Home बातम्या अरुणोदयाच्या संधिप्रकाशात…

अरुणोदयाच्या संधिप्रकाशात…

0

प्रा.. रमेश सप्रे

‘अरुणोदयाच्या संधिप्रकाशात’ हा शब्दप्रयोग कदाचित नवीन वाटेल. पण हे दोन्ही शब्द आपल्या परिचयाचे आहेत. पहाट व संध्याकाळ दोन्ही संधिकालच असतात. पहाटे रात्र संपून दिवसाला प्रारंभ होत असतो तर सायंकाळी दिवस संपून रात्रीच्या दिशेनं वाटचाल सुरू होते. संधि म्हणजे सांधा. दोन गोष्टींना जोडणारा. म्हणूनच या दोन्ही संधिकाली ‘संध्या’ करण्यासाठी आग्रह असतो. यात महत्त्व असतं संधिकालाला.. कधी अंधाराचं साम्राज्य संपून प्रकाशाचं राज्य सुरू होतं. विश्रामकाल संपून रामकाल (रामप्रहर) सुरू होतो. अभ्यास करायचा असतो यावेळी. मग तो रियाज असो किंवा तालीम असो; सराव (प्रॅक्टिस) असो किंवा साधना असो. हा संधिकाल खूप अनुकूल असतो.

तसंच दिवसाची कर्माची खटपट नि कटकट संपवून ध्यान, नाम इ. द्वारे स्वतःच्या आत (केवळ घरात किंवा घरट्यात नाही) उतरण्याचा काल असतो. संधी असते. संपूर्ण जीवनाचा विचार केला तर असे संधिकाल अनेक असतात. गेले एकतीस आठवडे आपण अशाच जीवनाच्या संधिकालातील मुलांच्या भावजगताचा, कल्पनाविश्‍वाचा, विचारजगताचा एकप्रकारे अभ्यास करत होतो. ही सारी मुलं दहा ते सोळा वर्षे या वयोगटातील होती. पौगंडावस्था (ऍडोलसन्स) सुरू होण्यापूर्वीचा व सुरू झाल्यानंतरचा असा हा जीवनातील महत्त्वाचा संधिकाल होता. इंग्रजीत ज्याला ‘टीन एज’ म्हणतात – म्हणजे थर्टीन ते नाइन्टीन (तेरा ते एकोणीस वर्षे) – त्याच्या आधीची तीन वर्षे व सुरू झाल्यानंतरची तीन वर्षे असा हा जीवनाची जडणघडण करणारा कालखंड (फॉर्‌मॅटिव्ह पिरियड) होता.

पौगंडावस्थेला एक छान शब्द सध्या प्रचलित झाला आहे – अरुणावस्था. म्हणजे पुढच्या तरुणावस्थेच्या (ऍडल्टहूड) अलीकडचा काल हा खूपच संवेदनक्षम आणि ग्रहणक्षम (सेन्सिटिव्ह व रिसेप्टिव्ह) असतो. या संधिकालात मागे म्हटल्याप्रमाणे मुलांच्या मनात विचारांचा झंझावात, भावनांची त्सुनामी, कल्पनांचा भूकंप आणि कृतीच्या योजनांचा ज्वालामुखी यांचा नित्यनिरंतर उद्रेक चालू असतो. त्याचीच काही प्रत्यक्ष उदाहरणं घेऊन आपण सहचिंतन करत आलो. या प्रवासाला आरंभ केला ‘ही पण आपलीच मुलं आहेत’ या पार्श्‍वभूमी सांगणार्‍या लेखानं. नंतर तीस जीवनांचा विचार आपण केला यात मुलं-मुली दोघांचा समावेश होता. ही सारी उदाहरणं खरी म्हणजे जीती-जागती होती. क्वचित दोन समांतर (पॅरेलल) जीवनातील प्रसंग एकत्र केले असतील पण एकही प्रसंग काल्पनिक नव्हता. कारण सत्य आणि जीवन हे काल्पनिकपेक्षा विचित्र, ‘अकल्पनीय’ असतं (ट्रूथ अँड लाइफ आर स्ट्रेजर दॅन फिक्शन!).

