अमेरिकेचा 26 टक्के टॅरिफ भारतात लागू

0
18

>> निर्यात होणाऱ्या भारतीय सामानावर 26 टक्के आयात शुल्क

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला रेसिप्रोकल टॅरिफ भारतात काल बुधवारपासून लागू झाला आहे. सकाळी 9.31 मिनिटांनी भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ सुरू झाला. भारतावर लावण्यात आलेल्या या टॅरिफनंतर अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय सामनावर 26 टक्के आयात शुल्क आकारले जाईल. या टॅरिफचा भारतात वेगवेगळ्या स्तरांवर परिणाम दिसून येईल. जवळपास 180 देशांवरही हा टॅरिफ लागू झाला आहे.
ज्या देशांवर कमी टॅरिफ आहे, त्यांच्यामुळे भारतीय उत्पादनांना फटका बसू शकतो. कारण त्याच वस्तू कमी किमतीत अमेरिकन विक्रेत्यांना उपलब्ध होतील. भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, रत्न, दागिने, ऑटोमोबाइल आणि टेक्स्टाइल उत्पादने आहेत.

परिणाम होणारी भारतीय उत्पादने
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफचा सर्वात जास्त परिणाम औषधांवर होईल. भारतातून अमेरिकेत स्वस्त औषधांची निर्यात होते. भारताकडून अमेरिका 12 अब्ज डॉलर्सची औषधे आणि फार्मा प्रोडक्ट्स विकत घेते. भारतातून अमेरिकेत 73.7 अब्ज डॉलर्सची निर्यात, तर अमेरिकेकडून 39.1 अब्ज डॉलर्सच्या सामानाची आयात होते. अमेरिकेचे आकडे यापेक्षा वेगळे आहेत. अमेरिकन आकड्यानुसार भारताकडून 91.2 अब्ज डॉलर्सची निर्यात तर 34.3 अब्ज डॉलर्सच्या सामानाची आयात होते. अमेरिकेसोबत व्यवसाय नेहमीच भारतासाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. कारण आयात कमी आणि निर्यात जास्त आहे. अमेरिकेने टॅरिफच्या रुपाने भारतीय सामानावर लावलेल्या टॅरिफमुळे निर्यात कमी होऊ शकते.

अमेरिकन सामानावर
भारतात लागणारा टॅरिफ

भारतात सरासरी टॅरिफ सर्वात जास्त आहे. भारतात सरासरी टॅरिफ 17 टक्के आणि अमेरिकेत 3.3 टक्के आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतून भारतात येणाऱ्या खाण्या-पिण्याचे सामान, मीट आणि प्रोसेस्ड फूडवर भारतात 37.66 टक्के टॅरिफ लागतो. तेच भारत याच सामानावर अमेरिकेत 5.29 टक्के टॅरिफ देतो. ऑटोमोबाइलवर भारतात 24.14 टक्के आणि अमेरिकेत 1.05 टक्के टॅरिफ आकारला जातो. दारुवर भारतात 124.58 टक्के तर अमेरिकेत 2.49 टक्के टॅरिफ लागतो.

चीनचे भारताला आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भरमसाट शुल्क आकारल्यानंतर जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. चीनने या शुल्काला विरोध सुरूच ठेवला असून आता भारताला मैत्रीचे आवाहन केले आहे. या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी भारताने आपल्या पाठीशी उभे राहावे असे चीनने म्हटले आहे. अमेरिकेने यावरील शुल्क वाढवून 104 टक्के करण्याची घोषणा केली आहे.

चीनवर 50 टक्के अधिक शुल्क
ट्रम्प यांनी 34 टक्के परस्पर शुल्क लादल्यानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव अनेक दिवस सुरू होता. ट्रम्प यांना प्रत्युत्तर देताना चीननेही प्रत्युत्तर देत अमेरिकेवर 34 टक्के शुल्क लादले. यामुळे ट्रम्प संतापले आणि चीनने आपली प्रत्युत्तरयोजना मागे घेतली नाही तर अतिरिक्त 50 टक्के शुल्क लादणार असल्याचे सांगितले. 180 देशांनाही अमेरिकेचा टॅरिफ लागू