अपुर्‍या अभियंत्यांमुळे साबांखाच्या कामावर परिणाम : नीलेश काब्राल

0
8

>> ७५० पैकी तब्बल ४०० पदे रिक्त;
>> भरती प्रक्रिया अडकली चौकशी फेर्‍यात

सार्वजनिक बांधकाम खात्यात जेवढ्या अभियंत्यांची गरज आहे, त्यापेक्षा ५० टक्केच अभियंते खात्यात आहेत. त्यामुळे खात्याच्या कामांवर परिणाम होऊ लागला असल्याची कबुली साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली.

साबांखामध्ये अभियंत्यांच्या ७५० एवढ्या जागा असून, त्यापैकी तब्बल ४०० पदे रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी ३५० पदे भरण्याचे काम डॉ. प्रमोद सावंत सरकारने केले होते; मात्र दक्षता खात्यातर्फे या भरतीसंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आल्याने या ३५० पदांची भरती अडकून पडली आहे, असे काब्राल म्हणाले.

याविषयीचा खटला दक्षता खात्याकडे आहे. त्यामुळे काय होते ते पहावे लागेल, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. अभियंत्यांची ३५० पदे रद्द करण्यात आली आहेत का, असे विचारले असता ती रद्द करण्यात आली आहेत की नाही, याबाबत खात्याला अद्याप काहीही कळवण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्य सचिव असलेले पुनीत कुमार गोयल हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे देखील सचिव असून, त्यांच्याकडे रस्त्यांसंबंधीच्या तसेच अन्य विकासकामांसंबंधीच्या फाईलींचा ढीग पडलेला आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.

विकासकामांच्या या फाईलींबद्दल आपणाला चिंता असून, खात्याचे सचिव असलेल्या मुख्य सचिवांना या फाईल्सकडे लक्ष देण्यास वेळ नसेल, तर खात्याच्या सचिवपदाचा ताबा अन्य कुणाकडे तरी देण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही काब्राल यांनी सांगितले.