– श्रीकांत य. रामाणी
पोर्तुगीजांनी २५ नोव्हेंबर १५१० रोजी गोव्याचें तिसवाडी बेट काबिज केले. पुढे बार्देश, सासष्टीं व आताच्या गोव्यात असलेले अन्य भाग आपल्या ताब्यात घेतले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला. पुढे फ्रेंच पण निघून गेले. परंतु पोर्तुगीज मात्र गोवा,दमण व दीव ह्या प्रदेशात चिकटून राहिले. भारत सरकारने केलेले सामोपचाराचे सर्व प्रयत्न त्यांनी फेटाळून लावले. शेवटी १९६१ च्या नोव्हेंबर महिन्यात सैन्य पाठवून हा प्रश्न कायमचा सोडवण्याचे ठरवले गेले.
ले. जनरल जे.एन. चौधरी (जी. ओ. सी. इन चीफ, दक्षिण कमांड) यांना ह्या मोहिमेचे प्रमुख बनवण्यांत आले. मेजर जनरल कँडेथ (स्थल सेना), रियर ऍडमिरल भास्कर सोमण (नौसेना),व एयर व्हाईस.मार्शल पिंटो (वायूसेना) यांना तिन्ही दलांचे सहकारी -अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
नौसेनेला खालील कामगिरी देण्यात आली –
– गोवा राज्याला संलग्न असलेल्या समुद्री मार्गावर नियंत्रण ठेवणे (विशेषत: मुरगाव बंदर , आग्वाद येथील लहान बंदर, दमण व दीव )
– अंजेदिव बेटाचा ताबा घेणे,
– पोर्तुगीज लढाऊ नौकांनी भारतीय प्रदेशावर हल्ला करायचा प्रयत्न केल्यास त्यास प्रतिबंध करणे.
योजलेले उद्देश साधण्यासाठी सागरी नौकांचे चार विभाग बनविण्यात आले :
सर्फेस ऍक्शन ग्रुप : म्हैसूर, त्रिशुळ, बेट्वा, बियास व कावेरी,
करिअर टास्क ग्रुप : विक्रांत, दिल्ली, कृपाण, कुठार, कुक्री व रजपूत,
माईन्स्वीपिंग ग्रुप : कारवार, काकिनाडा, कानान्नोर व बिमलीपट्टण,
सपोर्ट ग्रुप ः धारिणी.
१७/१८ डिसेंबरच्या मध्यरात्री बेटवा, बियास व कावेरी त्यांना दिलेले काम पार पाडण्यासाठी गोवा परिसराकडे निघाल्या. १८ डिसेंबरच्या पहाटे बेटवा व बियास गोव्याच्या किनार्यापासून १३ कि.मी. दूर होत्या.त्या ‘‘ऑपरेशन चटणी’’ म्हणून नाव दिले गेलेल्या टेहळणीच्या कामगिरीवर होत्या. त्या वेळेस ‘आफोंस द आल्बुकर्क‘ मुरगाव बंदरात नांगर टाकून थांबला होता व त्याच्या डोक्यावरून जाणार्या भारतीय वायूसेनेच्या विमानांवर विमान-विरोधी तोफांनी गोळीबार करत होता. ह्या गोळीबाराचा जराही परिणाम होत नव्हता. तरीपण त्यापासून धोका व उपद्रव संभवत होता. त्याच्यावर असलेल्या ४.७ इंच तोफांपासून गोव्यातील शहरात शिरल्यावर भारतीय सेनेस धोका उद्भवत होता. त्यामुळे ह्या नौकेला उद्ध्वस्त करणे किवा निष्क्रीय करणे गरजेचे होते.
‘आफोंस द आल्बुकर्क‘ ही १.७८८ टनाची फ्रिगेट होती आणि तिच्यावर ४.७ इंचाच्या ४ तोफा, ३ इंचाच्या २ विमानविरोधी तोफा, २० मि. मी.च्या ८ विमानविरोधी तोफा व पाणबुडीवर डेप्थ चार्ज टाकणारे ४ थ्रोवर्स होते. ही नौका १९२४ मध्ये बांधली गेलेली होती.
