अमलीपदार्थ व्यवहारांविरोधात कडक कारवाई सुरू

0
8

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; पीट एनडीपीएस कायद्याखाली तिघे ताब्यात

राज्यात अमलीपदार्थांना थारा दिला जाणार नाही. गोवा पोलिसांनी अमलीपदार्थ व्यवहारांविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली असून, प्रथमच पीट एनडीपीएस कायद्याखाली अमलीपदार्थांची विक्री करणार्‍या ३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पोलीस मुख्यालयात राज्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांना अमलीपदार्थप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अमलीपदार्थविरोधी विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली असून, राज्य अमलीपदार्थमुक्त बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गोवा हा अमलीपदार्थांसाठी नाही, तो चांगल्या पर्यटकांसाठी आहे, असा संदेश आम्हांला द्यायचा आहे. नाईट क्लब आणि पार्टी डेस्टिनेशनमध्ये कोणी अमलीपदार्थ वापरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उपअधीक्षकांना राज्यातील अपहरणाच्या प्रकरणांवर आणि परराज्यातून येणार्‍या कामगारांवर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यात २०१९ च्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातील पोलीस दलातील भरतीची प्रक्रिया येत्या आठ दिवसात सुरू केली जाणार आहे. हैदराबाद पोलिसांनी केलेला आरोप चुकीचा असून पोलीस महासंचालकांनी त्याबाबत स्पष्टीकरण केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तिघांविरोधात पीट एनडीपीएस कायद्याखाली कारवाई
राज्यात अमलीपदार्थप्रकरणी पीट एनडीपीएस कायद्याखाली जुवाव लोपीस, अवेलिनो डिसोझा (दोघेही रा. कळंगुट) आणि वेली डिकॉस्टा (रा. तिळामळ-केपे) यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात अमलीपदार्थ प्रकरणी चार-पाच पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी गृह खात्याकडे अमलीपदार्थांबाबत जास्त गुन्हे नोंद असलेल्या तिघांवर पीट एनडीपीएस प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव गृह, दक्षता, कायदा खात्याच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या छाननी समिती समोर ठेवण्यात आला. सदर छाननी समितीने सदर कायद्याखाली तिघांवर कारवाईची शिफारस केली आहे. त्यानंतर मुख्य सचिवांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. तिघांकडे आता सद्यस्थितीत अमलीपदार्थ आढळून आलेला नाही. त्यांच्याविरोधात पूर्वी गुन्हे नोंद असल्याने त्यांना ताब्यात घेऊन एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. येत्या पाच आठवड्यामध्ये सल्लागार मंडळासमोर यासंबंधीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तिघांच्या स्थानबद्धतेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.