हे लिहिताना आपली भूमिका पालकाची, शिक्षकाची तर होतीच. पण त्याहीपेक्षा ती एका मित्राची, मार्गदर्शकाची, हितचिंतकाची, समुपदेशकाचीही (काउन्सेलर) होती. या बाल जीवनांची चिरफाड (डिसेक्शन) न करता जिवंत प्रसंगांच्या, घटनांच्या माध्यमातून आपण विचार केला म्हणून अधिक परिपक्वतेनं (मॅच्युरिटी) आणि सहृदयतेनं त्यांच्याकडे आपण पाहू शकलो. नुसतं पाहूच नव्हे तर त्यांना त्या विशिष्ट परिस्थितीतून बाहेर काढू शकलो किंवा पुढे नेऊ शकलो. हा एक अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव होता. अशी हजारो जीवनं शिक्षकाच्या आयुष्यात येऊन जातात. काही त्याच्या मनावर घर् करून राहतात. काही त्याच्या जीवनात स्थान मिळवून राहतात.

यासाठी शिक्षकही संवेदनक्षम व ग्रहणक्षम असला पाहिजे. मुख्य म्हणजे तो विचारशील व प्रयोगशील असला पाहिजे. मुलांचं हित मनात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी खूप काही करता येतं व शिक्षक म्हणून एरवी कंटाळवाण्या वाटणार्‍या आयुष्याला एक नवा अर्थ व आयाम (डायमेन्शन) देता येतो. मुलांकडून खूप गोष्टी पालक व शिक्षक यांना शिकायला मिळतात. त्याचा उल्लेख त्या त्या मुलाच्या जीवनासंदर्भात प्रत्येक लेखात आपण स्पष्टपणे केला आहे. या समारोपाच्या लेखात त्यांच्यावर थोडा प्रकाश पुन्हा टाकायचा आहे आणि काही गोष्टी घट्टपणे पदरात बांधून (किंवा रुमालात बांधून) पुन्हा पुन्हा उघडून पहायच्या आहेत.

आरंभीच सलील जिब्रानची ती सुरुवातीलाच धक्का देणारी कविता आपण चिंतनासाठी घेतली होती. ‘तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीतच..युवर चिल्ड्रन आर नॉट युवर चिल्ड्रन.. असं म्हणून ‘जोर का झटका… धीरे से लगे|’या सूत्रानंतर जिब्रान सांगून टाकतो.. ती मुलं आहेत जीवनाच्या स्वतः जगण्याच्या स्वतः जन्मण्याच्या नि जगण्याच्या तीव्र इच्छेचं फळ….दे आर द चिल्ड्रन ऑफ लाइफ्स लॉंगिंग फॉर इटसेल्फ’….किती खरं आहे हे! समजायला एकदम सोपं पण त्याप्रमाणे वागताना अतिशय कठीण!

‘माझं मूल’ म्हणून मुलाचा विचार सुरू केला तर नकळत त्याच्यावर आपल्या इच्छा, कल्पना, विचार लादले जातात. इतकंच नव्हे तर आपली स्वप्नंही त्यांच्या माध्यमातून पुरी करण्याचा आपला अट्टाहास असतो. इथं खूप सावधगिरीची आवश्यकता आहे. जिब्रान आपल्याला सांगतोच ‘त्यांना तुम्ही आपली स्वप्नं देऊ नका कधीही! कारण त्यांना स्वतःची स्वप्नं असतात. आणि मुख्य म्हणजे तुम्ही ‘काल’च्या (भूतकाळाच्या) घरात राहात असता तर त्यांचा निवास असतो ‘उद्या’च्या (भविष्यकाळाच्या) राजवाड्यात!’