‘ऑपरेशन विजय‘केव्हा सुरु होईल ह्याचे आदेश ३-४ दिवस अगोदर दिले गेले. ’बेटवा’चा कप्तान कमांडर आर. के. एस. गांधी होते. (ते पुढे व्हाईस-ऍडमिरल पदावर पोचले), बियास चे कप्तान कमांडर कुन्नेनकेरील (पुढे कोमोडोर झाले) व ‘कावेरी’चा कप्तान ले. कमांडर एस. व्ही. महादेवन (पुढे कमांडर झाले) हे होते.
बेटवाने पोर्तुगीज नाविक सीमेचे तीन भाग केले. त्याप्रमाण् बियासला उत्तरेचा भाग, बेटवा मध्यभागी राहिली (मुरगाव बंदरासमोर) व कावेरीला दक्षिण भाग सोपवला गेला. ह्या रचनेप्रमाणे किनार्यापासून ८ मैल समांतर टेहळणी करायची होती.
शनिवारी, १७ डिसेंबरला पहाटे ‘ऑपरेशन विजय ‘ सुरु होणार असा आदेश मिळाला. त्या रात्री सर्वांना युद्धास तयार होण्याचे आदेश देण्यात आले. अधिकारी व नौसैनिकाना आंघोळ करून स्वचछ अंतर्वस्त्रे घालण्यास सांगितले गेले. त्यामुळे जखम झाल्यास ती चिघळण्याचा, पुढील त्रास होण्यास अटकाव झाला असता.
बेटवा’चा गनरी ऑफिसर लेेफ्टनंट आर. पी. सावनी हा होता (पुढे व्हाईस ऍडमिरल झाला) कप्तानाने त्याच्याशी विचारविनिमय करून एचई/व्हीटी शेल्स त्याला व्हेरिएबल टाइम (व्हीटी) पयुज बसवायचे असे ठरविले. त्यामुळे लक्ष्य अगदी जवळ आल्यावर त्याचा स्फोट होईल व अप्पर डेकवर असलेल्या सर्वांना त्याचे लहान लहान तुकडे लागून ते ठार होतील किंवा जखमी झाले असते. ह्या नुसार मागील टरेटमधील दोन तोफांमध्ये एचई/व्हीटी गोळे दुसर्या दिवशीच्या युद्धासाठी भरण्यात आले. लढाई संपल्यावर ह्याचा परिणाम नौकेच्या पुढच्या भागात होऊन अगणित छिद्रांत झाल्याचे दिसून आले.
बेटवा गोव्याच्या सीमेपासून १३ कि.मी. अंतरावरून येरझार्या घालीत असताना आल्बुकेर्क बंदर सोडायच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. हे बघून तिने आपला वेग कमाल मर्यादेवर आणला. तीने बियास व कावेरीला कळविले ‘माझ्या बरोबर या माझा वेग २३ नॉट आहे. मी आल्बुकेर्कला पकडायचे/किंवा त्याचा नाश करायचे ठरवले आहे‘
त्यांना संदेश मिळाल्याचे उत्तर मिळताच बेटवा मुरगाव बंदराकडे वेगाने निघाली. बियास पण जवळ आली. बेटवाने तीला तीच्या मागोमाग यायला सांगितले. १२-१५ वाजता बंदरात असलेल्या .व्यापारी जहाजांच्या घोळक्यात. ७००० मीटर अंतरावर आल्बुकेर्क असल्याचे दिसून आले. बेटवाने आल्बुकेर्कला मोर्सने संदेश दिला. ‘आत्मसमर्पण कर नाही तर मी तोफमारा करीन ‘उत्तरासाठी तीन मिनिटे दिली गेली. आल्बुकेर्कने उत्तर दिलें ‘‘.थांबाङ्घ तीन मिनिटे संपल्यावर बेटवाने फायर करण्याचा हुकुम दिला. तोफांच्या अचूक मार्याने आल्बुकेर्कचा कमांड टॉवर कोसळला. ह्या मार्यात दोन नौसैनिक ठार झाले व कप्तान जबर जखमी झाला. आल्बुकेर्कने आपला नांगर वर घेतला व तो बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करु लागला. बेटवा व बियास यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यास सुरवात केली. पण हा मारा लक्ष्य साधू शकला नाही. ही संपूर्ण लढाई फक्त दहा मिनीटे चालली.
