– डॉ. प्रमोद पाठक
गेल्या काही दिवसांत अस्वस्थ करणार्या बातम्या येत आहेत. गोव्यामध्ये अकाली हृदयरोग होण्याची अनेक उदाहरणे पुढे आल्याने हृदयरोगतज्ज्ञांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अगदी याच आठवड्यात अकाली सांधेदुखी (रीींहीळींळी) होणार्या रुग्णांची संख्या वाढल्याची बातमी वाचनात आली. काही महिन्यांपूर्वी हाडांची घनता मोजण्याच्या एका शिबिरात काही तरुणांनीही सहज म्हणून आपली तपासणी करून घेतली, तेव्हा त्यांतील बर्याच तरुण-तरुणींची अस्थिघनता ही अपेक्षेपेक्षा कमी निघाली. त्यांच्याशी बोलताना लक्षात आले की त्या तरुण-तरुणींनी १० वीपासून घाम गाळणारा व्यायाम कधीच केला नव्हता. हे सगळे पाहता एकंदरच तरुणपिढी योग्य व्यायामाअभावी अशक्त होत आहे, तिची अंतर्गत प्रतिकार यंत्रणा कमजोर होते आहे हे लक्षात आले. याचबरोबर केवळ गोव्यातच नव्हे तर पंजाब, मणीपूर, मिझोराम इ. सीमावर्ती प्रांतांत तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढते आहे. काही प्रांतांमध्ये तर तरुणपिढी लवकर मृत होत असल्याने बालकांना आजोबा माहीत नसतात अशी स्थिती आहे.
तरुणपिढी जर वयाच्या ३०-३२ व्या वर्षापासून औषधांवर जगू लागली तर पुढे जाऊन ज्या जोमाने राष्ट्र पुढे न्यायचे आहे त्यालाच उतरती कळा लागेल. ही सामूहिक अशक्तता केवळ गरीब अथवा श्रीमंत यांच्या वर्गांपुरती मर्यादित नसून समाजाच्या सर्व घटकांमधील तरुणपिढीत ती दिसून येते.
याबाबत अनेक कारणे दिली गेली आहेत. आजकालची कुमार आणि तरुणपिढी चांगले सकस अन्न खात नाही. जंकफूड खाण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. हे तरुण व्यायामही करत नाहीत. अमेरिकेत ज्याला कोच्याला चिकटलेला बटाटा म्हणतात (र्लेीलह िेींरींे) तसे हे तरुण झाले आहेत. सदैव संगणकाला चिकटलेले असतात. त्यांची हालचाल फक्त हातांची बोटे आणि डोळ्यातील बुबुळांची हालचाल इतक्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. वाढत्या अंगाबरोबर खाल्लेलं अन्न मेहनतीअभावी शरीरात साठून पोटाचा घेरच वाढतो आहे, अशी अनेक कारणे देण्यात येतात. ती बर्याच अंशी खरी आहेत.
खेळसंस्कृतीचा अभाव
सर्वसाधारणपणे शाळांमधून डोकावल्यास असे दिसते की ८व्या इयत्तेपर्यंतची मुले-मुली मधल्या सुट्टीत खेळतात, हुंदडतात, आणि त्यामुळे त्यांचा दररोज एक प्रकारे व्यायाम होत असतो. तसेच शारीरिक शिक्षणाच्या तासाला त्यांच्याकडून एकजात व्यायाम, संचलन इ. करवून घेतले जात असल्याने ही मुले निरोगी असतात. एकदा का मुलगा-मुलगी ९वीत गेली की त्यांच्यामागे शिकवणीचे शुल्ककाष्ठ लागते. आपल्या मुलाने मेरिटमध्येच उत्तीर्ण झाले पाहिजे अशी सुप्त इच्छा सर्वच पालकांची असते. त्यांचा अभ्यास चांगला व्हावा या सदिच्छेने पालक शाळा संपल्यावर अनेक प्रकारच्या शिकवण्यांना घालतात. ज्यावेळी या विद्यार्थ्यांनी खेळायचे, त्यावेळी त्यांना शिकवण्यांच्या वर्गांमध्ये कोंबले जाते. त्यामुळे हे विद्यार्थी ना धड शाळेत लक्ष देतात, ना शिकवणीच्या वेळी त्यांचे पूर्ण लक्ष असते.
