अमेरिकेकडून भारतावर भरमसाठ आयात शुल्क लागू

0
4

>> डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जाहीर; भारताकडून 27 टक्के आयात शुल्क वसूल करणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लागू केले आहे. अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट 10 टक्के आयात शुल्क लागू केले आहे, तर काही देशांवर (परस्पर आयात शुल्क) लागू केले आहे. म्हणजेच जे देश आधीपासून अमेरिकेकडून कर वसूल करत आहेत, त्या-त्या देशांकडून आता अमेरिकेने देखील तितकाच (किंवा त्या प्रमाणात) आयात शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. अमेरिकेने भारतावर 27 टक्के, चीनवर 34 टक्के आणि पाकिस्तानवर 29 टक्के आयात शुल्क लादले आहे.

अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट 10 टक्के कर लागू केले असून, काही निवडक देशांवर परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. भारताबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘नवी दिल्ली’ आपल्याकडून खूप आयात शुल्क आकारत आहे. या शुल्काबाबत ट्रम्प यांनी ‘खूप कठोर कर आकारणी’ असा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, त्यांचे (भारत) पंतप्रधान अलीकडेच अमिरेकेला आले होते. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हणालो, की तुम्ही माझे चांगले मित्र आहात; परंतु तुम्ही आमच्याबरोबर योग्य व्यवहार करत नाही. भारत आमच्याकडून 52 टक्के आयात शुल्क आकारतो. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अर्धे आयात शुल्क म्हणजेच 26 टक्के शुल्क घेणार आहोत. हा निर्णय घेणे खूप कठीण होता.

दरम्यान, भारतावरील आयात शुल्क हे 26 टक्के नसून, 27 टक्के असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. व्हाइट हाऊसने एक अधिकृत आदेश जारी करून याची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतावर 26 टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले होते; मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यामध्ये, भारतावर अमेरिकेने 27 टक्के आयात शुल्क लागू केल्याचे स्पष्ट केले आहे.

याशिवाय इतर काही देशांकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कातही बदल केल्याचे समोर आले आहे. अमेरिकेने भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, थायलंड, म्यानमार या देशांवरही आयात शुल्क लागू केले आहे. अमेरिकेने जवळपास 75 देशांवर परस्पर आयातशुल्क आणि इतर सर्व देशांवर सरसकट 10 टक्के आयात शुल्क लागू केले आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरीस निवडणुकीपूर्वी थेट अमेरिकेत ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ अशी घोषणा दिली होती, त्याशिवाय ‘नमस्ते ट्रम्प’ हा भव्यदिव्य कार्यक्रम गुजरातमध्ये केला होता, त्याच ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला आहे.

ही दयाळू कर आकारणी : ट्रम्प
या अतिरिक्त कर आकारणीचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आहे. मी या धोरणाला दयाळू समन्यायी व्यापार कर असे म्हणेन. हे खरे तर पूर्णपणे जशास तसे कर नाहीत. आम्ही त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या कराचे दर फक्त निम्मे केले आहेत. त्यांना अडचण असेल तर त्यावरचे उत्तर खूप सोपे आहे. जर तुमची काही तक्रार असेल, जर तुम्हाला हे व्यापार कर शून्य हवे असतील, तर तुम्ही तुमची उत्पादने थेट अमेरिकेत तयार करा. इथे कोणतेही व्यापार कर नाहीत, असे डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले.