘नया दौर’ या दिलीपकुमार-वैजयंतीमाला अभिनित सिनेमातील ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ हे गाणे नारायण तारी आणि आरती नायर म्हणत असताना शशिकांत सरदेसाई अवखळ आणि अल्लड तरुणाईत शिरून- दिलीपकुमार बनून- फर्मास नाचायला लागले. त्यांना साथ द्यायला वृक्षाली बेतकेकर ‘वैजयंतीमाला’ बनून त्यांच्यासंगे फेर धरून नाचायला लागल्या आणि मग सगळ्यांनाच नाचायचा हुरूप आला. तशात मी थोडी कल्पकता दाखवीत ‘कराओके’ सिस्टिमवर ‘बंबई से आया मेरा दोस्त’ गाणे काय वाजवले- जवळजवळ सगळे ‘यंग सिनियर्स’ आपापल्या जागा सोडून रंगमंचावर येऊन त्या गाण्यावर थिरकू लागले. जो तो आपल्या फ्री-स्टाईलमध्ये मदमस्त होऊन मनसोक्त नाचू लागला. हा ग्रुपडान्स फरफॉर्मन्स सर्वांवर कडी करणारा ठरला.

आणि मग सहभोजन होऊन ‘ज्येष्ठांची धम्माल’ कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम नीटनेटका आणि बहारदार व्हावा यासाठी गोवा आर्ट सर्कल, पणजीचे सर्वेसर्वा आणि ‘ज्येष्ठांची धम्माल’ या कार्यक्रमाचे प्रणेते श्री. शशिकांत सरदेसाई वयाच्या 83 व्या वर्षीही अहर्निश झटत आहेत. त्यांचा उदंड उत्साह सर्वच यंग सिनियर्सना ऊर्जा देणारा असतो. आणि म्हणूनच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी शशिकांत सरांना उदंड आयुरारोग्य लाभो आणि त्यांचा शतकमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आणि त्या समारोहाचे सूत्रसंचालन करण्याचे भाग्य मला लाभो, अशी इच्छा आपल्या भाषणातून व्यक्त केली. भरपेट जेवण करून सगळ्यांनी घरचा रस्ता धरला.