भारत-अमेरिका दरम्यानचे सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच भारतातील धार्मिक वैविध्यतेचा सन्मान करण्यात यावा म्हणून अमेरिकन सभागृहाच्या कॉंग्रेसच्या सदस्य कॅरोलिन मालोनी दिवाळीचे अमेरिकन टपालाचे तिकीट प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे तसा प्रस्तावर सादर केला आहे. गेल्या १५ जानेवारी रोजी मालोनी यांनी ओबामा यांना पाठविलेल्या याविषयीच्या पत्रामध्ये अमेरिकेत सध्या ख्रिसमस, इद सारख्या सणांवर पोस्टाचे तिकीट असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता दिवाळीच्या तिकिटाची वेळ असल्याचेही म्हटले असून अध्यक्ष या प्रस्तावाला पाठिंबा देतील अशी आशाही व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यंदा २६ जानेवारी रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असल्याने या प्रस्तावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दिवाळीच्या निमित्ताने व्हाईट हाउसमध्ये पारंपरिक दिवा लावणारे ओबामा हे पहिलेच अध्यक्ष आहेत. तसेच करुणा आणि सहिष्णुतेचे मूल्यांचा प्रचार करणारेही ते पहिलेच अध्यक्ष आहेत. आपल्या भारतभेटीदरम्यान आपण दिवाळीनिमित्तच्या पोस्टाच्या तिकिटाला पाठिंबा द्याल अशी आशा मानोली यांनी पत्रात व्यक्त केली आहे. या टपालाच्या तिकिटामुळे १० लाख लोकांपर्यंत भारतीय उत्सवाचा संदेश पोचू शकेल, तसेच भारत आणि अमेरिकेचे सांस्कृतिक संबंध दृढ होण्यास मदत होईल, असेही मानोली यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे टपालाचे तिकीट प्रसिद्ध झाल्यास ते दक्षिण आशियातील उत्सवाला प्रथमच अमेरिकेत ओळख मिळण्यास दुवा ठरणार आहे.