मुलांचं आपल्याकडून होणारं अति-संरक्षण (ओव्हर-प्रोटेक्शन); त्यांना साध्या साध्या अगदी नेहमीच्या सवयीच्या कामासाठी आपण देत असलेल्या अनंत सूचना; एकूणच वर्तनाविषयी (बिहेव्हियर) त्यांच्यावर लादत असलेले यम-नियम, विधी-निषेध(डूज अँड डोन्ट्‌स) या सार्‍यातून त्यांची मनं आक्रसून जातात, आकुंचन पावतात आणि व्यक्तिमत्त्वं खुजी होतात म्हणजे खुंटून, खुरटून जातात. त्यांचा विकास नीट होत नाही. यातून मग निर्माण होतात कौटुंबिक समस्या, मुलांचे प्रश्‍न नि पालकांच्या अडचणी. पालकांच्या अपेक्षा मुलांचे ‘हितचिंतक मित्र’ म्हणून ठीक असतात असं म्हणता येईल. पण त्या वास्तव (रिआलिस्टिक) असतात का?..याचाही विचार या लेखमालेत आपण अनेकदा केला. ‘सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले!’ असं समर्थ रामदास म्हणतात. त्याच चालीवर ‘मित्र मित्र म्हणता आपण – पालकमंडळी – मुलांचे हितशत्रू तर बनत नाही आहोत ना?’- हा ज्वलंत प्रश्‍न कुटुंबाकुटुंबात निर्माण झालाय.

‘पालकांचं मेकातलं वर्तन’ हा अनेक समस्यांचा गाभा आहे असं अनेक मुलांच्या समस्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. प्रेमाचे, मैत्रीचे, सेवा-त्यागावर आधारलेले पालकातील परस्पर संबंध हे मुलांना वरदान असतं. अशा मुलांच्या जीवनात वागणुकीसंबंधी, अभ्यासासंबंधी, परिस्थितीशी जुळवून घेण्याविषयी कमी प्रश्‍न निर्माण होतात हा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे. शाळा सुटल्यानंतर सु. एक तास झाला तरी समोरच्या फुटपाथवर उपाशी पोटी कुणीतरी न्यायला येईल अशी वाट पाहणार्‍या कोवळ्या जीवाबद्दल काय वाटेल सहृदय माणसाला? पण अशा मुलाच्या आईवडलांनी एकमेकांशी फारकत (सेपरेशन) घेतलेली असते. मुलाला एका आड एक अशा दिवशी आई आणि वडील स्वतंत्रपणे आपापल्या घरी घेऊन जात असतात. मुलाला कुणी विचारलेलंच नसतं. अन् का विचारायचं? आईवडील दोघांच्या अहंकाराची टक्कर होत राहिल्यानेच हा प्रसंग त्या निष्पाप जीवावर आलेला असतो. हे मूल पुढे परिस्थितीचा बळी ठरतं. वाईट संगत लागली तर खूप बिघडतं. आपण फक्त एवढंच म्हणायचं का ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!’?

मुलाच्या जीवनात दुसरा जन्म होतो त्याला शाळेत घालतात तेव्हा. पूर्वीसुद्धा ‘द्विज’ हा शब्द अशाच अर्थी वापरला जायचा. उपनयन (मुंज) करून गुरुगृही ज्ञानार्जनासाठी पाठवताना मुलाचा दुसरा जन्म होतो ही कल्पना त्यामागे होती. पूर्ण नऊ महिने नऊ दिवस या पारंपरिक समजुतीप्रमाणे असलेल्या गर्भवासानंतर जन्मलेल्या मुलाचं जन्मापूर्वी व्यवस्थित पोषण झालेलं असतं. त्यांच्या शरीराच्या आत्ताच्या संस्था (सिस्टम्स) नीट वाढलेल्या असतात. पण काही कारणानं आधीच जन्मलेलं किंवा जन्माला घालावं लागलेलं मूल अनेक दृष्टींनी अधू, कमकुवत राहतं. असंच ‘सिझेरियन’ ऑपरेशन जन्मानंतरही आपण करतो ते म्हणजे लवकरात लवकर पाळणाघर, प्ले ग्रुप, नर्सरी अशा ममतापूर्ण नावाच्या पण बरंचसं बाजारी स्वरूप आलेल्या संस्थात ठेवतो (घालतो किंवा टाकतो!). पुन्हा कारण परिस्थितीच! परिस्थिती बदलता येत नाही. आपण स्वतः मात्र परिस्थितीनुसार बदलू शकतो. इच्छाशक्ती मात्र हवी. तीव्र इच्छा तिथं मार्ग (जहॉं चाह, वहॉं राह) हा जीवनाचा नियमच आहे. असो.

