- प्रा. रमेश सप्रे
(जीवन संस्कार- 7)
निसर्ग शारीरिक अंगानं परिवर्तन घडवतच असतो, तर जीवनानुभव भावनिक, बौद्धिक, सामाजिक अंगानं बदल घडवतच असतात. आणि या सर्व बदलांना एकमेकांत गुंफणारं एक सूत्र असतं ते म्हणजे, संस्कार… जीवनसंस्कार!
रवींद्रनाथ टागोर हे एक अनेक पैलू असलेले प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. त्यांचा मानवी मनाचा अभ्यास आणि जीवनाविषयीचं चिंतन यांचं दर्शन त्यांच्या वाङ्मयातून होतं. ते सिद्धहस्त लेखक होते, त्याचबरोबर निरनिराळ्या अवस्थेतील मन नि त्याच्यावरचे संस्कार यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अलौकिक होती. याचे दर्शन त्यांच्या ‘गीतांजली’तील प्रार्थनागीतातून, तसेच निसर्गातील एका तालासुरात बदलणाऱ्या ऋतूंच्या वर्णनातून होते.
मानसशास्त्र- शिक्षणशास्त्र- अध्यात्म यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्याची नि जीवनातील सत्य-शिव-सुंदराचा प्रत्यक्ष स्पर्श झाल्याची अनुभूती त्यांच्या कथा-कवितांतूनच नव्हे तर प्रत्ययकारी ‘रवींद्रसंगीता’तूनही आपल्याला येते.
याची स्पंदनशील प्रचिती देणाऱ्या रवींद्रनाथांच्या बालक, किशोर नि अरुणावस्थेतील तीन कथा पाहूया. पहिली अर्थातच बालकाच्या मनोवस्थेची कथा. ‘प्रतीक, आज आपल्याकडे तुझा मामा येणार आहे. तुला नवे कपडे, दागिने घालून मी स्वच्छ-सुंदर तयार करणार आहे. मामा जाईपर्यंत नीट वागायचं. कपडे मळवायचे नाहीत. मातीत खेळायचं नाही,’ अशी एकप्रकारची ताकीदच आई आपल्या मुलाला देते. त्याला छानसं तयार करते. मामा येतो. भाच्यासाठी खेळणी-मिठाई आणतो. काहीवेळ प्रतीक त्यांच्यात रमतो. पण नंतर त्याचं लक्ष बाहेर मातीत खेळणाऱ्या, मौजमस्ती करणाऱ्या आपल्या सवंगड्यांकडे जाते. तो दाराजवळ येऊन एकटक त्यांच्याकडे पाहत राहतो. त्याला वाटतं अंगावरचे कपडे, दागिने दूर फेकून त्यांच्यात मिसळावं. पण ते शक्य नसतं. कारण मामा असेपर्यंत त्याला स्वच्छ राहायचं होतं. हे झाले एका बालकाच्या मनातले भाव. तो मुलगा नैसर्गिक प्रकृतीनुसार आपले खेळगडी, खेळ याच विश्वात होता. त्याच्या मनावर संस्कार घडवण्यासाठी ही एक संधी असते. प्रकृतीच्या पातळीवरून संस्कृतीच्या पातळीवर नेणारे संस्कार त्याच्यावर घडवावे लागतात असो.
दुसरी कथा आहे किशोरावस्थेतील मुलाची. कोलकात्याजवळील एका खेड्यात एक बाई आपल्या दोन मुलांसह राहत असते. मोठा पथिक दहाबारा वर्षांचा तर धाकटा माखन आठ वर्षांचा. वडील नसल्यामुळे दोघांचंही संगोपन (जडणघडण) आईच करत होती. एक तर अतिशय गरिबी नि दुसरं म्हणजे मोठ्या पथिकचं शिकण्यात बिलकूल लक्ष नसतं. शेवटी नाईलाजाने ती पथिकला आपल्या भावाकडे कोलकात्याला ठेवते. मोठं शहर, मोठी शाळा, यामुळे पथिक ताणतणावाच्या ओझ्याखाली दबून जातो. घरी मामी त्याला सारी कामं सांगून त्रास देत असे, तर शाळेत सारे शिक्षक त्याच्यावर रागवत असत. दोन्हीकडून मृदंग बडवला जावा तशी त्याची स्थिती झाली होती. पण मृदंगातून मधुर संगीत निघतं. पथिकच्या मनात दुःख-व्यथा गच्च भरून राहिली होती. तो परत परत मामाला विचारायचा, ‘आईकडे कधी जाणार?’ यावर मामाचं एकच उत्तर, ‘सुटी लागल्यावर!’ अत्यंत आर्ततेने पथिक सुटीची वाट पाहत होता.
एका परीक्षेत गुण अगदीच कमी मिळाल्यामुळे घरी गेल्यावर मामा-मामी नक्की रागावणार, पण त्यांची सही प्रगतिपत्रकावर घेतल्याशिवाय शाळेत जायचं नाही असं वर्गशिक्षकांनी ठणकावून सांगितलं होतं. एका असह्य कोंडीत पथिक सापडला होता.
शाळेतून घरी न जाता तो नदीकाठी गेला. प्रचंड पावसात भिजल्यामुळे त्याला थंडी वाजून ताप आला. तसाच कुडकुडत तो चिखलात पडून राहिला. खूप उशीर झाला तरी पथिक अजून घरी का आला नाही? सगळ्यांनी हातात कंदील, मशाली घेऊन शोध सुरू केला. ‘पथिक-पथिक’ हाकांनी शांत परिसर घुमू लागला. शेवटी नदीकाठी चिखलात पडून कुणीतरी ‘मां मां’ (आई आई) अशा स्वरात कण्हताना दिसून आलं. तो पथिकच होता. मामा वगैरे मंडळी पोचेपर्यंत तो बेशुद्ध झाला. त्याही अवस्थेत तो ‘मां मां’ म्हणतच राहिला.
पथिकची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे त्याच्या आईला बोलावलं गेलं. ती तातडीने पोचलीसुद्धा. डॉक्टरांच्या उपचारानंतर पथिकने डोळे उघडले. समोर आई दिसताच त्याने क्षीण आवाजात विचारलं, ‘मां, सुटी पडली ना?’- सर्वांचेच डोळे पाणावले.
रात्रंदिवस पथिकच्या मनात ‘सुटी पडली की आईकडे जायचं’ हाच विचार घट्ट झाला होता. तो विचारात न घेता मोठी मंडळी आपले विचार पथिकवर भावनाशून्य पद्धतीने लादत होती, याचा अनुभव या प्रसंगामुळे सर्वांना आला. याचा परिणाम म्हणून आई पथिकला आपल्याबरोबर घेऊन खेड्यातील घरी परतली. पथिकसाठी ते खरं ‘होम कमिंग’ होतं. किशोरावस्थेतील, अरुणावस्थेतील मुलांची मनं सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. असो.
आता अरुणावस्थेतून अलगद तरुणावस्थेत प्रवेश करतानाचा प्रवास. एका अर्थाने सुरवंटाचा फुलपाखरू होण्याकडचा प्रवास वर्णन करणारी रवींद्रनाथांची ही एक अप्रतिम कथा आहे. हृदयाला स्पर्श करणारी.
खेड्यातली एक अवखळ, अल्लड मुलगी. पक्ष्यासारखी मुक्तपणे जीवनाच्या अवकाशात लहरणारी- तरंगणारी. आपल्यापेक्षा थोड्या लहान अशा मुलांबरोबर मस्त मजा करत गावभर भटकणारी. वय वाढत असलं तरी स्वभाव बदलत नव्हता. सवयी बदलत नव्हत्या. आईला मोठी चिंता लागून राहिली होती. चार घरकामं शिकेल तर त्यासाठी घरात असायला नको का? मुलीचं तर गावात भटकणं, झाडावर चढणं, कैऱ्या-आंबे काढणं, विटीदांडूसारखे खेळ खेळणं सुरूच राहिलं. लग्नानंतर हिचं कसं होणार या चिंतेत असताना इतरांच्या सल्ल्यानं तिचं लग्नच करावं असं ठरलं. तसं ते झालंसुद्धा.
पण काही उपयोग नाही. पहिले पाढे पंचावन्न! सासरी येताना तिनं माहेरहून कुत्रा-मांजर आणलेलं नसलं तरी पिंजऱ्यातला पोपट मात्र आणला होता. घरी असली तर कामं करण्याऐवजी ती त्या पोपटाशीच ‘राघू, माझा राघू’ म्हणत खेळत असे. सासुबाईंनाही सुनेविषयी तक्रार नि कौतुक अशा संमिश्र भावना होत्या. तशीच स्थिती सुस्वभावी पतिदेवांचीही होती. ‘होईल एक दिवस मोठी!’ असं म्हणत तो दिवस काढीत होता.
सासर, सासू, घरातील इतर मंडळी, विशेष म्हणजे पती यांच्याविषयी आपली काही कर्तव्यं- जबाबदारी आहे ही भावनाच त्या अल्लड मनात नव्हती.
एक दिवस तिच्या नवऱ्याची बदली कोलकात्याला होते. तिला तिकडे नेऊन काही उपयोग नाही असेच सर्वांचे मत पडले. शेवटी जाण्यापूर्वी तिचा पती तिला शांतपणे म्हणतो, ‘तुला ज्यावेळी माझी आठवण येईल त्यावेळी पत्र लिही. मी लगेच येईन तुला भेटायला!’ यावर ती निरागसपणे विचारते, ‘मी तुम्हाला विसरणारच नाही तर तुमची आठवण कशी येईल?’ ‘ठीक आहे. पण जर का अगदी आतून आठवण झाली तर मला पत्र मात्र लिही हं!’ असं म्हणून तिच्या उत्तराची वाट न पाहता तो निघाला.
…असेच काही दिवस जातात आणि एकदा राघूशी नि स्वतःशी बोलत असतानाच अगदी आतून तीव्रतेने तिला आपल्या पतीची आठवण येते. आपण त्याच्याजवळ असायला पाहिजे होतं हा विचार तीव्र होतो. त्या आवेगात ती पिंजऱ्याचं दार उघडून राघूला मुक्त करते. तो पंख फडफडवत आकाशात उडून दृष्टिआड होतो.
तिच्याच नकळत ती पतीला पत्र लिहायला बसते. राघूची पिंजऱ्यातून मुक्ती ही तिच्याही मुक्तीचे प्रतीक असते. ती अगदी सहजपणे तरुणावस्थेत पोचलेली असते. तिच्या अरुणावस्थेची एका अर्थी ‘समाप्ती’ झालेली असते. या कथेचं नावही तेच आहे. असो.
जीवनातील अवस्था अनेक अंगांनी बदलत असतात. निसर्ग शारीरिक अंगानं परिवर्तन घडवतच असतो, तर जीवनानुभव भावनिक, बौद्धिक, सामाजिक अंगानं बदल घडवतच असतात. आणि या सर्व बदलांना एकमेकांत गुंफणारं एक सूत्र असतं ते म्हणजे, संस्कार… जीवनसंस्कार!