बच्चन कुटुंब तथा तमाम चाहत्यांच्या उत्कंठेला पूर्णविराम देत ऐश्वर्या राय – बच्चन हिने काल सकाळी येथील खासगी इस्पितळात मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या (३८) व अभिषेक (३५) यांचे पहिले अपत्य असलेल्या या मुलीचा जन्म सेव्हन हिल्स या खासगी इस्पितळात झाला. आई व मुलगी दोन्ही सुखरूप असल्याचे इस्पितळातील सूत्रांनी सांगितले.
काल सकाळी अभिषेकने ट्विटरवर ‘इट्स ए गर्ल’ असा संदेश लिहून वडील बनल्याची बातमी उघड केली. ‘आपणास ऐश्वर्यासारखी मुलगी हवी’ अशी इच्छा अभिषेकने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. अमिताभ बच्चन यांचीनी ट्विटरवर ‘मी एका सुंदर मुलीचा आजोबा बनलो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऐश्वर्याने काल सकाळी १० वा. सुमारास कन्यारत्नास जन्म दिल्याचे इस्पितळ सूत्रांनी सांगितले. यावेळी बच्चन कुटुंबीय व राय कुटुंबीय उपस्थित होते. सोमवारी रात्री तिला इस्पितळात दाखल केले होते. अभिषेक व ऐश्वर्याचे एप्रिल २००७मध्ये लग्न झाले होते. ऐश्वर्या आई बनणार असल्याची बातमी यंदा जून महिन्यात पहिल्यांदा उघड करण्यात आली होती. दरम्यान, ऐश्वर्याच्या बाळंतपणाबद्दल बातम्या प्रसारित करताना संयम पाळावा यासाठी ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने सर्व वृत्त वाहिन्यांना दहा कलमी सूचना दिल्या होत्या.