पोर्तुगीज जनरल कार्लुश आझारेदु हा तेव्हां कॅप्टनच्या हुद्यावर गोव्यांत कार्यरत होता. त्याने ह्या लढाईबद्दल असे लिहिले आहे : ङ्गमी चीफ कमांडरना भेटण्यासाठी गाडीने जात असताना एका उंच जागी पोंचलो तेव्हां मला ‘ आफोंसु द आल्बुकेर्क’ व भारतीय नौसेनेच्या तीन फ्रिगेट यांच्यात चाललेली लढाई बघता आली. आमची युद्धनौका दोनापावल येथे नांगरून पडली होती. तिला ललकारले गेल्यावर तिने भर समुद्रात जायचा प्रयत्न केला. शत्रुच्या तोफा एचटी/व्हीटी दारुगोळा वापरत होत्या. त्यांचा आवाज व होत असलेला धुरळा स्पष्ट दिसत होता. त्यापैकी एक गोळा नौकेवर फुटला व त्यामुळे एक नौसैनिक मेला व नौकेचा कप्तान कुन्य आरागाव जबर जखमी झाला. नौका १८० अंश फिरली व नौकेचा पुढचा भाग बांबोळीच्या उथळ पाण्यात बुडला. सरकारतर्फे सांगण्यात येणार्या वर्णनांत काही सत्य नाही.’’
बियासने पण ह्या गोळाबारीत भाग घेतला. त्यामुळे लक्ष्य घेण्यात अडचण येऊ लागली. इतक्यात कावेरीने आपल्या ४ इंच तोफांचा उपयोग केला. अंतिम टोला कावेरीनेच दिला. आल्बुकेर्क या मार्यामुळे जळायला लागली. तिच्या ध्वजकाठीवर शरणागतीचा पांढरा ध्वज लावला गेला त्यानंतर तिने शिरदोन जवळ उथळ पाण्यात कलंडून स्वतला:झोकून दिलें. मेलेल्या सहकार्याला मागे सोडून सगळेजण दोनापावल जेटीजवळ गोळा झाले. जखमी कॅप्टन कापितांव दे मार ए गेर्रा आंतोनियो दा कुन्हा आरागावला पणजीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. युद्ध संपल्यावर पोर्र्तुगीज सरकारने आपल्या आल्बुकेर्क नौकेने मोठा पराक्रम केला, तिने भारतीय नौकेची हानी केली वगैरे प्रसिद्ध केले. याच्यात काही तथ्य नव्हते हे कमांडर गांधी व कॅप्टन आरागांव यांच्यांत झालेल्या संभाषणावरून समजेल.
सौजन्य म्हणून कमांडर गांधी सुकामेवा, चॉकलेट, ब्रॅडी व इतर भेटवस्तू घेऊन जखमी पोर्तुगीज कॅप्टनला भेटायला हॉस्पिटला गेले. त्यांच्यात झालेले संभाषण कमांडर गांधीच्या शब्दांत असे होते:
‘‘पोर्तुगीज कप्तान आन्तोनीयु द कुन्य आरागांव यांना भेटायला मी पणजी येथील हॉस्पीटल मध्ये गेलो. दोन नौसैनिक त्याची सेवा करत होते. चॉकलेट, फुलें, व ब्रँडी भेट म्हणून घेऊन कप्तानला भेटलो. त्याचे वय ५७ वर्षे होते. मी त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होतो. बँडेज बांधलेल्या अवस्थेत तो बिछान्यात बसला होता. …माझी ओळख सांगितल्यावर तो म्हणाला :तू एफ १३९ आहे का? (हा बेटवाचा नंबर होता.) मी होय म्हटल्यावर तो म्हणाला. ‘तुला मी दोनदा ठोकले आहे.’ मी म्हटले माफ करा, तू मला जराही ठोकले नाही. मग त्याने विचारले ‘तर मग धूर का निघत होता?’ मी त्याला सांगितले की टाइप ४१ फ्रिगेट जेव्हा फार वेगाने जातात तेव्हा धूर सोडतात.’’ याचा अर्थ असा आहे की त्याने सगळीकडे असे सांगितले असावे की आल्बुकेर्कने भारतीय नौकेला ठोकले होते व ती नौका धूर सोडत माघारी गेली होती ! सर्व लेखकांनी ह्या गैरसमजुतीचा पुनरुच्चार केला आहे व सत्य शोधायचा प्रयत्न केला नाही. एके काळी आपल्या नौकेच्या बळावर पोर्तुगिजांनी आपल्या देशात धुमाकूळ घातला त्याच देशाची नौका बुडवून आपल्या नौसेनेने त्याचा वचपा घेतला हे बघून मन अभिमानाने भरून येते.

