गोमंतकीयांचे अत्यंत आवडते गायक अजित कडकडे यांची ‘गोमन्तविभूषण’ पुरस्कारासाठी निवड झाल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल केलेले सूतोवाच कडकडेंच्या हजारो चाहत्यांना आनंदित करणारे आहे. गोव्याच्या मातीत असंख्य कलाकार जन्मले, परंतु गोव्याबाहेर गेल्यावरच त्यांच्या कलेचे चीज झाले. मुंबई ही अनेकांनी कर्मभूमी मानली आणि अवघ्या मराठी मुलुखाने मग त्यांना डोक्यावर घेतले. संगीत रंगभूमी असो किंवा शास्त्रीय मैफली, गोमंतकाच्या लाल मातीचा टिळा लावून गेलेल्या ह्या कलाकारांनी निःसंशयपणे गोव्याशी असलेली आपली नाळ सदैव जपली आणि ह्या भूमीचा लौकीक सर्वदूर नेऊन पोहोचवला. ह्याच मांदियाळीतले महत्त्वाचे नाव म्हणजे अजित कडकडे. भतग्रामाचा म्हणजेच डिचोलीचा हा सुपुत्र गोव्याशी असलेले आपले हे नाते आजही अभिमानाने मिरवीत असतो. पं. जीतेंद्र अभिषेकींचे शिष्य होण्याचा सन्मान त्यांना लाभला आणि त्या एका तपाच्या शिकवणीतून त्यांचे गाणे बहरले. एक किस्सा येथे नमूद करण्यासारखा आहे. अभिषेकीबुवा आपल्या शिष्यवर्गाला मैफलीत मागे तंबोरे घेऊन बसवत असत. अजित कडकडे जेव्हा बुवांकडे नव्यानेच गाणे शिकायला गेले, तेव्हा त्यांनाही बुवांनी मडगावच्या एका मैफलीत आपल्या मागे बसवले. त्या मैफलीत कविवर्य बा. भ. बोरकरांची उपस्थिती होती. मैफलीनंतर बोरकरांनी बुवांना मागे बसलेल्या त्या मुलाचे नाव विचारले, तेव्हा बुवा म्हणाले ‘हा पुढे गाणारा होणार आहे!’ आज कडकडेंचे नाव ध्वनिफितींपासून मैफलींपर्यंत सर्वत्र दुमदुमते आहे त्यातून जणू बुवांचा आशीर्वाद फळाला आला आहे. गोव्यातील मंदिरांमधून होणारा एकही सार्वजनिक उत्सव असा नसेल, की जिथे कडकडेंचा स्वर निनादत नाही. पहाट उगवते तीच मुळी कडकडेंच्या स्वरांनी. ‘तुझ्या कृपेने दिन उगवे हा..’ पासून ‘वृंदावनी वेणू’, ‘देवाचिये द्वारी’ आणि ‘दत्ताची पालखी’ पर्यंत कडकडेंचा पवित्र मंगल स्वर बालपणापासून आमच्या काळजामध्ये रूतून बसलेला आहे. मनामध्ये काही पवित्र, उदात्त, मंगल भाव जागविण्याची ताकद कडकडेंच्या ह्या स्वरामध्ये आहे. खरे तर त्यांना शास्त्रीय गायक म्हणून आपली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवता आली असती, परंतु त्यांनी भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते गाण्याचा मार्ग चोखाळला आणि ध्वनिफितींद्वारे, रेडिओद्वारे अजित कडकडे हे नाव घरोघरी जाऊन पोहोचले. गणेश, विठ्ठल, दत्त आदी दैवतांचे भावदर्शन ह्या त्यांच्या अनोख्या दमदार स्वराने घडवले. तारकमंत्रापासून महामृत्युंजयमंत्रापर्यंत नानाविध मंत्र्यांचे पावित्र्य कडकडेंच्या भक्तीने भिजल्या स्वरात ह्रदयापर्यंत जाऊन पोहोचले. तक्रार करायचीच झाली तर एकच करता येईल. त्यांनी थोडे गाण्यांच्या चालींबाबत चोखंदळ राहायला हवे होते असे मात्र वाटते. धावत्या चालींमध्ये दाबून कोंबून बसवलेल्या शब्दांची गाणी कडकडेंनी गायला नको होती. परंतु अशा गाण्यांचेही त्यांच्या दैवी स्वराने शेवटी सोनेच केले. कडकडेंनी नाटकांतूनही भूमिका केल्या आहेत. अश्विनशेटची भूमिका त्यांची स्वतःची आवडती भूमिका. कधी ते कोदंडही झाले. पण अजित कडकडे म्हटल्यावर आपल्या डोळ्यांपुढे येतो तो शिडशिडीत अंगकाठीचा, झुपकेदार केसांचा, परंतु दमदार पण गोड आवाजाचा रसिकांची ह्रदये काही मिनिटांत भावभक्तीरसाने चिंब भिजवून टाकणारा गायक. त्या आवाजातच ह्रदय भक्तिरसाने ओले करण्याची काही जादू आहे. संतांच्या वाणीचा खरा अर्थ आमच्या पिढीला आकळला तो कडकडेंच्या स्वरांतून. ते ‘निघालो घेऊनी दत्ताची पालखी’ गाऊ लागतात तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर ती ठिकठिकाणी पेणे घेत प्रदक्षिणा काढणारी दत्तमहाराजांची पालखी झुलू लागते. ‘वृंदावनी वेणू’ची तान घुमल्यावर तो मनमोहन श्रीकृष्ण आणि त्याच्या गोपिकांचा तो मथुरा वृंदावनचा परिसर आपल्या भोवती साकारतो. त्या वेणुनादाने व्याकूळ झालेली बरसानाची राधा आपल्या डोळ्यांना दिसू लागते. कडकडे ‘भक्तीवाचोनी मुक्तीची मज जडली रे व्याधी.. विठ्ठला मीच खरा अपराधी’ गाऊ लागले की आपलाही कंठ दाटून येतो. ही त्या स्वराची जादू आहे. गोव्याच्या कलाकारांनी गोव्याबाहेरच्या स्पर्धात्मक युगाला सामोरे जावे अशी इच्छा त्यांनी आम्हाला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केलेली होती. तरुणांनी गोव्याचा अभिमान बाळगावा आणि गोव्याचे नाव जगभर कसे होईल ह्याचा विचार करावा असे ते म्हणाले होते. असे आपले अजित कडकडे लवकरच ‘गोमंतविभूषण’ ने सन्मानित होत असताना गोमंतकाच्या कलाक्षेत्राला त्यांच्यापासून नवी भरारी घेण्याची प्रेरणा मिळेल आणि नव्या पिढीतील गोमंतकीय प्रतिभावंतांच्या प्रतिभेची चमक उर्वरित जगाला अचंबित करून सोडील अशी खात्री वाटते. पं. अजित कडकडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!