आजकाल एक नवी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. आठवी इयत्तेपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या शैक्षणिक धोरणामुळे तो तिथे पोहोचेपर्यंत मनापासून शिकण्याच्या आणि अभ्यास करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याला साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत. चांगले वाचता अथवा लिहिता येत नाही.
शाळांना आपल्या दहावीच्या वार्षिक निकालाची काळजी असते. तेव्हा दहावीत अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना नववीतच गाळून टाकले की निकालाची शाश्वती देता येते. त्यामुळे नववीच्या वर्गात एकदम अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ज्या पाचवी ते आठवीच्या शैक्षणिक काळादरम्यान मन लावून अभ्यास करण्याचे तंत्र आत्मसात करायचे असते, नेमके त्याच काळात विद्यार्थी आणि शिक्षक बेफिकीर होतात, राहतात.
नववीपासून पुढे खरी मेहनत करण्याची गरज असताना अंगातील रग जिरविण्याची वेळ असते. तेव्हा हे विद्यार्थी शाळा व शिकवणीच्या दाराआड कोंडले जातात. शाळांमधून आठवड्यातून जेमतेम दोन तासिका ४०-४५ मि. शारीरिक शिक्षणासाठी दिलेल्या असतात. शाळांना आणि शालेय स्तरावरील शारीरिक शिक्षण देणार्या शिक्षकांना (पीईटी) शाळेचे नाव पुढे आणायचे असते. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बक्षिसे कमवायची असतात. त्याच उद्देशाने ज्या मुलांनी काही विशेष प्रावीण्य दाखविले त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. खेळांचे गट निर्माण करून त्यांच्या प्रशिक्षण आणि सरावावर भर दिला जातो. त्यामुळे या जेमतेम दोन तासिकांदरम्यान उरलेले ८०-९० टक्के विद्यार्थी काय करत असतात? टिवल्याबावल्या! आपले जे मित्र खेळत असतात त्यांच्याभोवती कोंडाळे करून खेळ पाहणे अथवा वेगवेगळ्या छोट्या गटांत विभागले जाऊन गप्पा मारणे, टवाळक्या करणे हाच त्यांचा उद्योग असतो. हे मैदानाबाहेरचे विद्यार्थी कुठल्याही खेळापासून, शारीरिक मेहनतीपासून वंचित असतात. या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खेळसंस्कृती बाणवली गेली पाहिजे, ते होतच नाही. समोरचा खेळतो आहे हे पाहून त्याला खेळण्याची सुरसुरी आली तरच खेळसंस्कृती अंगात भिनली असे म्हणता येईल. नेमके तेच त्या आठवड्यातील दोन तासिकांमध्ये घडत नाही. खरे तर हे विद्यार्थी सायंकाळी मैदानावर जाणार नसतील तर शाळेच्या वेळेतच त्यांच्यावर शारीरिक व्यायामाचा प्रयोग झाला पाहिजे.
मध्यंतरी मी २-३ शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींजवळ कल्पना मांडली होती की, नेहमीच्या तासिकांमधून प्रत्येकी ५ मि. कमी करून दररोज २५-३० मि. केवळ खेळासाठी काढली जावीत. अभ्यासक्रम संपविण्याचा ससेमिरा असणारच आहे, पण आज खेळ-व्यायामासाठी काढलेली ५-५ मि. पुढे विद्यार्थ्यांचे आयुष्य निरामय करण्याचा पाया घालतील.
इथे एका महाविद्यालयाचे उदाहरण देण्यासारखे आहे. स्वा. सावरकरांचे निस्सीम भक्त असलेले, महाविद्यालयीन शिक्षण आणि स्थानिक पातळीवरील बर्फ बनविण्याच्या व तशाच कमी संसाधनांच्या उद्योगांची सांगड घालणारे यवतमाळचे प्राचार्य बाबाजी दाते यांच्या वाणिज्य महाविद्यालयात एकजात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना सकाळी मैदानावर कवायतीसाठी व सूर्यनमस्कार घालण्यासाठी येण्याची सक्ती होती. स्वतः बाबाजी दाते ६.३० ला प्रार्थनेसाठी उभे राहत आणि खणखणीत आवाजात ‘की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने’ हे गीत म्हणत वातावरण भारून टाकत. त्यावेळीही अभ्यासक्रम संपविण्यासाठी वेळ कमीच पडत असे. हे व्यायामाचे व्रत थेट महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत अंगिकारण्याची आज आवश्यकता आहे.
यासाठी दोन-तीन व्यायामप्रकार सरसकट सर्वांसाठी लागू करता येतील. योगासने, सूर्यनमस्कार आणि धावणे हे सर्वांना सहजपणे करता येण्यासारखे आहेत. दररोजच्या या शारीरिक शिक्षणाच्या तासाला ते आलटून-पालटून अंमलात आणता येतील. त्यासाठी वेगळे खेळाचे महागडे साहित्य नको. फार मोठे मैदान नको. अंगातली रग जिरविण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांचा नक्कीच उपयोग होईल.
पालक संघाची जबाबदारी
आपल्या मुलांविषयी जागरूक असलेल्या पालकांचाही अत्यंत एकांगी दृष्टिकोन बनला आहे. अभ्यास आणि परीक्षेतील गुण यांच्याभोवतीच त्यांचे भावविश्व जणू मर्यादित झालेले दिसते. आपली मुलं दररोज खेळतात की नाही, शाळेत सर्वांना सामावून घेणारे व्यायाम घेतले जातात की नाही यावर क्वचितच चर्चा होते. झालीच तर आमच्या पाल्याला शाळेच्या चमूत का प्रवेश दिला नाही यावरच भांडणे होतात. आपला पाल्य नियमित खेळतो की नाही याबाबतीत ते उदासीन असतात. महाविद्यालयातीलच काय, पण ११-१२ वीच्या वर्गात शिकणार्या आपल्या मुलाने/मुलीने सकाळी अथवा संध्याकाळी अर्धा तास तरी व्यायाम केला आहे की नाही, याची चौकशीही पालक करीत नाहीत. आपल्या पाल्याला शिकवणी लावणार नाही, घरीच त्याने अभ्यास करावा असे सांगण्याचे धाडस ज्या दिवशी आपल्या देशातील पालक दाखवतील तो सुदिन म्हणावा लागेल. पण अभ्यासाबरोबरच आपल्या पाल्याला शारीरिक स्वास्थ्यासाठी सकाळी अथवा संध्याकाळी व्यायाम करण्याची सवय लावण्याबाबत जागरूक असण्याची आता फार आवश्यकता आहे.
पालक-शिक्षक संघ आजकाल जवळपास सर्व शाळांमधून असतात. त्यांनी या कामी पुढाकार घेतला आणि एकंदरच विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची संस्कृती बाणविण्याचे धोरण अंगिकारले तर पुढची पिढी सशक्त, निरोगी आणि कार्यक्षम निघेल; अन्यथा पन्नाशीत जाणार्या तरुणपिढीतील पालकांना आपल्या विशी-तिशीतील पाल्याच्या शारीरिक व्याधी, विकलांगतेचे ओझे वाहत बसावे लागेल. हे राष्ट्र तारुण्यापूर्वीच म्हातारे होईल.
ज्यामुळे मुलांची वागण्याची तर्हा घडते, ज्यासाठी पालक आणि पालकच प्रामुख्याने जबाबदार असतात त्या गोष्टीचा इथे उल्लेख होणे आवश्यक आहे. आपले २-३ वर्षांचे मूल सतत दूरदर्शनपुढे बसलेले असते. त्याला त्यावेळी दूरदर्शन बंद करून दुसरे काही खेळायला लावण्याची गोष्ट सोडाच, पण त्याचे जाणता-अजाणता कौतुक होते. ‘अग, हा/ही माझं ऐकतच नाही!’ हे पालकांचे उद्गार ऐकल्यावर ते मूल शेपारणारच! एकदा भोकांड पसरेल, दुसर्यांदा हातपाय आपटेल पण तिसर्या वेळी दूरदर्शन बंद केल्यावर ते आपोआपच दुसर्या गोष्टीत स्वतःला गुंतवेल. ‘हा माझे ऐकत नाही’ याऐवजी ‘माझा बाळ माझे ऐकतो’ हे सोदाहरण अंमलात आणण्याची आवश्यकता कौटुंबिक स्तरावर आहे. अशीच मुले पुढे ९-१०वीत मोठ्यांना दुरुत्तरे करतात. हाताबाहेर जातात. वेळीच मुलांना शिस्त लावण्याचे प्राथमिक कर्तव्य पालक करत नाहीत. त्याचे दूरगामी परिणाम पुढे निःशक्त राष्ट्राला भोगावे लागतील. नवी पिढी सशक्त व्हावी हाही शिक्षणाचा भाग झाला पाहिजे.

