अपहरणाचा धडा

0
20

संयुक्त अरब अमिरातीमधून इस्रायलकडे जाणाऱ्या विमानात सहवैमानिकाने मुख्य वैमानिकावर केलेला हल्ला हा सरळसरळ विमानाचे अपहरण करून इस्रायलमध्ये कोसळवण्याच्या कटकारस्थानाचा प्रयत्न होता हे आतापर्यंतच्या तपासामध्ये पुरेसे स्पष्ट झाले आहे. ह्या कारस्थानाला भारतीय वैमानिक स्मित मच्छर आणि विमानातील इतर प्रवासी यांनी आपल्या असीम धैर्याने आणि शौर्याने उधळून लावले, अन्यथा आतील 177 प्रवाशांसहित हे विमान कोठे कोसळवले गेले असते आणि त्यातून आणखी किती प्राणहानी झाली असती हे सांगणे अवघड आहे. हमासने दोन वर्षांपूर्वी सात ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच सदर सहवैमानिकाने हा कट रचला असावा असा संशय सुरुवातीपासून होता, त्याला आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट दुजोरा मिळाला आहे. विमान दुबईहून निघून काही काळ जाताच नमाज पढण्याच्या बहाण्याने कॉकपिटमध्ये मागे जाऊन आणि नमाज पढून सहवैमानिक हमाम अल हमामी ह्याने विमानाच्या कॉकपिटमध्ये ठेवल्या जाणाऱ्या छोट्या कुऱ्हाडीने मुख्य वैमानिक स्मित मच्छर यांच्या डोक्यावर मागून प्रहार केला. आपल्या डोक्याला विमानाचा भागच आदळल्यासारखे त्याला आधी वाटले, परंतु प्रहारांमागून प्रहार होत राहिले तेव्हा आपला सहकारीच आपल्यावर हा प्राणघातक हल्ला चढवतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. रक्तबंबाळ स्थितीत कॉकपिटचे दार उघडण्याचा त्यांचा प्रयत्न हमामीने पहिल्यांदा रोखला. परंतु रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेल्या स्थितीतही स्मित यांनी सर्वशक्तीनिशी कॉकपिटचे दार उघडले आणि परिस्थितीचा अंदाज आलेल्या प्रवाशांनी विमानाची उपकरणे नादुरुस्त करून विमान कोसळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या हमामीला ताब्यात घेऊन हेडफोनच्या वायरींनी बांधून घातले. प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून जादा वैमानिक विमानात होते, ज्यांनी नंतर विमान सुखरूप जवळच्या सौदी अरेबियात उतरवले. हमामीला हे विमान इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरच कोसळवायचे होते. ते शक्य झाले नसते तर त्याने ते शहरातील एखाद्या गगनचुंबी इमारतीला धडकवले जाते अशी कबुली त्याने तपासात दिली आहे. कोणी सांगावे, ज्यूंच्या सर्वोच्च धर्मस्थानावर, जेरुसलेमवरही ते तो कोसळवू शकला असता. हे हवाई अंतर जेमतेम पंधरा मिनटांचे आहे. ह्या अपहरणाच्या प्रयत्नाने पंचवीस वर्षांपूर्वीच्या अमेरिकेतील विश्व व्यापार केंद्रावरील हल्ल्याच्या कटू आठवणी तर ताज्या केल्या आहेतच, परंतु जिहादी मानसिकता कोणत्या थराला जाऊ शकते आणि केवढे मोठे कटकारस्थान रचू शकते हेही ह्यातून समोर आले आहे. हमामीला तो नागरिक असलेल्या ओमानच्याच विमान कंपनीने त्याचे धार्मिक कडवेपण पाहून विमान चालवण्यापासून रोखून कार्यालयीन काम दिले होते. पण अशी पार्श्वभूमी असूनही त्याला दुबईच्या विमान कंपनीत नव्याने नोकरी कशी मिळावी हा मोठा प्रश्न आहे. त्याहून मोठा प्रश्न आहे तो म्हणजे हा वैमानिक ओमानचा नागरिक असूनही तो इस्रायलमध्ये जाणारे विमान कसे चालवू शकला? ज्या देशांशी राजनैतिक संबंध नाहीत, त्यांचे नागरिकत्व असलेल्या वैमानिकांना आपल्या देशात येण्यास इस्रायलने प्रतिबंध घातलेला आहे. एखादे विमान दुसऱ्या देशात जाते तेव्हा त्यातील वैमानिक व प्रवासी यांची यादी त्या देशाला आधी दिलेली असते. मग ओमानी नागरिकत्व असलेल्या हमामीला इस्रायलमध्ये येण्याची परवानगी कशी मिळाली हाही प्रश्न येतो. ह्यापूर्वीही त्याने इस्रायलमध्ये विमानोड्डाण केलेे असल्याचे सांगितले जात आहे. दुहेरी नागरिकत्व असलेले अनेक वैमानिक तसे करतात, पण हमामीपाशी जर दुहेरी नागरिकत्व नसेल, तर त्याला ही परवानगी कशी मिळाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो इस्रायलसारख्या सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत गंभीर असलेल्या देशाची त्रुटी दर्शवितो. आता इस्रायलचे वाहतूक खाते आणि शिन बेट ही सुरक्षा यंत्रणा यांच्यात एकमेकांवर घटनेचे खापर फोडण्याचे प्रयत्न चालले आहेत. परंतु हा आता केवळ इस्रायलपुरता विषय नाही. जागतिक स्तरावर एकमेकांच्या देशात जाणाऱ्या वैमानिकांची वैद्यकीय चाचणी जशी केली जाते, आता अलीकडे एअर इंडियाच्या प्रकरणानंतर अमली पदार्थ चाचणीही जशी केली जाऊ लागली आहे, तशाच प्रकारे वैमानिकाचे नागरिकत्व आणि पार्श्वभूमी तपासण्याचीही गरज ह्या घटनेने अधोरेखित केली आहे. प्रस्तुत प्रकरणात हमाम अल हमामीला शिक्षा होणार की त्याची पाठराखण केली जाणार हे पुढे दिसेलच. आंतरराष्ट्रीय लक्ष ह्या घटनेकडे वेधले गेले असल्याने संबंधित देशांनी सहकार्याची भूमिका सध्या तरी घेतलेली आहे. ती शेवटपर्यंत टिकते का व त्यातून गुन्हेगाराला शिक्षा होते का ते पुढे पाहू.