अमित पालेकर यांचाशुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
6

विरियातो फर्नांडिस यांच्याकडून दुजोरा; अमित पाटकरांचे मौन

आम आदमी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर हे शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे दक्षिण गोवा खासदार ॲड. विरियातो फर्नांडिस यांनी त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले
ॲड. अमित पालेकर हे येत्या 10 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांना अमित पालेकर यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. अमित पालेकर हे 10 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त खरे आहे का, असा प्रश्न पाटकर यांना करण्यात आला असता 10 एप्रिलपर्यंत थांबा, असे उत्तर पाटकर यांनी दिले. मात्र, अमित पाटकर यांच्या सोबत असलेले खासदार विरियातो फर्नांडिस यांनी हे वृत्त खरे असून, ॲड. अमित पालेकर हे 10 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.

आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष असलेल्या ॲड. अमित पालेकर यांना गेल्या डिसेंबर महिन्यात गोव्यात झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी जानेवारी महिन्यात आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ॲड. पालेकर यांनी म्हटले आहे.