अमेरिकेत माथेफिरूने केली २० कोवळ्या मुलांची हत्या

0
55

ऍडम लांझा नावाच्या या माथेफिरू तरूणाने हा घातपाती प्रकार केला. सँडी हूक एलिमेंटरी स्कूल या प्राथमिक शाळेत सकाळी साडेनऊच्या सुमारास तो दोन हातांत दोन बंदुका घेऊन घुसला आणि दोन वर्गांमध्ये अंदाधुंद गोळीबार करीत २० कोवळ्या मुलांसह २६ जणांना निर्घृणपणे ठार मारले. त्या शाळेत घुसण्यापूर्वी त्याने आपल्या घरी आईलाही यमसदनी पाठवल्याचे स्पष्ट झाले. लांझा याचा मृतदेहही नंतर हल्ल्याच्या ठिकाणी आढळून आला. 

हा हल्ला झाला तेव्हा एका कर्मचार्‍याने इतर वर्गांतील शिक्षकांना सावध करताच त्यांनी तातडीने इतर मुलांना शाळेबाहेर काढले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यासंदर्भात व्हाईट हाऊसमध्ये निवेदन देताना अश्रू आवरले नाहीत. ‘अवर हार्टस् आर ब्रोकन’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अमेरिकेत वारंवार होणारे असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. अमेरिकेत अशा प्रकारे अंदाधुंद गोळीबार करण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. १९९९ मध्ये कोलाराडो येथे अशाच अंदाधुंद गोळीबारात तेरा मुलांची हत्या झाली होती. माथेफिरू लांझा याने सिग सॉसर आणि ग्लॉक या बंदुका दोन्ही हातांत घेऊन हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्या गाडीच्या डिकीत आणखी एक बंदूक होती असेही स्पष्ट झाले. लांझा हा वीस वर्षांचा तरूण असून त्याची आई पूर्वी त्या शाळेत शिक्षिका होती असे सांगण्यात येत आहे. त्याचा भाऊ रायन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी चालू आहे.