अमेरिका-इराणमधील युद्ध अखेर थांबले

0
8

गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जगाला आर्थिक संकटात आणणारे अमेरिका-इराण युद्ध अखेर काल थांबले. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेला आणि शांततेला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली. अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर ऐतिहासिक शांतता करार झाला आहे. इराणच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी दोन्ही देशांमधील 14 कलमी मसुदा कराराची घोषणा केली आहे. या करारानुसार, इराणवरील अमेरिकेची सागरी नाकेबंदी उठवली जाणार असून, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग पुन्हा खुला होणार आहे. या ऐतिहासिक करारावर आगामी शुक्रवारी, म्हणजेच 19 जून रोजी जिनिव्हा येथे अधिकृत स्वाक्षरी होणार आहे.

शांतता कराराकडे पाहिल्यास अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी परस्परांकडून प्रमुख मागण्या मान्य करवून घेतल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शांतता कराराच्या घोषणेला इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलने दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबून आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हा शांतता करार निश्चित होताच आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कोसळले आहेत.

इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे या करारावर सही करणार आहेत. इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघेर गालीबाफही जिनिव्हाला जाणार आहेत. अमेरिकेकडून उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स करारावर सही करतील. 19 जूनला दोन्ही देशांत जिनिव्हामध्ये शांती करार होणार आहे.

इस्रायलला शांतता करार अमान्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेऊन तयार केलेला हा शांतता करार इस्रायलला मान्य नाही. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर यांनी ‘एक्स वर लिहिले की, ट्रम्प यांचा करार आमच्यावर बंधनकारक नाही. इस्रायल हा अमेरिकेचे गुलाम नसून एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. आम्ही ‘बनाना रिपब्लिक’ नाही. हिजबुल्लाहचे पूर्ण उच्चाटन झाल्याशिवाय आणि सैन्याने ताब्यात घेतलेल्या सीमावर्ती भागातून मागे न हटता शांतता पाळली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराची घोषणा झाल्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका-इराण शांतता करारात लेबनॉनचा देखील समावेश असताना इस्रायलकडून कराराचे उल्लंघन करत हल्ला केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कराराची घोषणा
19 जून रोजी जिनिव्हा येथे होणार शांतता करारावर स्वाक्षरी

कुठल्या 14 अटींवर समझोता?

1) इराणला कच्च तेल आणि पेट्रोकेमिकल्स संबंधीच्या ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या मुक्त करण्यात येतील.
2) इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिका त्यांचे निर्बंध मागे घेईल.
3) 60 दिवसांमध्ये इराणचे जे 24 अब्ज डॉलर गोठवण्यात आले होते त्यावरील निर्बंध हटवण्यात येतील.
4) इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्र हे इराणला 300 अब्ज डॉलर्सची योजना सादर करेल.
5) लेबनॉनसह सर्व युद्ध तातडीने बंद केले जाईल.
6) अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल.
7) अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली, ती 30 दिवसांच्या आत पूर्णपणे हटवली जाईल.
8) अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल.
9) होर्मुझ खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत 30 दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल.
10) अणुविषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी 60 दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल.
11) इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या एनपीटी अणुप्रसारबंदी करार अंतर्गत असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.
12) अमेरिका या प्रदेशातील आपली लष्करी उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यास सहमती दर्शवेल.
13) अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल.
14) इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत.