पाकच्या 20 चौक्या घेतल्या ताब्यात
तीन दिवसांनंतर सीमेवर शांतता
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अफगाणिस्तानने सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला चढवला. यात 58 पाक सैनिक ठार झाले तर अफगाणिस्ताने पाकिस्तानच्या 20 चौक्या ताब्यात घेतल्या. शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने काबुलसह अफगाणिस्तानातील दोन ठिकाणी हल्ला केल्यानंतर याला जोरदार प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानने हा हल्ला केला.
दरम्यान, अफगाणिस्तानने या चौक्या उशिरा पाकच्या ताब्यात पुन्हा देण्यात आल्या.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला थेट धमकी देताना शांततापूर्ण तोडगा न काढल्यास आमच्याकडे दुसरा पर्याय असल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या संघर्षावर भाष्य करताना या संघर्षावर शांतीपूर्ण तोडगा न काढल्यास आमच्याकडे दुसरा पर्याय असल्याचे म्हटले आहे.
संघर्ष तात्पुरता शमला
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये उफाळून आलेला संघर्ष आता शांत झाला आहे, याबाबत अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी घोषणा केली. त्यापूर्वी तालिबानकडून मोठा दावा करण्यात आला आहे. शनिवारी पाकिस्तासोबत झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानचे 58 सैनिक मारले गेले आहेत, तर दुसरीकडे या घटनेत अफगाणिस्तानच्या देखील 9 सैनिकांचा मृत्यू झाला असून, 16 जण जखमी झाले आहेत, असे तालिबानने म्हटले आहे. आधी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबुलवर एअरस्ट्राईक केला, या एअरस्ट्राईकला अफगाणिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे हा संघर्ष उफाळून आला, युद्धाला सुरुवात झाली. पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर दोन्ही बाजूंनी कित्येक तास फायरिंग सुरूच होती.
याबाबत माहिती देताना मुजाहिद यांनी, आम्ही कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीमुळे हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला, आम्ही सीमेवर सुरू असलेला संघर्ष आता थांबवला असल्याचे सांगितले.

