अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आदेशावर स्वाक्षरी; एकूण कर 50 टक्क्यांवर; रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरुच ठेवल्याचा परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकला आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादत असल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. भारताने रशियाकडून खनिज तेलाची खरेदी न थांबवल्याने अतिरिक्त आयातशुल्क लादण्यात येत असल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेले एकूण आयातशुल्क 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. याआधी अमेरिकेने 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के आयातशुल्क आणि दंडाची घोषणा केली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारतावर अतिरिक्त आयातशुल्क लादणार असल्याचे सुतोवाच केले होते. भारत एक चांगले व्यापारी राष्ट्र नसल्याचे म्हणत ट्रम्प यांनी पुढील 24 तासांत मी भरपूर आयातशुल्क लागू करणार असल्याचा नवा इशारा दिला होता. तो खरा ठरवत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्याची घोषणा त्यांनी काल केली. त्यामुळे अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या निर्णयावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी करणे सुरू ठेवल्याच्या मुद्द्यांवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्य देशांनाही इशारा
एखादा अन्य देश रशियाकडून थेट किंवा अप्रत्यक्षपणे खनिज तेलाची आयात करत असेल, तर त्यांच्यावरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रशिया किंवा अन्य कोणता देश अमेरिकेच्या धोरणांनुसार पावले उचलत असल्यास आयातशुल्कात बदल केला जाऊ शकतो, असे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी लादले होते 25 टक्के आयातशुल्क आणि दंड
30 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास भारतीय वस्तूंवर 25 टक्के आयातशुल्क आणि दंडही आकारणार असल्याचे जाहीर केले होते.
भारताकडून नाराजी व्यक्त
या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आहे. आमची तेल आयात बाजारावर आधारित आहे आणि याचा मुख्य उद्देश 140 कोटी भारतीयांना निश्चित आणि सुरळीत ऊर्जा पुरवठा करणे आहे. अमेरिकेने भारतावर त्या गोष्टींसाठी अतिरिक्त आयातशुल्क लादले, ज्या गोष्टी इतर देश त्यांच्या राष्ट्रहितासाठी करत आहेत. आम्ही पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतोय की हे पाऊल अन्यायकारक, चुकीचे आणि अविवेकी आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे.

