अभिमानास्पद – भारत चंद्रावर

0
8

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा ‘विक्रम’

भारत चांद्रयान-3 चे ‘विक्रम’ लँडर काल यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले अन्‌‍ भारत आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्र मोहीम यशस्वी झाली. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर भारताचा तिरंगा चंद्रावर फडकला. चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरले आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथे जगातील कुणीच गेलेले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली. चांद्रयान-2 मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आलेले अपयश चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाने क्षणार्धात पुसून टाकले. या यशानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. सॉफ्ट लँडिंगनंतर चार-साडेचार तासांनी विक्रम लँडरमधून रॅम्पच्या आधारे प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आले. त्यानंतर विक्रम आणि प्रज्ञानने एकमेकांची छायाचित्रे काढून पृथ्वीवर पाठवली.

चांद्रयान-2 मोहिमेत अपयश आल्यानंतरही भारताने हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचे फळ काल मिळाले. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3ने यशस्वीरित्या उड्डाण केले होते. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रावर सूर्य उगवताच इस्रोच्या चांद्रयान-3ने दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सुरुवात केली. चांद्रयान-3ने संध्याकाळी 5.44 वाजता लँडिंगची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर पुढील 20 मिनिटांत त्याने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून 25 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर पहिले पाऊल ठेवले.
दुसऱ्या बाजूला देशवासियांच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा चांद्रयान-3च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली. नियोजित वेळेनुसार चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग होताच इस्त्रोच्या बंगळुरूमधील मुख्यालयात टाळ्यांचा कडकडाट झाला.
चंद्राच्या दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. तेथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

चांद्रयान-3 चंद्रावर काय करणार?

 • चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मातीचा अभ्यास करणार
 • पृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक रहस्ये शोधणार
 • चंद्रावर मँगनीज, लोह, टायटेनियमसारखी दुर्मीळ खनिजे शोधणार
 • अब्जावधी वर्ष अंधार, प्रचंड थंडीतल्या मातीत बर्फाचे रेणू शोधणार
 • बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा
 • पाणी असल्यास चंद्रावर ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती शक्य
 • ऑक्सिजन निर्मितीनंतर चंद्रावर मानवी वस्तीचे स्वप्न दृष्टिपथात पंतप्रधानांकडून अभिनंदन आणि शुभेच्छा
  चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्याशिवाय देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. चंद्रावर उतरुन भारताने इतिहास रचला आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे. सध्या प्रत्येक भारतीय जल्लोष करत आहे. अखंड भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या चांद्रयान-2 मोहिमेवेळी पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्ष बंगळुरूतील इस्रोच्या मुख्यालयात हजर होते; यावेळी मात्र दे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्याने चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग त्यांनी तेथूनच आभासी पद्धतीने पाहिले.

‘इंडिया इज ऑन द मून…’
चांद्र मोहीम यशस्वी ठरताच इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी देशवासियांना त्याची माहिती देताना, ‘वी हॅव अचिव्हड’ म्हणजेच आपण यश मिळवले, असे म्हटले. तसेच ‘इंडिया इज ऑन द मून’ म्हणजेच भारताने चंद्रावर पाऊल टाकल्याची घोषणाही एस. सोमनाथ यांनी केली.

‘चंदामामा अपने घरे के’
चांद्रयान-चा विक्रम लँडर मोड्यूल सुरक्षितपणे चंद्रावर उतरला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हिंदीत एक म्हण आहे, ‘चंदामामा दूर के’, मात्र आता आपण म्हणू शकतो की, ‘चंदामामा अपने घर के’, असेही इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटले.

चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश; तर दक्षिण ध्र्रुवावर उतरणारा पहिला
या मोहिमेच्या यशासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर पोहोचणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. चीन, अमेरिका आणि रशियाने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले आहे, परंतु यापैकी कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप उतरू शकलेला नाही. ज्या ठिकाणी कोणीही अद्याप पोहोचू शकलेले नाही, त्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर आपले यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे.

‘मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो’
भारताचे चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 ने इस्रोसाठी खास संदेश पाठवला. इस्रोने ट्विट करत याबाबत माहिती दिली. ‘भारत, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण : चांद्रयान-3′ असा संदेश चांद्रयानने इस्रोला पाठवला.

मोहिमेचा मानवाला काय फायदा?
चंद्रावरील खनिज साठे मानवाला वापरता येतील, तसेच इतर नवीन संसाधनांचा शोध लागल्यास त्याचाही मानवाला फायदा होईल. चंद्रावर पाण्याचे साठे सापडल्यास भविष्यात तेथे मानवी वसाहती तयार केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे मानवाला चंद्रावर जीवन जगणे शक्य होईल.

सॉफ्ट लँडिंगनंतर पुढे काय घडले?
-धूळ स्थिरावल्यानंतर विक्रम लँडर सुरू झाला आणि त्याने संवाद प्रस्थापित केला.
-त्यानंतर लँडरमधून एक रॅम्प उघडला आणि प्रज्ञान रोव्हर त्या रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.
-विक्रम लँडरने प्रज्ञान रोव्हरचे आणि प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचे छायाचित्र काढून ते पृथ्वीवर पाठवले.
-रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले रोव्हर हळूहळू पुढे सरकेल आणि त्याची सहा चाके चंद्राच्या मातीवर अशोक स्तंभ आणि इस्रोच्या बोधचिन्हाची छाप सोडतील.

आतापर्यंतच्या भारताच्या
चांद्र मोहिमांबद्दल थोडक्यात…

-2003 : तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून चांद्र मोहिमेची घोषणा.
-22 ऑक्टोबर 2008 : श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-1 चे प्रक्षेपण.
-14 नोव्हेंबर 2008 : चांद्रयान-1 मधून उतरलेले ‘द मून’ हे अवकाश यान चंद्रावर आदळले. या मोहिमेतून चंद्रावर बर्फाचे अंश असल्याची पुष्टी.
-22 जुलै 2019 : श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान-2 चे प्रक्षेपण.
-2 सप्टेंबर 2019 : चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर उंचीवर असताना चांद्रयान-2 चा संपर्क तुटला; मोहीम अयशस्वी.
-14 जुलै 2023 : सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण.
-23 ऑगस्ट : चांद्रयान-3 चा विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला.

चांद्रयान-3 मोहिमेचे 8 नायक
चांद्रयान-3 च्या यशामागे इस्रोचे अनेक अभियंते आणि शास्त्रज्ञांनी परिश्रम घेतले. त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून चांद्रयान-3 मोहिमेवर काम करत होते. सुमारे 1,000 अभियंते आणि शास्त्रज्ञ या मोहिमेत गुंतले होते. त्यात 8 शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली

 1. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ
 2. प्रकल्प संचालक पी. वीरमुथुवेल
 3. मिशन डायरेक्टर मोहना कुमार
 4. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर.
  5.यूआर राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक एम. शंकरन
  6.लाँच ऑथोरायझेशन बोर्डाचे प्रमुख ए. राजराजन
  7.यूआर राव सॅटेलाइट प्रोजेक्टरच्या संचालक कल्पना
  8.इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ रितू करिधल श्रीवास्तव