अमित शहांची रविवारी फोंड्यात सभा

0
11

>> आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार; दक्षिण गोव्यात मताधिक्य वाढवण्यावर भाजपचे उद्दिष्ट

फोंडा येथे रविवार दि. 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. याच सभेने भाजपच्या आगामी लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. दरम्यान, ही सभा फोंड्यात नेमकी कुठे होणार, याचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही.

येथील भाजप मुख्यालयात भाजपच्या कोअर समितीच्या (गाभा) पार पडलेल्या बैठकीत अमित शहा यांच्या लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर चर्चा करण्यात आली. या सभेतून अमित शहा हे गोव्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार असले, तरी पुढील महिन्यात फोंडा आणि साखळी पालिकेची निवडणूकही होणार आहे. त्यामुळे या सभेला आणखी महत्त्व आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, दक्षिण गोव्यात भाजपचे मताधिक्य वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील फोंडा येथे मध्यवर्ती ठिकाणी अमित शहा यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे. तसेच, शहा दक्षिण गोव्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या सभेसाठी जागा अजूनपर्यंत निश्चित करण्यात आलेली नाही. जाहीर सभेसाठी फर्मागुडी, शिरोडा बगलरस्ता आदी जागांची पाहणी केली जात आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

दरम्यान, फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रमुख म्हणून राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या सभेच्या निमित्ताने गोव्यात येणारे अमित शहा हे दक्षिण गोव्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शहा हे त्यांना मार्गदर्शन करतील. त्यातून कार्यकर्त्यांत चैतन्य आणि उत्साह निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे.

भाजपचे दक्षिण गोव्यावर अधिक लक्ष
सद्य:स्थितीत उत्तर गोव्यात भाजपचा खासदार, तर दक्षिण गोव्यात काँग्रेसचा खासदार आहे. 2014 च्या निवडणुकीत या जागेवर भाजपने विजय मिळवला होता; मात्र 2019 च्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या हातातून निसटली. त्यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीत या जागेवर पुन्हा विजय मिळवण्यासाठी भाजपने आत्तापासूनच कंबर कसली आहे.

दोन्ही पालिकांची निवडणूक स्वबळावर लढणार
फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. पालिका निवडणूक ही पक्षीय पातळीवर नसली तरी, भाजपचे कार्यकर्ते स्वबळावर पालिका निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. फोंडा पालिका क्षेत्रात मगोशी आघाडी केली जाणार नाही, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.