अवाक करणारा हल्ला

0
9

युक्रेनने रशियाची लढाऊ विमाने द्रोनहल्ल्यांद्वारे नष्ट करण्याचा जो महापराक्रम नुकताच केला, तो अवाक करणारा आहे. आपल्या सीमेपलीकडे दोन ते चार साडे चार हजार किलोमीटर पार रशियाच्या प्रदेशात, दूरदूरवर सुनियोजितपणे आणि सुनियंत्रितरीत्या 117 द्रोनद्वारे हे अत्यंत यशस्वी हल्ले चढवले गेेले. एक वर्ष सहा महिने आणि नऊ दिवसांच्या काटेकोर पूर्वनियोजनातून युक्रेनने राबवलेली ही ‘स्पायडर्स वेब’ मोहीम जगातील आजवरच्या सर्वांत संस्मरणीय युद्ध मोहिमांपैकी एक ठरेल यात शंका नाही. आजवर इस्रायल आपल्या अत्यंत आक्रमक मोहिमांसाठी प्रसिद्ध होता. परंतु युक्रेनने नाटो किंवा अमेरिकेच्या मदतीविना केवळ स्वबळावर रशियासारख्या महासत्तेवर हा हल्ला चढवून तिचा जो नक्षा उतरवला आहे, तो भीमपराक्रम निव्वळ अद्वितीय स्वरूपाचा आहे. दोन महिन्यांपूर्वी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांना पत्रकारांसमक्ष पराकोटीचे अवमानित केले होते. ‘विदाऊट अस यू डोन्ट हॅव ॲनी कार्डस्‌‍’अशा शब्दांत ट्रम्प त्यावेळी झेलेन्स्की यांना हिणवले होते. तुमच्या उड्या आमच्या जिवावर आहेत असे ट्रम्प यांना त्यातून म्हणायचे होते. परंतु युक्रेनने रशियावर चढवलेला हा हल्ला अमेरिका किंवा नाटोची मदत न घेता सर्वस्वी स्वबळावर चढवला आहे हे लक्षात घेतले तर निर्धार असेल तर एखादा देश आपल्याहून कैक पटींनी प्रबळ शत्रूला कसे जेरीस आणू शकतो हे ह्यातून दिसते. रशिया हा किती विशाल देश आहे हे सांगण्याची जरूरी नाही. अशा देशामध्ये आपल्या सीमेपासून हजारो किलोमीटर दूरवरच्या, तीन वेगवेगळ्या समयक्षेत्रांतील हवाई तळांवर एकाचवेळी हे द्रोनहल्ले झाले. त्या तळांवर उभी असलेली रशियाची टीयू 95, टीयू 22, ए 50 आदी अत्याधुनिक अण्वस्त्रवाहू लढाऊ विमाने क्षणार्धात भस्मसात केली गेली. ही द्रोन त्या तळांजवळ उभ्या केलेल्या ट्रकांच्या हौद्यांतील लाकडी पेट्यांमध्ये लपवण्यात आलेली होती. विशेष म्हणजे ह्या मोहिमेत गुंतलेल्या आपल्या सगळ्या हस्तकांना हल्ल्याच्या आधल्या रात्री युक्रेनने सुरक्षित स्थळी परत आणले आणि मग दूरनियंत्रित पद्धतीने त्या लाकडी पेट्यांची झाकणे उघडून त्यातील प्री प्रोग्राम्ड म्हणजे आधी लक्ष्य निर्धारित केलेली द्रोन बाहेर काढून रशियाचे हवाई तळ लक्ष्य करण्यात आले. अत्यंत धाडसी आणि नावीन्यपूर्ण अशा प्रकारची ही लष्करी मोहीम आहे यात शंकाच नाही. रशियाची 41 लढाऊ विमाने ह्या हल्ल्यात जळून भस्मसात झाली. जवळजवळ सात अब्ज डॉलरची लष्करी सामुग्री नष्ट झाली. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे एखादा देश आपल्याहून बलाढ्य शत्रूला कसे जेरीस आणू शकतो ते ह्या कारवाईतून जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगासाठी हा धोक्याचा इशाराही आहे. आधुनिक युगाचे हे आधुनिक युद्धतंत्र आहे. बड्या बड्या लढाऊ विमानांपेक्षा आणि क्षेपणास्त्रांपेक्षा अशा प्रकारची द्रोनसारखी छोटी शस्त्रे अधिक घातक ठरू शकतात हे अलीकडे स्पष्ट दिसू लागले आहे. अलीकडच्या युद्धसंघर्षामध्ये द्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. इस्रायलवर हमासचे द्रोन हल्ले किंवा ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर पाठवलेल्या द्रोनच्या लाटांमागून लाटा आपण पाहिल्याच आहेत. युक्रेन त्याच्याही पलीकडे गेला. खुद्द शत्रूच्या प्रदेशातून त्याने हे हल्ले चढवले आहेत. ध्यानीमनी नसताना होणारे अशा प्रकारचे हल्ले हे जगाच्या इतिहासामध्ये कायम लक्षात राहतात. अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर जपानच्या नौसेनेने चढवलेला हल्ला जसा इतिहासात अमर झाला आहे, तशाच प्रकारची ही युक्रेनची धडक कारवाई आहे. आता ह्याला रशिया कसे प्रत्युत्तर देईल हा वेगळा भाग, परंतु दोन्ही देशांदरम्यान शांतीवार्ता होणार असताना आधल्या दिवशी हा हल्ला करून युक्रेनने रशियाला युद्धबंदीसाठी भाग पाडण्यासाठी दबाव निर्माण केला हेही तितकेच खरे. दोन्ही देशांतील चर्चेच्या पहिल्या फेरीत कैद्यांची आदानप्रदान झाली होती. इस्तंबूलमध्ये चर्चेची दुसरी फेरी तोंडावर असताना एवढा मोठा दणका देऊन युक्रेनने आम्हाला हलक्यात घेऊ नका हेच जणू रशिया आणि अमेरिकेला सुनावले आहे. पर्ल हार्बर हल्ल्यानंतर अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली होती. युक्रेनच्या हल्ल्याला रशिया प्रत्युत्तर देते की युद्धबंदी मान्य करते हे पाहावे लागेल, परंतु आधुनिक युद्धतंत्राचे नवे आयाम ह्या हल्ल्यातून जगासमोर आलेले आहेत आणि प्रत्येक देशाने त्यापासून योग्य धडा घ्यावाच लागेल. आजकाल गुगल मॅप्ससारख्या खुल्या ठिकाणी उपग्रह छायाचित्रांमधून सगळे हवाई तळ सगळ्यांना पाहायला मिळत असतात. कुठे कोणती लढाऊ विमाने आहेत, कोठे काय आहे हेही दिसते. अशा वेळी अशा प्रकारचे द्रोन हल्ले काय उत्पात माजवू शकतील ह्याची कल्पनाही करवत नाही.