वयोगट १० ते १६ म्हणजेच माध्यमिक शाळांतील मुलं. त्यांची नैसर्गिक वाढ, आपण घडवलेला विकास, अभ्यास, छंद इ.इ. अनेक गोष्टींबद्दलचा विचार काही विशिष्ट विद्यार्थ्यांची उदाहरणं घेऊन आपण केला. प्रत्येक लेखात आपण म्हणजे पालक – शिक्षकांनी काय शिकायचं याचा खास विचार आपण करत आलो. यातले काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे असे –

पालकांसाठी ः

ए मुलांचं ‘मूलपण (चाइल्डनेस)’ टिकवलं पाहिजे. यात बालपण (चाइल्डहुड) आलं. लवकर शाळा, त्यातला खेळ(आनंद) कमी, अभ्यास (ताण) जास्त हा अनुभव, अपेक्षांचं ओझं, मुलांच्या मनाचा एककल्ली (आपलंच खरं मानण्याचा स्वभाव) विकास अशा अनेक गोष्टीतून मुलांच्या तना-मना-जीवनावर गंभीर परिणाम होतात.

ए माध्यमिक शाळेत येताना अनेकांचा होणारा माध्यम बदल (चेंज ऑफ मिडियम); त्यामुळे अभ्यासावर, परीक्षेतील कामगिरीवर होणारा प्रतिकूल परिणाम; त्यातून जवळ जवळ सक्तीनं लावलेल्या शिकवण्या अशा अनेक अनिष्ट गोष्टींची साखळी सुरू होते.

ए पालकांच्या वाढत जाणार्‍या अपेक्षा; गुणांच्या टक्केवारीसाठी दमछाक; चरकात पिळून काढल्याचा अनुभव देणारे मार्गदर्शक वर्ग (कोचिंग क्लासेस) यात आपण एक गुण (मार्क्स) मिळवण्याचं यंत्र आहोत – एवढाच आदर्श मुलांसमोर राहतो. अनेकजण या आघाडीवर पराभूत होतात. यातूनच जन्मतात विविध समस्या ज्यांचा उपाय शोधणं गरजेचं होऊन बसतं.

शिक्षकांसाठी ः

ए पाचवी ते सातवी या वर्गात अधिकाधिक अभ्यासपूरक उपक्रम (कोकरिक्युलर ऍक्टीव्हिटिज) राबवायला हवेत. यातूनच सर्वांगीण विकास शक्य होतो.

ए सध्याच्या ‘निरंतर मूल्यांकन योजनेत (कंटिन्युअस इव्हॅल्युएशन स्कीम)’ मुलांचं सर्वांगीण निरीक्षण करणं अत्यावश्यक बनलंय. त्यासाठी शिक्षकांना वेळ व संधी देण्याची योजना वेळापत्रकात कशी करता येईल यावर गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. नाहीतर ही चांगली योजना निव्वळ फार्स (नाटक) बनून राहील.

ए मुलांच्या वर्तनविषयक नोंदी (ऍनेक्डोटल रेकॉर्ड) ठेवणं भाग आहे. शिक्षकांनी अशा नोंदी ठेवून त्यानुसार कार्यवाही केली तर अनेक मुलांना मदत होईल. मुलांनी घेतलेल्या अतिरेकी निर्णयांची (घरातून पळून जाणे, आत्महत्या) संख्या व तीव्रता खूप कमी होईल.

अशा अनेक उपायांचा विचारही आपण केला. एक मूळ विचार या सार्‍या मंथनामागे होता तो म्हणजे – मूल म्हणजे केवळ एक जीव नसतं तर एक अख्खं, जीतंजागतं, जिवंत नि ज्वलंत जीवन असतं.

आता वाटचाल करू या मुलांच्या पुढल्या अवस्थेच्या (वयोगट १६ ते २० वर्षे) दिशेनं…‘तरुणोदया’च्या संधिप्रकाशाकडे…